computer

साध्या दिसणाऱ्या रंगीबेरंगी फुग्यांमुळे एका संपूर्ण शहरावर संकट कसं कोसळलं? १९८६ च्या बलूनफेस्ट मध्ये काय घडलं होतं?

फुगे म्हटल्यानंतर तुम्हाला काय आठवेल? बालपणीच्या आठवणी, फुगे फुगवाताना आणि ते हवेत उडवताना होणारा आनंद, विविध आकाराचे आणि रंगाचे फुगे विकणारा फुगे विक्रेता, असे आनंददायी चित्र डोळ्यासमोर उभे राहील. अमेरिकेच्या क्लीव्हलँड शहरातल्या लोकांना मात्र फुगे म्हटल्यावर एका भयानक घटनेची आठवण होईल. या घटनेमुळे त्यांच्या शहरावर उदासीचे ढग पसरले होते. काय होती ती घटना आणि त्याचा फुग्यांशी काय संबंध? चला जाणून घेऊया या लेखातून.

तो दिवस होता २७ सप्टेंबर १९८६ चा. क्लीव्हलँड शहराची एक चांगली प्रतिमा जगासमोर यावी म्हणून या शहरातील एका संस्थेने बलूनफेस्ट आयोजित करण्याची एक भन्नाट कल्पना शोधून काढली. खरे तर याच्या आदल्याच वर्षी म्हणजे १९८५ रोजी डिस्नेलँडचे संस्थापक वॉल्ट डिस्ने यांच्या ८५व्या जन्मदिवसानिमित्त त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी डिस्नेलँडमधील त्यांच्या कर्मचाऱ्यांनी लाखो फुगे आकाशात उडवले होते. अगदी त्याच पद्धतीने दीड कोटी फुगे आकाशात उडवून ‘युनायटेड वे’ या चॅरिटेबल ट्रस्टसाठी निधी गोळा करणे आणि क्लीव्हलँड शहराची प्रतिमा उंचावणे या उद्देशाने क्लीव्हलँड शहरातील काही दानशूर व्यक्तींनी हा कार्यक्रम आखला होता, ज्याला ‘युनायटेड वे’ या सामाजिक संस्थेचा पाठींबा होताच.

सहा महिने आधीपासूनच या कार्यक्रमाच्या तयारीला सुरुवात झाली. ज्या दिवशी हा फुगे उडवण्याचा कार्यक्रम होणार होता त्याच्या आदल्याच दिवशी क्लीव्हलँड परिसरात वादळ येऊन गेले होते त्यामुळे हवामान काहीसे बिघडलेलेच होते. ओहायो राज्यातील या शहराला १०० किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. शिवाय या शहरात एरी नावाचा एक मोठा तलावही आहे. या तलावात मासेमारी चालते.

२७ सप्टेंबर १९८६ रोजी हा बलूनफेस्ट पार पडणार होता आणि त्याच्या आदल्या रात्रीच वादळाची सूचना मिळाली होती. आयोजकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून खरे तर हा कार्यक्रम रद्द करायला हवा होता, पण तसे न करता त्यांनी कार्यक्रमाची वेळ बदलली. आधीच्या नियोजनानुसार हा कार्यक्रम संध्याकाळच्या वेळेत होणार होता त्याऐवजी तो दुपारी घेण्यात आला. या साठी दीड ते पावणे दोन दरम्यानची वेळ निश्चित करण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच वेळी एकाच ठिकाणाहून फुगे सोडण्याची ही पहिलीच घटना होती आणि गिनीज बुकमध्येही या घटनेची नोंद करण्यात आली.

ठरलेल्या नियोजनानुसार हे दीड कोटी फुगे फुगवण्यासाठी २५०० स्वयंसेवी कार्यकर्ते जमलेले होते. या आनंददायी घटनेचा साक्षीदार होण्यासाठी संपूर्ण क्लीव्हलँड शहर त्या दिवशी चौकात जमले होते. सर्वजण आनंदात होते, आपल्या शहराच्या नावाचा जयघोष करत होते. सगळे फुगे एकाच वेळी आकाशात सोडता यावेत यासाठी एक भले मोठे नेटचे जाळे बनवून घेण्यात आले होते. शहराच्या मध्यभागी हे जाळे ठेवून तेथून हे फुगे आकाशात सोडण्यात आले.

