computer

तुळतुळीत घोटीव दाढीचा इतिहास.. शार्कचे दात, ब्लेड बदलायच्या वस्तऱ्यापासून इलेक्ट्रिक शेव्हर्सपर्यंत!!!

वाढलेली दाढी आणि वाढलेले डोक्यावरचे केस. बहुतेक तरुण आज याच वेषात आपल्याला बघायला मिळतात. वेळेनुसार वेषभूषा, केशभूषा यांमध्ये बदल होत जातात. तरीही केशभूषेच्या बाबतीत कधीही न बदलणारी आणि वेळेनुसार किंचितही महत्त्व कमी न झालेली एकमेव गोष्ट म्हणजे स्वच्छ, तुळतूळीत, घोटीव दाढी!! कोणत्याही औपचारिक कामासाठी आजही स्वच्छ दाढीचा लुकच योग्य समजला जातो. आपल्याला हा लूक देण्यात मोलाची भुमिका बजावते ते आपण दाढी करण्यासाठी वापरत असलेले रेझर ब्लेड किंवा वस्तरा.

रेझर किंवा वस्तऱ्याच्या आधी माणूस दाढी करण्यासाठी नेमके काय वापरत असेल हा विचार कधी केलाय का तुम्ही? पुराण काळातही पुरुष दाढी करत होते का? करत असतील तर त्यांनी त्यावेळी दाढी करण्यास कोणत्या साधनांचा वापर केला असेल? आज आपण वापरत असलेल्या रेझरची सुरुवात कशी झाली? असे प्रश्न तुम्हांला पडले असतील तर चला... आज अशाच काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण करुयात.

पुरुषाने दाढी आणि केस कापण्यासाठी वेगवेगळ्या नैसर्गिक साधनांचा वापर केल्याचे पुरावे प्रागैतिहासिक काळातल्या ( म्हणजे जेव्हा माणूस अस्तित्वात तर होता, पण लिपी किंवा लेखनकला अवगत नसल्यानं ज्याचा लिखित इतिहास मिळत नाही असा काळ. अश्मयुग, कांस्ययुग आणि लोहायुग असे या प्रागैतिहासिक काळाचे तीन भाग मानले जातात.) गुहाचित्रांमध्ये सापडले आहेत. या चित्रांवरुन प्रागैतिहासिक पुरुष माशांचे खवले, शार्क माशाचे दात आणि अणकुचीदार गारगोटी यांचा वापर करून दाढी करत असे हे लक्षात येते.

ई.स.पू. ४००० वर्षांपूर्वीच्या इजिप्शियन थडग्यांत सोने आणि तांब्यापासून बनवल्या गेलेल्या वस्तऱ्याचे अवशेष सापडले आहेत. रोमन इतिहासकार 'लिवी' याच्या मते, वस्तऱ्याचा शोध रोममध्ये इसवीसन पूर्व सहाव्या शतकात लागला. या शोधाचा जनक होता रोमचा राजा 'लुशियस टार्क्वीनीयस प्रिस्कस'. वस्तऱ्याचा वापर हा त्यावेळी काही मोजक लोकांकडूनच केला जात असे. पुढे पाचव्या शतकात दाढीसाठी वस्तऱ्याचा वापर करण्याची पध्दत अधिक प्रचलित झाली.

आधुनिक काळातला वस्तरा बनवण्याचा मान दिला जातो तो इंग्लंडमधील बेंजामीन हंट्समेन यांना. धातू उच्च तापमानात तापवून आणि नंतर साच्यात ओतून या ब्लेडची निर्मिती केली होती. पुढे हीच पध्दत वापरून फ्रांसमध्ये वस्तऱ्याचं पातं तयार करण्यात आलं. चकाकीसाठी प्रसिध्द असणारे शेफील्ड स्टील वापरून वस्तऱ्याची पाती बनवण्यास सुरुवात झाली होती.

१८ व्या आणि १९ व्या शतकात श्रीमंत लोकांची दाढी करण्यासाठी नोकर असत. मध्यमवर्गीय पुरुष आठवड्यातून १ वेळा तर कधी कधी २ वेळा न्हाव्याकडे जाऊन दाढी करून येत असत. दररोज दाढी करण्याची सुरुवात झाली ती पहिल्या महायुध्दात. अमेरिकन सैनिकांना त्यांचे गॅस मास्क घालण्यात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून त्यांना दररोज दाढी करावी लागत असे.

(बेंजामीन हंट्समेन)

१९ व्या शतकात बेंजामीन हंट्समेन यांचा वस्तरा प्रसिद्ध होता. त्याला सरळ रेझर (straight razor) म्हटलं जायचं. वस्तरे १९५० पर्यंत मोठ्या प्रमाणात वापरले गेले. काळाच्या ओघात वस्तऱ्याचा वापर कमी होत गेला.

