अफगाणिस्तानमुळे भारतीय स्वयंपाकघरात लवकरच युद्धजन्य परिस्थिती उद्भवणार आहे! पाहूयात याची कारणे काय आहेत.

अफगाणिस्तानमध्ये ज्या घडामोडी घडत आहेत, त्यामुळे जगभरात त्याचे पडसाद पडत आहेत. तिथल्या व्यापार ठप्प झाल्यामुळे आलेल्या महागाईला तोंड द्यायची वेळ आली आहे. अफगाणिस्तानमधून निर्यात होणाऱ्या वस्तूंचा बाजारपेठेत तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यातील अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश आहे. थेट स्वयंपाकघरापर्यंत त्याचे परिणाम जाणवणार आहेत. होय! रोजच्या जेवणात वापरले जाणारे हिंग महाग झाला आहे, त्याच्या किमती अजूनही वाढण्याची शक्यता आहे. आता पुढचे चार महिने सणासुदीचे आहेत. या काळात हिंगासोबत सुकामेवाही महाग होणार आहे. अफगाणिस्तानमुळे भारतीय स्वयंपाकघरात लवकरच युद्धजन्य परिस्थिती उद्भवणार आहे! पाहूयात याची कारणे काय आहेत.

अलीकडेच तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्याने भारतभरातल्या बाजारपेठांमध्ये सुकामेवा आणि मसाल्याच्या किंमती वाढल्या आहेत. जगातील सर्वोत्तम दर्जाचे बदाम, मनुका, अंजीर, पिस्ता देखील अफगाणिस्तानातून येतात. मसाल्यात हिंगाची किंमत 1,400 रुपये प्रति किलो होती, आता भाव वाढून 2,000प्रति किलो रुपये झाली आहे. भारतात हिंग तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल अफगाणिस्तान, उझबेकिस्तान आणि कझाकिस्तानमधून आयात केला जातो. अफगाणिस्तानमध्ये हिंगाची सर्वाधिक शेती केली जाते. हा माल भारतात आणून त्यापासून हिंग तयार होते. हिंग हे वनस्पतीपासून तयार होते. हिंगाची रोपे भारतामध्ये आणून त्यांची पावडर तयार केली जाते. रोपाच्या मुळापासून हिंग तयार केला जातो. बीजरोपण झाल्यानंतर चार ते पाच वर्षांत हिंगाचे रोप पूर्णपणे वाढते. एका रोपापासून साधारण अर्धा किलो हिंग मिळू शकतो. भारताची हवामान परिस्थितीमुळे इकडे वनस्पती वाढत नाहीत. हिंग कोरड्या जमिनीत आणि 35 डिग्री सेल्सियसपेक्षा कमी तापमानात वाढते. भारताचे उष्णकटिबंधीय हवामान, दमट किनारपट्टी आणि जोरदार पाऊस त्यामुळे पिकाची लागवड होणे अवघड होते. तरीही हिमाचलमधील डोंगराळ भागात ही शेती काही प्रमाणात केली जाते. हिमाचल प्रदेशात स्थानिक लागवड सुरू झाल्यावर भारताने हिंग आयात कमी करण्याची योजना आखली आहे, पण त्याला वेळ आहे. भारतात वापरल्या जाणाऱ्या हिंगाच्या दोन जाती आहेत, लाल आणि पांढरा हिंग. पांढरा हिंग मूळचा अफगाणिस्तानचा आहे आणि पाण्यात विरघळणारा आहे, तर इतर देशांमध्ये लाल हिंग आहे.

हिंगाचा इतिहास

हिंगाचा इतिहास पाहिल्यास भारतात हिंग कधी आला? इतिहासतज्ञ सांगतात, हिंगाची उत्पत्ती इसवीसन पूर्व ६००ची आहे. त्याकाळापासून हिंदू आणि बौद्ध ग्रंथांमध्ये हिंगाचा उल्लेख सापडतो. काही जणांच्या मते महाभारत या हिंदू महाकाव्यातही म्हणजे सुमारे इसवी सन पूर्व ३००च्या काळातही हिंगाचा उल्लेख आढळतो. हिंग स्वयंपाकात वापरल्याने पचन सोपे होते. अनेक औषधी गुणधर्म असल्याने भारतीय पक्वानात हिंगाचे महत्व आहे. आता ही भाववाढ किती दिवस होत राहते याचे गणित जुळवावे लागेल. सध्यातरी ते अटळ दिसते.

घाऊक बाजारातील व्यापाऱ्याच्या म्हणण्यानुसार ही भाववाढ फक्त सुरुवात आहे. येत्या काही दिवसात किमती आणखी वाढतील. आता येणारे दिवसच ठरवतील ही भाववाढ सर्वसामान्यांचा कसा खिसा कापते!!

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required