computer

कोण आणि कसं ठरवतं सोन्याचा भाव?? आजवर जगात यात कोणाचे हात पोळले आणि कोणते घोटाळे झाले?

डॉलरची किंमत दिवसेंदिवस वाढत जाते आहे, सोन्याच्या भावाने ४५ हजारांचा टप्पा पार केला आहे, तर दुसरीकडे कोविडचा विळखा दिवसेंदिवस घट्ट आवळत जातो आहे. येणार्‍या आर्थिक चणचणीची ही लक्षणे डोळ्यासमोर दिसत असतानाही माणसांची सोनं विकत घेण्याची भूक काही मरत नाही असं चित्र सध्या दिसत आहे. जे खाता येत नाही, जे औषधात कामाचे नाही,  जे सुरक्षित ठेवण्यासाठी खर्च करावा लागतो, ज्यावर व्याजही मिळत नाही अशी सोन्यातली गुंतवणूक माणसं का करतात हा प्रश्न मनाला विचारला, तर एकच उत्तर मिळते,"अगदी काळ्या मध्यरात्रीसुध्दा विकून पैसे उभे राहतात, म्हणून सोनं घ्यायचं!" अशा सोन्याचे भाव कोण आणि कसे ठरवतं हा प्रश्न मात्र कोणीही विचारताना दिसत नाही. जे विचारतात त्यांना उत्तर मिळत नाही. तर अशा अवघड प्रश्नांची उत्तरं समजून घेण्यासाठी आजचा बोभाटाचा लेख वाचावाच लागेल.

सर्वप्रथम एक धक्कादायक बाब तुमच्या नजरेस आणून द्यायची आहे. ती म्हणजे सोन्याचा भाव जगातले कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्यासाठी कोणतेही कायदेशीर कलम नाही. सोन्याचा भाव ठरवणं केवळ बाजाराच्या हातात आहे. ज्या-ज्या सरकारने सोन्याच्या भावावर स्वत:ची सत्ता चालवण्याचा प्रयत्न केला, त्यांचे हात भाजले आहेत असा इतिहास आहे. चला तर मग, मूळ विषयाला हात घालू या! कोण ठरवतं सोन्याचा भाव?

बरोब्बर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचा बाजारभाव निश्चित करण्याची पध्दत सुरु केली. लंडनच का? कारण तेव्हा सर्व जगात ब्रिटिशांचीच सत्ता होती. त्या पाचांमध्ये रोथ्सचाइल्ड कुटुंब त्याकाळातले सर्वात श्रीमंत कुटुंब होते. म्हणून त्यांच्या ऑफिसात बसून हा भाव ठरवण्यात आला. हा पहिला भाव म्हणजे 'गोल्ड फिक्स' होता- एक 'ट्रॉय औंस'ला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड. आता 'ट्रॉय औंस' म्हणजे किती? तर ३१.१०९ ग्रॅम. त्याच काळात आपण तोळा, मासा, गुंज या परिमाणात सोनं मोजत होतो. सध्याचा तोळा म्हणजे १० ग्रॅम, तर जुना तोळा १२ ते १२.५ ग्रॅमच्या आसपास होता. दशमान पध्दत आल्यावर सोन्याचा भाव आता ग्रॅमच्या स्वरुपातच ठरवला जातो. अर्थात अपवाद फक्त हशीश आणि गांजाचा, त्या बाजारात अजूनही जुना तोळाच वापरला जातो.

आताही सोन्याचा भाव लंडनमध्येच ठरवला जातो. फरक इतकाच आहे की आता त्या जुन्या घराण्यांच्या ऐवजी जगातले १५ बँकर्स (बँका) एकत्र येऊन सोन्याचा भाव ठरवतात. या पंधरा बँकांमध्ये मॉर्गन स्टॅनली, एचएसबीसी, नोव्हा स्कॉटीया, स्टँडर्ड चार्टर्ड अशी काही ओळखीची नावं आहेत. पण महत्वाच्या इतर बँकात दोन चीनमधल्या बँका आहेत-बँक ऑफ चायना आणि ईंडस्ट्रीयल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना. आपला देश या बाजाराचा मोठा ग्राहक आहे, पण आपली एकही बँक या 'गोल्ड फिक्स' मध्ये सहभागी नसते.

पण वाचकहो, या गोल्ड फिक्सचा इतिहास १९१९ ते २०१९ या दोन टोकांत सांगण्याइतका लहान नाही. या शंभर वर्षांत अनेक मनोरंजक नाट्यमय स्थित्यंतरं झाली. उदाहरणार्थ, दुसर्‍या महायुध्दानंतर १९३९ ते १९५४ लंडनचे गोल्ड मार्केट बंदच होते. पण जगात सोन्याचे व्यवहार बिनबोभाट चालू होते.

१९६८ नंतर दररोज- लंडन वेळेनुसार सकाळी १० वाजता- एक भाव ठरतो आणि लंडन वेळेनुसार दुपारी तीन वाजता पुन्हा भाव ठरवण्यात येतो. दुपारी तीनचा भाव अशासाठी की त्यावेळी अमेरिकन बाजार सुरु होतो. आपल्याकडे तेव्हा रात्रीचे एक वाजलेले असतात. पण सोनं अशी वस्तू आहे की त्यासाठी माणसं रात्र-रात्र जागी पण राहू शकतात.

