शार्पनर... खास या छोटीसाठी : अशी ग्राहकसेवा मिळाली तर और क्या चाहिये?

मंडळी, आजच्या स्पर्धेच्या बाजारपेठेत सर्वात महत्वाचं स्थान कोणाचं असेल तर ते आहे ग्राहकाचं. यशस्वी होण्यासाठी प्रत्येक व्यवसायाला ग्राहकाच्या गरजा आणि आवडीनिवडींची सांगड ही घालावीच लागते. एकंदरीत ग्राहक हाच इथला राजा असतो म्हणा ना! याच कारणामुळे व्याप्ती आणि पत कीतीही मोठी असली तरी आपल्या ग्राहकाच्या समस्या आणि गरजांच्या बाबतीत मात्र काही व्यवसाय हे अत्यंत तत्पर आणि संवेदनशील असतात. आणि म्हणूनच लोकांच्या मनात त्यांची उत्पादित वस्तू किंवा सेवा सदैव घर करून राहते. याचंच उदाहरण देणारा एक सुंदर किस्सा श्वेता सिंग नावाच्या महिलेने फेसबुकच्या माध्यमातून शेअर केलाय...

पोस्टमधे त्यांनी लिहलंय की त्यांची साडे चार वर्षांची मुलगी डावखुरी आहे, आणि डावखुरं असणं ही त्यांच्यासाठी काही विशेष गोष्ट नव्हती. पण लवकरच त्यांच्या लक्षात आलं की उजव्या लोकांसाठी बनलेल्या या जगात त्यांची डावखुरी चिमुरडी प्रत्येक लहानसहान गोष्टींत संघर्ष करतीये. खरी गंमत तर पुढे आहे...

एक दिवस त्यांची मुलगी शाळेतून नाराज होऊन घरी परतली. तिच्या नाराजीचं कारण होतं शार्पनर! शाळेतल्या इतर मुलांना सहज हाताळता येणारा शार्पनर तिला डावखुऱ्या हाताने वापरायला जमत नव्हता! अर्थातच फक्त उजव्या लोकांसाठी बनवण्यात आलेला हा शार्पनर उलटा वापरून पेन्सिलीला टोक करणं तिच्यासाठी कठीणच असणार राव. आपल्या मुलीची ही समस्या सोडविण्याच्या हेतूने श्वेता यांनी इंटरनेटवर डाव्या मुलांसाठीच्या शालेय साहित्याचा शोध घेतला. तिथे त्यांना हवा तसा डावखुरा शार्पनर सापडला खरा, पण त्याची किंमत होती ७०० ते १२०० रूपये!!

यानंतर श्वेता यांनी आपली ही समस्या 'हिंदुस्थान पेन्सिल्स प्रायव्हेट लिमिटेड' या नामांकित स्टेशनरी निर्मात्या कंपनीला लिहून कळवली. मंडळी, आपण ज्या नटराज आणि अप्सरा पेन्सिल्स वापरतो, त्यांची निर्मिती याच कंपनीकडून केली जाते बरं का!! आश्चर्य म्हणजे कंपनीने त्यांच्या या समस्येची दखलही घेतली. आठवडाभरात या कंपनीने श्वेता यांच्या मुलीसाठी खास डाव्या व्यक्तीसाठी डिझाईन करण्यात आलेले शार्पनर पाठवले! विशेष हेच की कंपनीकडून डाव्या व्यक्तींसाठी असं कोणतंही उत्पादन बनवण्यात येत नसताना खास या मुलीसाठी त्यांच्याकडून ते बनवण्यात आलं! 

आता हिंदुस्थान पेन्सिल्सने डावखुऱ्या लोकांसाठीही असं साहित्य उत्पादित करणं सुरू केलंय. राव! ग्राहकवर्गाला अशाप्रकारची सेवा मिळाली तर और क्या चाहिये? नाय का?

सबस्क्राईब करा

* indicates required