computer

CIA, MI5, KGB, RAWआणि IB यांसारख्या संघटनेत गुप्तहेरांची भरती अशी केली जाते!!

लोकांना शेरलॉक होम्स, जेम्स बाँड, आपला व्योमकेश बक्षी हे सगळे लोक तर आवडतातच, पण त्यांचं एक था टायगरसारख्या सिनेमांवरचं प्रेम बघून गुप्तहेरांच्या कथा आणि सिनेमे जरा जास्त आवडतात की काय असं वाटतं. असं होण्यात पुस्तकं-मालिका-सिनेमांचा वाटा मोठा आहे हे ही खरं. गुप्तहेरांच्या जागीच खिळवून ठेवणाऱ्या थरारक मोहिमा आपण आजपर्यंत 'मिशन इम्पॉसिबल'सारख्या अनेक चित्रपट आणि कांदंबऱ्यांमधून पाहिल्या-वाचल्या असतील. जगभर पसरलेलं धाडसी हेरांचं जाळं‌ गुप्तहेर संघटनांना राष्ट्राच्या अंतर्बाह्य सुरक्षेत मोलाची मदत करत असतं. पण तुम्ही कधी या गुप्तहेर खात्यात काम करण्याचा विचार केलाय का? साहजिकच हेर खात्यात भरती होणं तितकंसं सोपं काम नाही. पण आपण कल्पना‌ करतो तितकं ते गूढही नाही. या पाहूया जगातल्या मोठमोठ्या गुप्तहेर संघटना आपल्या कर्मचाऱ्यांची निवड नेमकी कशी करतात ते...

MI5 - ब्रिटन

MI5 ब्रिटनमधली ही देशांतर्गत गुप्तहेर संस्था आहे. आपले जेम्स बाँडकाका परदेशात गुप्तहेरगिरी करत असतात कारण ते MI6मध्ये काम करतात. आपण सध्या लोक MI5 मध्ये कसे जातात हे पाहू.

MI5 ही ब्रिटिश गुप्तहेर आणि सुरक्षा संघटना आहे. या संघटनेच्या वेबसाईटवर भेट दिल्यास तिथं मोबाईल सर्व्हेलन्स ऑफिसर, कव्हर्ड टेक्निकल स्पेशालिस्ट, आयडेन्टी ॲन्ड ॲक्सेस‌ मॅनेजमेंट ॲनालिस्ट अशा अनेक पदांच्या भरतीबाबत माहिती मिळते. यासाठी सगळ्यात आधी तुमच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व असायला हवं. तुमच्या पालकांपैकी एक व्यक्तीही ब्रिटनची नागरिक असायला हवी. जर तुम्हाला रशियन, मन्डेरियन म्हणजे शुद्ध मराठीत चायनीज, तुर्की, पश्तो, सिल्हेती, सोरानी अशा विदेशी भाषा येत असतील तर तुम्हाला इथं प्राधान्य दिलं जातं.

लोकांमध्ये सहज मिसळण्याठी तुमचं दिसणंही अगदी सामान्य असायला‌ हवं. शरीराच्या दर्शनी भागांवरचे टॅटू, पियर्सिंग, भडक रंगवलेले केस, आणि विचित्र वेषभुषा करणारे या नोकरीस अपात्र समजले जातात. कारण ते लगेच वेगळे ओळखू येतात आणि लक्षात राहतात. तुम्ही या गुप्त पदासाठी अर्ज करताय हे तुम्ही फक्त तुमच्या एका जवळच्या कुटूंब सदस्याला सांगू शकता, तोही ब्रिटिश नागरिक असायला हवा. अर्जदारांच्या आर्थिक व्यवहार, आरोग्य आणि इतर अनेक प्रकारच्या तपासण्या होतात. प्रत्येक संभाव्य हेरानं 'Developed Vetting' ही ब्रिटिश सरकारची सर्वोच्च मंजूरी मिळवणं आवश्यक असतं.

Central Ingtelegence Agency (CIA) - अमेरिका

अमेरिकेत FBIमधून देशांतर्गत, तर CIAच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर गुप्तहेरांचं जाळं राखून आहे. MI5 प्रमाणेच CIA मध्ये नोकरीसाठी अर्ज करणंसुध्दा एक कठीण आणि दीर्घ प्रक्रिया आहे. इथे अनेक चाचण्यांसोबत तुमची पार्श्वभूमी तपासली जाते आणि हे बॅकग्राऊंड चेक कधीकधी वर्षभर चालतं. CIA मध्ये काम करण्यासाठी तुम्ही अमेरिकेचे नागरिक असायला हवं. कॉलेज पदवीधारक, आणि अरेबिक, कोरियन, पश्तो, मन्डेरियन, रशियन, फारशी, सोमालीयन अशा भाषा जाणणाऱ्यांना प्राधान्य दिलं जातं.

इथं काम करण्यासाठी तुमचं व्यक्तिमत्व आणि पार्श्वभूमी अत्यंत चांगली असायला हवी. बॅकग्राऊंड चेकध्ये तुमची विश्वसनीयता, चरित्र, विश्वासार्हता, भूतकाळ अशा प्रत्येक अंगाने तपासणी होते. लाय डिटेक्टर यंत्राचा वापरही करून तुमची सत्यता तपासली जाते. तुम्ही अंमली पदार्थांचं सेवन करत असाल किंवा अगदी इंटरनेटवरून तुम्ही एखादी फाईल बेकायदेशीररित्या डाऊनलोड केली असेल, तरी तुम्हाला अपात्र ठरवलं जातं.