ठरल्याप्रमाणे हेलियम भरलेले हे फुगे आकाशात जाऊ लागले. पाहता पाहता आकाशात रंगीत रंगीत फुग्यांचा एक भला मोठा ढग तयार झाला. या फुग्यातुन हवा निघून जाईपर्यंत हे फुगे आकाशात तरंगातील अशी आयोजकांची अपेक्षा होती. बदलेल्या हवामानमुळे शहरात अचानक पाऊस सुरु झाला आणि फुगे वर जाण्याऐवजी खाली येऊ लागले. दीड कोटी फुगे उलट्या दिशेने आलेले पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. सोडताना तरी हे फुगे एकाच ठिकाणाहून सोडण्यात आले होते, पण आता त्यांच्यावर कुणाचेच नियंत्रण नसल्याने ते अस्ताव्यस्त पद्धतीने खाली येऊ लागले. काही फुगे एरी तलावात येऊन पडले, काही फुगे रस्त्यात येऊन पडू लागले. विमानतळाच्या धावपट्टीवरही या फुग्यांनी गर्दी करून ठेवली.

वरून खाली येणाऱ्या या मोठमोठ्या आकाराच्या फुग्यांमुळे रस्त्यावरून जाणाऱ्या मोटारगाड्यांना अडथळा निर्माण झाला. रस्त्यात फुगे साचल्याने ट्राफिक जाम झाले. अचानक फुगे समोर आल्याने वाहन चालकांचा गोंधळ उडाला आणि कित्येक अपघातांना निमंत्रण मिळाले.

या घटनेच्या आदल्याच दिवशी समुद्रात मासेमारीसाठी गेलेले दोन मच्छिमार घरी परतले नव्हते. त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलिसात नोंदवली होती. २७ सप्टेंबर रोजीच या मच्छिमारांना समुद्री सुरक्षा रक्षकांनी या मच्छीमारांची शोध मोहीम हाती घेतली होती. इतक्यात सगळ्या समुद्रात रंगीबेरंगी फुगे येऊन पडले. मच्छीमारांनी नारिंगी रंगाची वॉटरप्रुफ जॅकेटस् घातली होते. त्या अनुषंगाने कुठे नारिंगी रंग दिसला की त्या दिशेने बोट न्यायची असे या सुरक्षारक्षकांचे नियोजन होते. तेवढ्यात सगळ्या पाण्यात फक्त फुगेच फुगे आणि त्यात नारिंगी रंगाचे किती याचा तर शोध घेणेच कठीण. मग त्या दोन मच्छिमारांचा पत्ता कुठून लागणार!! पाण्यावर तरंगणाऱ्या फुग्यांच्या गर्दीतून वाट काढणेही अशक्य झाल्याने सुरक्षा रक्षकांनी त्या दिवशीची शोधमोहिम रद्द केली आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा शोध सुरू घ्यायचा असे ठरले. मात्र दुसऱ्या दिवशी त्यांना शोध घेण्याची गरजच उरली नाही, कारण त्या दोघांचे मृतदेहच किनाऱ्यावर आले होते. त्याच दिवशी कदाचित ती फुग्यांची घटना घडली नसती तर ते मच्छिमार जिवंत सापडले असते.

या मच्छीमारांच्या घरच्या लोकांनी युनायटेड वे वर नुकसान भरपाईचा दावा केला आणि युनायटेड वेला या दाव्याच्या बदल्यात लक्षावधी रुपयांची किंमत मोजावी लागली. ही रक्कम भरून त्यांनी न्यायालयाबाहेरच हा खटला मिटवून घेतला. विमानतळाच्या धावपट्टीवर फुग्यांचा थर साचल्याने काही काळ हवाई वाहतून रद्द करण्यात आली. धावपट्टीवर साचलेले फुगे हटवण्यासाठी बुलडोझर बोलवावा लागला.

फुगे सोडताना क्लीव्हलँडच्या नागरिकांमध्ये जो आनंद होता तो पाहता पाहता मावळला. सगळ्या शहरभर फक्त फुग्यांचे साम्राज्य पसरले. करोडोंच्या संख्येने पसरलेल्या फुग्यांनी क्लीव्हलँडच्यापर्यावरणावर गंभीर परिणाम घडून आला. समुद्रात आणि तलावात पसरलेल्या फुग्यांमुळे जलजीवन विस्कळीत झाले.

हवामानाचा अंदाज पाहून जर त्या दिवशीच हा कार्यक्रम रद्द करून पुढे ढकलला गेला असता तर कदाचित ही दुर्घटना टळली असती. म्हणूनच आता फुगे म्हटल्यावर क्लीव्हलँडच्या नागरिकांना निश्चितच ही भयानक दुर्घटना आठवून घाम फुटत असेल.

 

लेखिका: मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required