computer

एक राजा, एक ब्रिटिश, आणि एक राजज्योतिषी -४

आप्पा आणि वेंकटाप्पा
टेलर शोरापूरमध्ये दाखल झाला.सूत्रे हाती घेतली आणि त्याचा दररोज पाला पडू लागला तो नंग्या तलवारी घेऊन हिंडणार्‍या बेरडांशी राणीशीही त्याच्या भेटी होऊ लागल्या, टेलर मराठी, हिंदी आणि तेलुगू जाणत असल्याने त्याला राणीशी संवाद करणे सहज जमू लागले. हळूहळू टेलर शोरापुरात पाय रोवू लागला.राणीशी चातुर्याने वागून त्याने खंडणीचा एक लाखांचा हप्ताही वसूल केला.आठ वर्षांच्या राजाचा राज्याभिषेक झालेला नव्हता.तोही टेलरने समारंभपूर्वक घडवून आणला.राजाचे जावळ समारंभपूर्वक काढण्यात आले. ह्या सर्वांमध्ये छोट्या वेंकटाप्पाची आणि टेलरची चांगली गट्टी झाली. टेलर राजवाड्यात आला की आप्पा म्हणत तो बालराजा टेलरला येऊन बिलगे. त्याला प्रश्न विचारे. मनातल्या तक्रारी सांगे. आईच्या तक्रारी सांगे.टेलर त्याला इंग्रजी शिकवत असे.जणू टेलरची त्याला शिकवणीच होती.अनेक पुस्तके आणि धडे टेलरने वेंकटाप्पाकडून गिरवून घेतले. राणीचा प्रियकर भरदिवसा राजवाड्यात येत असे, आणि त्यांची थेरे तिथे चालत. वेंकटाप्पा लहान होता, पण त्या वयातही त्याला ते आवडत नसे. तेही तो टेलरला सांगत असे.
 

एकदा राणीने वेंकटाप्पाला बेदम मारले. त्याच वेळी नेमका टेलर तिथे गेला. टेलरला पाहताच वेंकटाप्पा धाय मोकलून रडत टेलरकडे गेला. टेलरने त्याला उचलून घेतले. समजावले. राणीला समजवावे हा अधिकारच टेलरकडे नव्हता. तो निजामाच्या आणि ब्रिटिश सैन्याच्या कामगिरीवर तिथे आला होता. त्याला त्याचे कर्तव्य बजावायचे होतेच. वेंकटाप्पाचा राज्याभिषेक झाल्यावर पालक राजा म्हणून पिडनायकाची रितसर नेमणूकही टेलरने केली. ह्या सार्‍या कामामुळे बेरड मंडळींमध्ये टेलर लोकप्रिय झाला.बेरडांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणावर होत्या. चोर्‍या, दरोडे, हत्या, दंगली ह्या नेहमीच्याच होत्या. दसर्‍याला संस्थानात मोठा उत्सव होत असे. त्यावेळी राजाकडून भेटवस्तू जनतेला मिळत.मोठा खर्च केला जाई.हत्तीवर बसून राजा शहरभर फिरे. उंट,घोडे वगैरे लवाजमा बरोबर असे.अशा एका उत्सवी मिरवणुकीत पिडनायकच्या लोकांकडून वेंकटाप्पावर हल्ला होईल, व त्याला मारले जाईल अशी माहिती टेलरला मिळाली. यातूनही टेलरने मार्ग काढला. पिडनायक व्यसनी आणि आळशी असा दोन्ही होता. अशिक्षित तर तो होताच. पिडनायक आणि राणी यांच्यात सामंजस्य टिकवून ठेवणे हाही एक मोठाच उद्योग टेलरसाठी होता.

