computer

भारतातील पहिली मिनी कार चक्क एका मराठी माणसाने तयार केलेली?

आपल्या सर्वाना माहीत आहे की भारतातली पहिली मिनी कार टाटा नॅनो आहे. पण हे खरं आहे का? तर निश्चितच नाही. टाटांच्या ५० वर्षं आधी भारतातील पहिली मिनी कार तयार केली होती एका मराठी माणसाने!! कोण होते ते आणि कशी होती भारतातील पहिली मिनी कार चला जाणून घेऊया!!!

शंकरराव कुलकर्णी असे त्या अवलियाचे नाव होते. भारत स्वतंत्र झाल्याच्या अवघ्या दोन वर्षांनंतर म्हणजे १९४९ साली त्यांनी एक मिनी कार तयार केली होती. त्या कारला मीरा मिनी कार असे म्हणत. आजही मीरा मिनी कार नाव ऐकल्यावर जुन्या जाणत्या लोकांच्या आठवणी ताज्या होतात.

परदेशी बनावटीच्या महाग गाड्या त्याकाळी सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर होत्या. अशावेळी सर्वांना परवडेल अशी गाडी तयार करण्याची शंकररावांची इच्छा होती. त्याकाळी फक्त १२ हजारात रुपयांत त्यांनी ती कार तयार केली होती. १९४९ साली तयार झालेली मिनी कार ते मुंबईत फिरवत असत. बाकी गाड्यांपेक्षा असलेल्या वेगळेपणामुळे कमी वेळेतच ही मीरा मिनी कार सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली होती.

भारतातल्या या पहिल्या मिनी कारचा नंबर होता MHK १९०६!! १९७५ पर्यंत शंकररावांनी ५ मीरा मिनी कार तयार केल्या. या गाडीत ४ स्ट्रोक इंजिन बसविण्यात आले होते. एक लिटर इंधनात जवळपास २० किलोमीटर चालू शकेल अशी तिच्या इंजिनची रचना करण्यात आली होती. ५ गियरच्या या कारला ४ पुढचे गिअर्स आणि एक रिव्हर्स गिअर होता, तर ३ दरवाजे होते. एक दरवाजा ड्रायव्हरजवळ होता आणि इतर दोन मागच्या बाजूला होते.

मंडळी, इतक्या कमी किंमतीतली चार सीटर कार यशस्वी का झाली नाही हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. अरविंद कारप्रमाणेच मीरा मिनी कारच्या प्रॉडक्शनसाठी शंकरराव कुलकर्णी यांनी सरकारची मदत मागितली होती. पण अरविंद कार्सच्या बाळकृष्ण मेनन यांच्याप्रमाणे कुलकर्णींही मदत मिळवू शकले नाहीत आणि सरकारी अनास्थेमुळे अजून एका भारतीय ब्रँडचा बळी गेला.

शंकरराव कुलकर्णी यांनी आधीच या कारच्या संशोधन आणि डिझाईनवर ५० लाख खर्च केले असल्याने भांडवलाअभावी त्यांनी या कारचे स्वप्न सोडून दिले आणि त्यांच्याकडे असलेली MHE १९९२ ही एकमेव कार त्यांनी ठेऊन घेतली.

जर ही कार यशस्वी झाली असती तर टाटा नॅनो पूर्वीच भारतात मिनी कार्सचे युग अवतरले असते.

सबस्क्राईब करा

* indicates required