१९४४ साली ब्रेंटनवूड करारानुसार डॉलर आणि ब्रिटिश पाऊंडाचा भाव सोन्याच्या भावावर आधारीत ठेवण्याची कल्पना अंमलात आणण्यात आली. यासाठी लंडन गोल्डपूलची निर्मिती करण्यात आली. हे सर्व करण्यात उद्देश असा होता की कोणतेही चलन कधीही सोन्यात रुपांतरित करता यावे. भाव स्थिर राहण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या या 'पूल'मध्ये अमेरिकेसह ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, इटली, बेल्जीयम, नेदरलँड, स्वित्झर्लंड हे देश एकत्र आले. या सगळ्यांनी आपापला सोन्याचा हिस्सा त्यात जमा केला. एकट्या अमेरिकेने या पूलमध्ये १२० टन सोने जमा केले. बाकीच्यांनी १२० टन जमा केले.

काहीच वर्षांत म्हणजे १९७१मध्ये अमेरिका या गँगमधून बाहेर पडली. ब्रिटनची हालत त्याहूनही वाईट झाली. त्यांना पाऊंडाची किंमत १५ टक्क्यांनी कमी करावी लागली आणि लंडन गोल्डपूलचा बोर्‍या वाजला. सगळ्या देशांची चलनं 'फियाट करन्सी' मध्ये बदलली आणि फॉरेक्स बाजाराचा जन्म झाला. एक गोष्ट सिध्द झाली की- चलनावर अधिकार त्या देशाचा असेल, पण सोन्याचा भाव कोणाच्याही हातात नाही.

यानंतर एकमेकांवर अवलंबून असणारे अनेक बाजार तयार झाले. या बाजारांत नवा सदस्य होता कच्च्या तेलाचा बाजार, कर्जांचा बाजार आणि आशियातील सगळ्यात मोठा 'तस्करीचा' बाजार!!

भारतासारख्या गरीब देशात आजच्या तारखेस एकूण २००० टन सोने घराघरांत पडले असेल. पण याच सोन्याच्या हव्यासाने दुबईच्या स्मगलरांची टोळी भारतात हातपाय पसरू शकली. त्यातून जन्माला आले नवे भाई! सरकारने आपल्या जनतेची सोन्याची भूक ओळखून गोल्ड कंट्रोल अ‍ॅक्ट १९६५/६८ आणून पाह्यला, पण त्याचाही काही फायदा झाला नाही. पुन्हा एकदा इतिहासाने सिध्द केले की सोन्यावर कोणाचीही सत्ता चालत नाही. 

कर्जाच्या बाजारात २००५ पासून एक 'फिक्सींग' करणारा बाजार तयार झाला. या बाजारामुळे 'लिबॉर' चा फ्रॉड जन्माला आला. अनेक नामवंत बँका ज्यांच्या व्यवहाराकडे आपण आदर्श म्हणून बघतो, त्या बँका या फ्रॉडमध्ये सामील होत्या. हा लोच्या संपतो ना संपतो तोच २०१२ साली सोन्याचे भाव ठरवणार्‍यांपैकी एक बँक-बार्कलेज बँकने सोन्याचे भाव ठरवताना फ्रॉड केला. त्यामुळे एक गोष्ट नव्याने सिध्द झाली आहे की या सोन्याच्या बाजारात भाव ठरवणार्‍यांची नैतिकता खोटी आणि हिणकस असते. 

फक्त जाता जाता बघू या भारतात सोन्याचा दर कसा ठरवला जातो.

भारतात सोन्याचा भाव कोण ठरवते?

भारतात सोन्याचा भाव कोणतीही सरकारी यंत्रणा ठरवत नाही. एका अनौपचारीक पध्दतीने रोज सोन्याचा भाव ठरवला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जो भाव ठरतो त्या भावाच्या आसपासच भारतीय बाजारात सोन्याचा भाव निश्चित केला जातो. आयबीजेए म्हणजेच इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचा भाव ठरवण्यात महत्वाचा हिस्सा असतो. या संघटनेचे सभासद भारतातले सोन्याचे मोठे व्यापारी असतात. या व्यापार्‍यांकडून देशाच्या विविध भागात त्या-त्या दिवशी असलेल्या मागणी आणि पुरवठ्याचा अंदाज घेतला जातो. हा डेटा हाती आल्यावर आयबीजेए 'टॉप टेन डिलर्स' कडून भाव मागवते. ते खरेदीचे आणि विक्रीचे असे दोन भाव देतात. या भावांची सरासरी काढून त्या-त्या दिवशीचा सोन्याचा भाव ठरवला जातो. हा भाव ठरवताना डॉलरचा भाव, आयातीचे कर या सर्वांचा एकत्रीत विचार केला जातो. 

हे सोनं बुलियन डिलर्सकडे कसे येते हे पण जाणून घेणे महत्वाचे आहे. भारतात खनिज सोन्याची निर्मिती फारच कमी आहे. त्यामानाने मागणी प्रचंड मोठी असते. हे सोने आपल्या बँका परदेशी बँकाकडून खरेदी करतात. त्याच्यावर त्यांचे सर्विस चार्जेस लावतात आणि डिलर्सना विकतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय भाव आणि भारतातल्या बाजाराचा भाव यात फरक असतो.

येत्या रविवारी अक्षय तृतीया आहे. सोने खरेदीचा मुहूर्त असला तरी सर्वत्र लॉकडाऊन आहे. तेव्हा खरेदीचा मोह टाळा आणि हा लेख शक्य तितका शेअर करा.

 

आणखी वाचा :

हॉलमार्क म्हणजे नक्की काय ? सोन्याचा कस नक्की कसा पाहतात ?

२४ कॅरेट सोनं म्हणजे काय ? KDM चे दागिने म्हणजे काय ? राव, तुम्हाला सोन्याबद्दल किती माहित आहे ?

सबस्क्राईब करा

* indicates required