computer

विषकन्या ते हनी ट्रॅप-एक प्रवास (भाग -१)

हेरगिरीसाठी वापरण्यात येणार्‍या सर्वात जुन्या युक्तीला आजकाल ’हनी ट्रॅप’ असे नाव पडले आहे. असे म्हणतात की, अस्वलाला पकडण्यासाठी शिकारी मधाचा वापर करतात. मधाचा वास हुंगत हुंगत अस्वल येते आणि सापळ्यात अडकते. त्याला म्हणतात हनी ट्रॅप. शत्रू देशातील महत्त्वाच्या व्यक्तींना जसे की, राजकारणी, संशोधक, सैनिक यांच्यासाठी अशाप्रकारचे सापळे रचले जातात. सापळ्यांमध्ये आता या मधाची जागा स्त्रीने घेतली आहे येवढेच. अर्थात काही प्रसंगी पुरुषांचा वापर देखील हनी ट्रॅप म्हणून करण्यात आल्याची उदाहरणे आपल्याला आढळतात.

सुंदर आणि चतुर स्त्रीचा वापर करून अशा व्यक्तींना मोहात पाडणे, त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती मिळवणे, प्रसंगी त्यांना ब्लॅकमेल करणे हे आता हेरगिरीतील एक महत्त्वाचे शस्त्र म्हणून समोर आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून ’हनी ट्रॅप’ हा विषय आपल्याकडे प्रचंड चर्चेत आलेला आहे.अनेकांना तर हा नक्की काय प्रकार आहे याची देखील माहिती नसते. खरेतर हनी ट्रॅप हा प्रकार भारतीयांसाठी तरी फारसा अनोळखी नाही. पूर्वीच्या काळी आपण त्याला ’विषकन्या’ नावाने ओळखायचो. विषकन्या म्हणजे एक अशी स्त्री, जिला बालपणापासूनच थोड्या थोड्या प्रमाणात विषाचे सेवन करायला दिले जात असे आणि तरुण होईपर्यंत तिचे रूपांतर एका विषकन्येत झालेले असे. ही विषकन्या विषारी वृक्ष, विषारी प्राणी यांच्यासहवासात जास्त रमत असे. विषकन्या अत्यंत चाणाक्ष, रुपवान आणि धाडसी असत. त्याकाळात अनेक राजे या विषकन्यांचा वापर आपल्या शत्रूची गुपिते मिळवण्यासाठी, प्रसंगी शत्रूला ठार करण्यासाठी देखील करत असत.विषकन्या थोड्या प्रमाणात शस्त्रविद्या, नृत्यकला, शास्त्र, संगीत अशा विषयात देखील पारंगत असत. आपल्या शिकारीला मोहित करण्यासाठी, आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी त्या ह्या सर्वांचा आधार घेत असत. काही विषकन्या तर इतक्या प्रभावी होत्या की, त्यांचा निःश्वास देखील समोरच्या ठार मारण्यासाठीपुरेसा असायचा असे सांगितले जाते.

मगध साम्राज्यात अशा विषकन्यांपासून चाणक्याने चंद्रगुप्ताला अनेकदा सावध राहण्याचा सल्ला दिल्याचे तर काही प्रसंगी त्याचे प्राण वाचवल्याचे देखील आपल्याला वाचायला मिळते.या संदर्भात काही कथा देखील प्रसिद्ध आहेत. एका कथेत युद्धविजय मिळवून परत येत असलेल्या चंद्रगुप्त मौर्याकडे सम्राट धनानंदच्या एका मंत्र्याने विषकन्या पाठवली. मात्र ती रथासमोर येताच चाणक्याने तिला थांबवले आणि चंद्रगुप्ताचा मित्र राजा प्रवर्तक ह्याला तिचा स्वीकार करण्याची विनंती केली. जसा प्रवर्तकाने तिचा हात हातात घेतला, तिच्या हाताचा घाम त्याच्या हाताला लागला आणि क्षणात त्याच्या शरीरात विषाचा फैलावहोऊन तो मृत्युमुखी पडला. प्रवर्तकाच्या मृत्यूने चाणक्याने एका दगडात दोन पक्षी कसे मारले, ते पुढे कधीतरी सांगेन.

चाणक्याने ह्या प्रसंगातून धडा घेतला आणि चंद्रगुप्ताला रोज थोडे थोडे विष जेवणातून देण्यास सुरुवात केली. रोज या विषाची मात्रा काही प्रमाणात वाढवली जात असे. चुकून जरपुन्हा कधी चंद्रगुप्त एखाद्या विषकन्येच्या संपर्कात आला, तरी तो सुरक्षित राहावा ह्यासाठी ही योजना होती. मात्र चंद्रगुप्ताला ह्याबद्दल काही माहिती नव्हती. अशातच एकदा त्याचीगर्भवती पत्नी त्याच्या ताटात जेवायला बसली आणि नको ते घडले. विषाच्या प्रभावाने महाराणी बेशुद्ध झाली. चाणक्याने काय ते ओळखून वेळीच राजवैद्यांना बोलावले आणि तिची प्रसूती पार पाडून बालकाला वाचवले. मात्र राणीचा मृत्यू झाला. विषामुळेबालकाला फार काही हानी पोहोचली नाही, मात्र त्याच्या कपाळावर एक निळी खूण मात्र निर्माण झाली. ही खूण पाहूनच म्हणे चंद्रगुप्ताने त्याचे नाव बिंदुसार ठेवले.

 

केजीबीचे हेर : हनी ट्रॅप आयोजित करणारे जोडपे

काळानुसार हनी ट्रॅपचे स्वरूप कसे बदलत गेले, सध्याच्या काळात जगभरातील काही प्रमुख राजकारणी, सैनिक, संशोधक हनी ट्रॅपमध्ये कसे अडकले, त्यांचा गैरफायदा कसा घेतला गेला हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत.जोडीलाच हनी ट्रॅपमध्ये फसवण्यातआलेल्या इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींनी तो डाव फसवणार्‍यांवरच कसा उलटवला, त्याची
रंजक कहाणी देखील आहेच.
(क्रमशः)
-प्रसाद ताम्हनकर

सबस्क्राईब करा

* indicates required