Canadian Security Intelligence Service (CSIS) - कॅनडा

ऑनलाईन जाहिरातीनुसार CSIS मध्ये भरती होणंसुध्दा एक कठिण आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. या जागा फक्त कॅनेडियन नागरिकांसाठीच आहेत आणि इतर संघटनांप्रमाणे इथेही विदेशी भाषा अवगत असणाऱ्यांना, विशेषतः इंग्रजी-फ्रेंच द्विभाषिकांना अग्रक्रम दिला जातो.

CIA आणि MI5 सारखा CSIS मध्ये शिक्षण हा महत्त्वाचा निकष नाहीये. इथं काही पदं ही कॉलेजच पदवी नसणाऱ्यांसाठीही उपलब्ध आहेत. अर्जाच्या प्रक्रियेत १० टप्पे आहेत. या टप्प्यांत प्रारंभिक चाचणीपासून सुरक्षा तपासणी मंजूरी आणि वेगवेगळ्या आरोग्य तपासण्या, भाषाज्ञान, सखोल मुलाखतींचा समावेश होतो. इथं काम करण्यासाठी तुम्ही मानसिकरित्या सदृढ असायला हवं. उमेदवारानं त्याच्या आर्थिक बाबींविषयी स्पष्टीकरण, बोटांच्या ठशांचे नमुने, आणि सुरक्षाविषयक मुलाखती देणं आवश्यक आहे. शेवटच्या टप्प्यात उमेदवाराच्या सत्यता पडताळणीसाठी पॉलीग्राफ टेस्ट द्यावी लागते.

Australian Secret Intelligence Service (ASIS) - ऑस्ट्रेलिया

ASIS ने सुद्धा युके, अमेरिका, कॅनडासारखीच भरतीसाठी ‌उपलब्ध जागांबाबत ऑनलाईन जाहिरात दिलेली आहे. यासाठी उमेदवार हा ऑस्ट्रेलियन नागरिक असायला हवा. कॉलेज स्तरावरची पदवी आणि मन्डेरीयन, अरबी भाषेचं ज्ञान असलेल्यांना प्राधान्य दिलं आतं. त्याचबरोबर उमेदवार ASIS साठी अर्ज करतोय हे त्याच्या कुटूंबातील सदस्यांनाही कळू नये यासाठी सावधगिरी बाळगावी लागते. ही प्रक्रिया खुपच दीर्घ असल्यानं यासाठी उमेदवारांमध्ये खूपच संयम असायला हवा. इथेही उमेदवाराची प्रत्येक बाजूने तिहेरी तपासणी केली जाणे. तुमच्या बॅकग्राऊंड चेकमध्ये तुमचे नातेवाईक आणि जवळच्या मित्रांचीही तपासणी होते. एकंदरीत पाहाता ही नोकरी मिळवणं इतकं कठीण आहे की १०० उमेदवारांमधून फक्त एक व्यक्ती यासाठी पात्र ठरते.

Foreign Intelligence Service (SVR) - रशिया

रशियाची जूनी आणि कुख्यात अशी KBG ही गुप्तचर संस्था विसर्जीत करून १९९१ मध्ये SVR निर्माण केली गेली. पण शीतयुध्दाच्या काळात जसे हेर भरती केले जायचे, तीच पध्दत आजही SVR वापरते असं सांगितलं जातं. SVR परदेशातल्या रशियन नागरिकांना, खासकरून अमेरिकेतल्या नागरिकांना हेरून त्यांची सखोल माहिती घेते, त्यानंतर त्यांना वेगवेगळी प्रलोभनं देऊन हेरगिरी करण्यासाठी तयार केलं जातं. जे यासाठी तयार होत नाहीत त्यांना धमक्या देऊन भरती केलं जातं. आणि तरीही जे तयार होत नाहीत त्यांच्यावर खोटे आरोप लावले जातात. SVR च्या वेबसाईटवर मात्र फक्त दुहेरी नागरिकत्व नसलेल्या रशियन व्यक्तीच SVR च्या एजंट बनू शकतात असं सांगितलंय. या शिकाऊ हेरांसाठी SVR गुप्त ट्रेनिंग सेंटर्स चालवते जिथं त्यांना हेरगिरी आणि तपास कौशल्य, शस्त्रास्त्रं चालवणं, आणि वेगवेगळ्या भाषाही शिकवल्या जातात.

Reasearch and Analysis Wing (RAW) आणि Intelligence Beuro (IB) - भारत

आपल्या देशाच्या RAW (रॉ) आणि IB या गुप्तचर संस्थांमध्ये काम करण्यासाठी मात्र प्रत्यक्ष भरती न होता भारतीय सेना, पोलिस किंवा प्रशासकीय सेवेत उत्तम कामगिरी बजावणारे अधिकारी भरती केले जातात. यासाठीही उमेदवाराची कठीण स्तरावर मानसिक आणि शारीरिक तपासणी, परिक्षा आणि मुलाखत होते.

 

एकूणात पाह्यलं तर असं दिसतं की देशासाठी गुप्तहेर होणं सोपं नाही. त्यासाठी चांगली स्वच्छ पार्श्वभूमी तर हवीच आणि वेगवेगळ्या भाषांमधलं कौशल्य असायला हवं. त्यातही तुम्ही पाह्यलं तर मँडेरिन म्हणजेच चायनीज, अफगाणिस्तान आणि जवळच्या भागांत बोलली जाणारी पश्तो, अरेबिक या भाषा जाणणाऱ्यांना विशेष प्राधान्य आहे. कारण अर्थातच उघड आहे. हो ना?

सबस्क्राईब करा

* indicates required