चहाला  'टी किंवा 'चा' या दोन नावांनीच का ओळखतात? वाचा चहाच्या इतिहासाची गोष्ट!!

अमृततुल्य चहा.. ज्याच्याशिवाय दिवसाची सुरुवात पण करता येत नाही, असं आपल्या आयुष्याचा अविभाज्य बनलेलं उत्तेजक पेय!! मग त्यात गवती चहा, मसाला चहा, कटिंग, आलं घातलेला पावसातला चहा.. अशी त्याची बहुविध रूपं तर आपल्या खास आवडीची.  भारतात दार्जिलिंग, आसाम, मुन्नार..अशा बऱ्याच ठिकाणी चहाचे मळे आहेत.

सगळ्यांना माहित आहे की चहा ही खरं तर आपला शेजारी चीनची देणगी. पण मग तो भारतात ब्रिटिशांमुळं प्रसिद्ध कसा काय झाला? इतर देशांतल्या समोसा, बिर्याणी अशा अनेक पदार्थांना मोठ्या प्रेमानं आपलं म्हणणाऱ्या हिंदुस्तानात चहा इतक्या उशीरा का आला? आपण चहाला चहा का म्हणतो?  जगातल्या बहुतांश देशांत चहाला 'चा' किंवा 'टी' या दोन नावांनी का ओळखलं जातं?  आज या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही बोभाटाच्या वाचकांसाठी घेऊन आलो आहोत.

( स्रोत)

चहाला त्याचं नांव कसं मिळालं?
रशियात चहाला 'चाय' म्हटलं जातं. पोर्तुगीज त्याला 'चा' म्हणतात, तर त्याचा शेजारी असणाऱ्या स्पेनमध्ये म्हणतात 'ते'!! हा 'चा' की 'टी' हे कसं ठरवलं जातं? उत्तर सोप्पं आहे. चीनच्या ज्या भागातून चहा आयात केला गेला आहे, त्यावरून त्याला 'चा' किंवा 'टी' म्हटलं जातं. डचांशी प्रामुख्यानं व्यवहार करणाऱ्या 'फ्युजियान' प्रांतातून तो आला असेल, तर त्याला म्हणतात 'ते' किंवा 'टे'. त्याचंच युरोपात 'टी' किंवा तत्सम नावांत रूपांतर झालं. पण पोर्तुगालचा व्यवहार चीनच्या दुसऱ्याच भागासोबत होता. त्या कँटॉन भागात चहाला 'चा' हे नांव होतं. सध्या या कँटॉनचं नांव बदलून ग्वांझू झालं असलं तरी चहाला अजून तिथं 'चा'च म्हणतात. 
आता भारतात चहाला गुजरातीत 'चा' , हिंदीत 'चाय' आणि मराठीत 'चहा' म्हणतात म्हणजे भारतात त्याला पोर्तुगीजांनी आणला की काय?? 

भारतात चहा कसा आणि कुणी आणला?
हो, भारतात किंवा तेव्हाच्या हिंदुस्तानात चहाला ब्रिटिशांनी लोकप्रिय केला असला तरी चहा भारतात आणला तो पोर्तुगीजांनी. आता बघा, चीन आपला थेट शेजारी. पण हा चहा आला समुद्रमार्गे कालिकत बंदरातून. तिथून तो गुजरात, महाराष्ट्र, बंगाल आणि ओरिसामध्ये गेला. तिथं त्याला 'चा' म्हणू लागले. हळूहळू त्या 'चा'चं नांव काही ठिकाणी बदललं ते सोडा.. 

(सिल्क रुट - स्रोत  )

चहाला 'चाय' हे नांव कसं पडलं?
पण 'चाय' हे नांव जरा लांबचा प्रवास करून भारतात आलं.. सिल्क रूट नावाचा एक व्यापारी मार्ग युरेशिया (युरोप+ आशिया)ला पौर्वात्य-पाश्चात्य देशांना, तसंच कोरिया जपानला जोडत अगदी भूमध्यसमुद्रापर्यंत जात असे. तर 'चा' उत्तर चीनमधून या सिल्क रूटमार्गे पर्शिया म्हणजे आताच्या इराणमधल्या एका राज्यात गेला. तिथून त्यानं पर्शियन 'यि' या शब्दाचं शेपूट 'चा'ला जोडून घेतलं. तिथून मुघलांना ती 'चायी' हिंदुस्तानात आणली. मग कालांतरानं 'चायी'चं 'चाय' झालं. 

पाह्यलंत, आपला साधासुधा चहा केवढा लांबचा प्रवास करून आपल्यापर्यंत पोचला ते!!

(सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.) 
©बोभाटा

सबस्क्राईब करा

* indicates required