(वस्तरा)

वस्तरा म्हणजे सरळ रेझर्सना पहिले आव्हान दिले ते किंग सी. जिलेट यांनी तयार केलेल्या ब्लेड बदलायच्या वस्तऱ्याने. ज्याला आपण दाढीचं खोरं किंवा फावडं म्हणतो तोच हा ब्लेड बदलायचा वस्तरा. ब्लेड बदलून पुन्हा पुन्हा वापरता येत असलेले हे वस्तरे जास्त सुरक्षित होते. पूर्वी वस्तऱ्याला एकाच बाजूने धार असे. या नव्या दाढीच्या खोऱ्यात ब्लेड टाकले की दोन्हीकडून धार मिळे.  यासाठीचे पेटंट किंग जिलेट यांनी १९०४ मध्ये मिळवले.

(जिलेटचे दुधारी वस्तरे)

जिलेटचे दुधारी वस्तरे वापरण्यासाठी सुरक्षित आणि सोपे होते. वस्तऱ्यामधून कसलाही नफा न मिळवता पुन्हा पुन्हा लागणाऱ्या ब्लेडमुळे त्यावेळी नफा कमावला गेला. १९६० च्या सुरुवातीच्या वर्षात स्टेनलेस स्टीलचे ब्लेड बनवण्यास सुरुवात झाली. हे ब्लेड एकापेक्षा जास्त वेळा वापरता येत असत. यामुळे दाढी करण्यासाठी लागणारा खर्च कमी झाला. दाढी आता सोप्या पद्धतीने घरीच करता येत असल्याने न्हावी कामगारांची संख्या कमी होत गेली.

वस्तऱ्याच्या जडणघडणीत पुढचा टप्पा होता तो कार्ट्रिज वापरून बनवल्या गेलेल्या वस्तऱ्याचा. या रेझर्सची डिझाईन बनवताना ग्राहकाला ते वापरताना जास्तीत जास्त सोयीस्कर कसे होईल हा विचार केला गेला. या ब्लेडची रचना दुधारी वस्तऱ्याप्रमाणेच असली तरी यामध्ये फक्त ब्लेड न बदलता पुर्ण कार्ट्रिज बदलावे लागते. एकापेक्षा जास्त ब्लेड असणारे वस्तरेसुध्दा आता उपलब्ध आहेत. हे सगळे ब्लेड्स एका कार्ट्रिजमध्ये वस्तऱ्याच्या वरच्या भागात बसवले जातात. वस्तऱ्याचा हाच प्रकार म्हणजे तुम्ही-आम्ही दररोज वापरत असलेले रेझर.

(कार्ट्रिज वापरून बनवले गेलेले रेझर्स)

रेझर्सच्या उत्क्रांतीमध्ये रेझर्सचा आणखी एक प्रकार महत्त्वाचा आहे. तो म्हणजे इलेक्ट्रिक रेझर्स किंवा शेव्हर्स. या रेझर्सना शेविंग क्रिम, साबण आणि पाण्याची आवश्यकता नसते. औद्योगिक हेतूने पहिल्यांदा १९३७ मध्ये बनवले गेलेले हे रेझर डीसी मोटरच्या मदतीने काम करत असे. ही डिसी मोटर चालवण्यासाठी विद्युत उर्जेचा वापर केला जात असे. आधुनिक रेझर्समध्ये रीचार्ज करता येणारी बॅटरी वापरली जाते. इलेक्ट्रिक रेझर्समधे वापरण्यात येणारे ब्लेड हे बाकीच्या रेझर्सपेक्षा वेगळे असतात. काही गोलाकार फिरणारे ब्लेड्स वापरून हे रेझर्स बनवले जातात.

(इलेक्ट्रिक रेझर्स)

तसेच रेझर्स आता फक्त पुरुषांसाठीच मर्यादीत राहिले नसून स्त्रियासुद्धा त्यांचा आता वापर करतात. जिलेटने १९१५ साली महिलांसाठी विशेष रेझरची निर्मीती करून ते बाजारात आणले.

(महिलांसाठी रेझर)

अशा प्रकारे जवळ जवळ ६०००-७००० वर्षांचा प्रवास करून आज आपल्या हातात असलेले रेझर्स अस्तित्वात आले आहेत. रेझर्सच्या उत्क्रांतीचे हे टप्पे मानवाच्या विकासाचे टप्पेच आहेत. माशांचे खवले, गारगोटी अशा नैसर्गिक वस्तूंचा वापर करणारा माणूव आता इलेक्ट्रिक रेझर्सपर्यंत आला आहे. सुरक्षित आणि सोयीस्कर आयुष्य जीवनपध्दतीसाठी नेहमीच प्रयत्नशील असणारया माणवासाठी हा टप्पासुध्दा शेवटचा नसेल हे मात्र नक्कीच!!

 

लेखक : संकेत चिंचखेडे

सबस्क्राईब करा

* indicates required