वेंकटाप्पाचे भविष्य
एकदा राणी आजारी पडली. ब्रिटिश सेनाधिकारी आणि चंदूलालसह निजामाचे सर्व अधिकारी यांना राणीची ब्याद जाईल तर हवेच होते. ते सारे टेलरच्या मागे होते की काही करून ह्या बाईचा एकदाचा सोक्षमोक्ष लावा. पण टेलरने त्या दिशेने कोणतीही कारवाई कधीच केली नाही. याचे कारण म्हणजे राणीला मानणारा फार मोठा बेरडांचा समाज शोरापुरात होता. ते पिडनायकचे मानत नसत. पण राणीने काहीही सांगितले तर त्यांना ते शिरसावंद्य असे. अशा स्थितीत राणीचे अस्तित्व संपवणे योग्यही नव्हते, आणि शक्यही नव्हते. मात्र राणीच्या व्यभिचाराची थेरे जनता कशी खपवून घेते ही बाब टेलरला आश्चर्याची वाटे राणी आजारी पडली आणि तिचा आजार वाढला. ती अंथरुणाला खिळली. राणीने टेलरला भेटायला बोलावले. टेलर राजवाड्यात गेला तेव्हा वेंकटाप्पा पडलेल्या चेहर्याने आप्पा म्हणत टेलरला बिलगला. आई म्हणते की ती मरणार आहे. ती मेली तर मी कुठे जाऊ? असा निष्पाप प्रश्न वेंकटाप्पाने टेलरला विचारला. टेलरने त्याला धीर दिला. विषय बदलला. त्याचे डोळे पुसले. त्याच्या अभ्यासाची चौकशी केली. हे बोलणे चालू असताना राणीने आतून टेलरला आत बोलावले. ती अंथरुणावर होती. मरणासन्न असावी तशी तिची मुद्रा झालेली होती. टेलर आल्यानंतर तिने राजज्योतिषालाही बोलावून घेतले. आसपासच्या सर्व नोकर-नोकराणींना जाण्याचा हुकूम केला. आता राणी, राजज्योतिषी आणि टेलर तिघेच उरले.
 

टेलरसाहिबांना ते दाखवा. राणीने राजज्योतिषांना हुकूम केला.
राणीसाहेब, टेलरसाहेब बाहेरचे आहेत. त्यांना ते दाखवणे योग्य नाही. राजज्योतिषांनी सांगण्याचा प्रयत्न केला.त्या आजारी अवस्थेतही राणीसाहेबांच्या चेहर्यावर भयंकर क्रोध आला. टेलर आत्मचरित्रात लिहितो, ’असा भीषण चेहरा मी पूर्वी कधीच पाहिला नव्हता


राजज्योतिषांचा नाइलाज झाला. एका मखमली पेटीतून त्यांनी एक लाल रंगाचा रेशमी लखोटा बाहेर काढला. ती वेंकटाप्पाची कुंडली होती. टेलरने त्यावर नजर टाकली.
हे बघा, राणी बोलू लागली, वेंकटाप्पाचे आयुष्य फक्त 23 वर्षांचे आहे. चोविसावे वर्ष तो पाहू शकणार नाही. असा मुलगा झाला नसता तर बरं झालं असतं. असे म्हणत राणीने वेंकटाप्पाला शिव्यांची लाखोली वाहायला सुरुवात केली. टेलर लिहितो की ’तिच्या अर्वाच्च शिव्या आणि निर्भर्त्सना अशा शब्दांत होती की जिचे वर्णन मी करू शकणार नाही. ’
टेलरने ज्योतिषाची मर्यादा सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर राणीने सांगितले, ही कुंडली आम्ही बनारसलाही मोठ्या पंडितांकडे पाठवली होती. त्यासाठी आम्ही काही लाख रुपये खर्च केलेत. विचारा ह्या राजज्योतिषांना. तिच्या म्हणण्यावर राजज्योतिषांनी विषण्णपणे मान हलवली.


ती कुंडली टेलरच्या हाती देऊन राणीने राजमुद्रेचा शिक्का मारून ती सीलबंद करण्यास सांगितले. राणी, टेलर आणि राजज्योतिषी यांच्या सह्या होऊन ती पेटी टेलरच्या हाती आली. राणीला भेटून टेलर बाहेर येताना छोटा वेंकटाप्पा पुन्हा धावत आला. काय म्हणत होती आई ? त्याने टेलरला प्रश्न विचारला. काय आहे त्या पेटीत ? दुसरा निष्पाप प्रश्न.
काही नाही. कामाचे कागद आहेत त्यात. टेलरला लहानग्याची समजूत काढणे अवघड गेले नाही.
पण, पुढे त्या आजारातून राणी उठली. बरी झाली. पुन्हा तिचे उद्योग सुरू झाले.
आणि वेंकटाप्पा मोठा झाला.

लेखकःमाधव शिरवळकर

सबस्क्राईब करा

* indicates required