दुचाकीपुराण : मजबूत, तगडी तरीही हलकी आणि शेतकरी-मध्यमवर्गाची लाडकी बजाज एम 80!!!

८० आणि ९० चे दशक भारतात समृध्दीचे वारे घेऊन येत होते. या काळात भारतीय अर्थव्यवस्था बदलाकडे प्रवास करत होती. या बदलाचा वारा बाजारपेठेत देखील घोंघावत होता. याच काळात बजाज कंपनीने एक छोटी स्कूटर बाजारात आणली. तिचे नाव होते, बजाज एम 80!!!

बजाजची मार्केटमध्ये प्रतिमा चांगलीच होती. या गाडीचे मार्केटिंगही चांगले केले होते. एम 80 बनवताना मध्यमवर्ग आणि शेतकरी यांना मुख्य खरेदीदार म्हणून लक्षात घेतले होते. मध्यमवर्गीय आणि खेड्यातील लोकांनी एम 80 घ्यायला सुरुवात केली. एम 80 वाहतूकीचे एक साधे सरळ, चांगले आणि स्वस्त साधन म्हणून लोकांच्या पसंतीस उतरले.

गावातील रस्ता कितीही कठीण आणि आडवळणाचा असला तरी तो कसा पार करायचा हे एम 80 ला चांगले ठाऊक होते. मजबुतीच्या बाबतीत देखील त्या काळाच्या मानाने एम 80 तगडी होती. ७४ सीसी इंजिन असलेली एम 80 इंजिनिअरिंगचा उत्तम नमुना म्हणून लोकांकडून स्तुती मिळवत होती. १९८६ साली बाजारात आलेली ही स्कूटर वर्षानुवर्षे अनेकांची लाडकी होती.

आकर्षण डिझाईन आणि हलके वजन हे या स्कूटरचे वैशिष्ट्य समजले गेले. तसेच एकदा अंगणात उभी राहिली म्हणजे नंतर खर्च करण्याची गरजच येत नसे हा अनुभव अनेकांना आला असेल. ग्रामीण भागात शेतीशी निगडित वस्तू आरामात ने-आण करता येत असल्यामुळे ग्रामीण भागात एम 80ने चांगली पकड घेतली होती.

बजाजने वेळोवेळी एम 80 मध्ये बदल केले. यात 4 स्ट्रोक एयरकूल इंजिन, फ्रंटला हायड्रोलीक शॉक ॲबसॉर्बर, लिडिंग लिंक सस्पेंशन यांचा वापर करण्यात आला होता. तसेच नंतर आरामदायक सीटचा वापर सुरू झाला. गाडीचे टायर्स रस्ता सोडत नाहीत असेही एम 80बद्दल म्हटले जायचे. ब्रेक आणि इतर गोष्टीही चांगल्या असल्याने सुरक्षित प्रवासासाठी एम 80 चांगली निवड होती.

निर्मितीनंतर १५ वर्षे बजाजकडून दणक्यात एम 80 ची विक्री सुरू होती. काळाबरोबर एम 80 जरी बाजारातून बाहेर पडली असली तरी आजही अनेक ठिकाणी ही स्कूटर लावलेली दिसते. आपल्यापैकी अनेकांच्या घरी एकेकाळी एम 80 असेल. एम 80 विकण्याची देखील लोकांची इच्छा होत नसे. इतके प्रेम एम 80 ने मिळवले होते.

सबस्क्राईब करा

* indicates required