computer

इअरबड्स आणि हेडफोनमुळे बहिरेपणा येऊ शकतो? हेडफोन आणि बहिरेपणा यांचा नेमका संबध तरी काय?

गाणी ऐकणे कुणाला आवडत नाही? बसमध्ये असो की ऑफिसमध्ये, कानात इअरफोन किंवा हेडफोन लावला की झालं काम. तुम्हीही कानात इअरबड्स घालून गाणी ऐकत असालच. अगदी घरात असतानाही कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या कानात, ज्याचा त्याचा हेडफोन असतोच. गाणी ऐकल्याने मनाला थोडी शांती मिळते, डोक्यातील विचारांची गर्दी निवळते हे जरी खरे असले तरी, तुम्ही एका समस्येवर समाधान काढता काढता दुसऱ्या समस्येला तरी आमंत्रण देत नाही ना? याचा थोडा विचार करा. गाणी ऐकण्यासाठी म्हणून, सध्या ऑनलाइन मिटिंगमध्ये किंवा फोनवर बोलण्यासाठी म्हणून, कानात घातलेल्या इअरफोन किंवा इअरबड्समुळे दुसऱ्याला काही त्रास होत नसला तरी, हे हेडफोन किंवा इअरबड्स तुमच्याच कानांसाठी धोकादायक ठरू शकतात. फक्त कानच नाही, तर मेंदू आणि वर्तनावरही या इअरबड्स आणि हेडफोनमुळे घातक परिणाम होऊ शकतो. बहिरेपणा आणि हेडफोन यांचा नेमका संबध तरी काय? हे जर जाणून घ्यायचे असेल तर हा लेख नक्की वाचा. 

अगदी लहान मुलापासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत हल्ली प्रत्येकजणच मोठमोठ्या आवाजात गाणी ऐकत असतो, चित्रपट पाहत असतील तर त्याचाही आवाज मोठा असतो. बरं, या गाण्याच्या आणि चित्रपटाच्या आवाजाखेरीज आजूबाजूला इतर गोंगाटही असतोच. गाड्यांचा आवाज, गाड्यांचे हॉर्न, आरडओरडा असे कितीतरी आवाज कानावर आदळतच असतात. त्यात काही खंड पडत नाही. शास्त्रीयदृष्ट्या आपल्या कानांना ७० डेसिबलपेक्षा जास्त आवाज सहन होत नाही. मग आपल्या आजूबाजूचा आवाज जर ७० डेसिबलपेक्षा जास्त असेल तर? सुरुवातीला याची जाणीव होत नाही. पण हळूहळू कानाला याची किंमत मोजावी लागते. कानात इअरबड्स घालूनही अनेक जण ७० डेसिबलपेक्षा जास्त आवाजात ऐकत असतात. इतक्या मोठ्या आवाजात गाणी ऐकताना मजा वाटत असली तरी, ही मजा कधी सजा ठरेल हे सांगता यायचे नाही. तेव्हा इअरबड्स अवश्य वापरा, पण त्याचा आवाज कमी ठेवा. इतरांना त्रास द्यायचा नाही हे मान्य पण मग स्वतःच्याच कानांना तरी याचा त्रास कशाला? बरोबर ना?

‘वाढत्या वयासोबत कान कमी येतातच त्यात काय एवढं!’ असे म्हणत आपण बहिरेपण ही वयासोबत वाढत जाणारी एका सामन्य समस्या आहे, असा गैरसमज करून घेतलेला आहे. प्रत्यक्षात वाढत्या वयासोबत ऐकण्याची क्षमता कमी होते कारण आपण आपल्या कानांच्या आरोग्याकडे कधी गांभीर्याने लक्षच दिलेले नसते. नंतर मात्र वाढत्या वयाचे कारण पुरते. खरे तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दररोजच आपण गोंगाटात वावरत असतो. अगदी घरातील टीव्हीचा आवाजही आपल्याला मोठा हवा असतो. माफक आवाजात ऐकण्याची सवयच नाहीशी होत चालली आहे. रोजच्या या गोंगाटाचा कानावर परिणाम होऊन हळूहळू ऐकण्याची क्षमता कमी होते. हे लक्षात येईपर्यंत वेळ निघून गेलेली असते. 

जागतिक आरोग्य संघटनेने मानवी आवाजाच्या क्षमतेची मर्यादा निश्चित केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार १२ ते ३५ वर्षे वयादरम्यानच्या व्यक्ती या सातत्याने अशा मोठ्या आवाजाच्या संपर्कात येत असतात. त्यातही या वयोगटात हेडफोन वापरण्याचे प्रमाण जास्त आहे. पुढे जाऊन अशा व्यक्तींना बहिरेपणाची समस्या जाणवण्याची शक्यता जास्त वाढते. वारंवार इअरबड्स किंवा हेडफोन वापरणारे तरुण चाळीशीत पोहोचताच त्यांना बहिरेपणाची समस्या भेडसावयाला सुरू होते. ऐंशी-नव्वद वर्षांचे वृद्ध जितके ऐकू शकतात तितके काही लोक चाळीशीतही ऐकू शकत नाहीत, ही शोकांतिका आहे.  

ज्यांना खूप कमी वयात ऐकू न येण्याच्या तक्रारींचा सामना करावा लागतो त्यांच्यात पुढे जाऊन स्मृतीभ्रंश, मानसिक अस्वास्थ्य, मानसिक संतुलन ढासळणे, वेडेपणा अशाही समस्या दिसू लागतात. वरवर बहिरेपणा ही एकच समस्या दिसत असली तरी त्यामागून अशा अनेक समस्यांचे जाळेच तयार होते. वाढत्या वयासोबत वाढणाऱ्या समस्या जर थोपवायच्या असतील किंवा त्या वाढू द्यायच्या नसतील तर आधी आपण आपल्या कानाचे आरोग्य जपणे खूप महत्वाचे आहे. कान शाबूत, तर मेंदू शाबूत हे लक्षात ठेवा.

आपल्या कानावर जो आवाज येत आहे तो नेमका किती क्षमतेचा आहे हे मोजणारे ऍपही  आहेत. हे ऍप्स मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून तुमच्या आजूबाजूचा आवाज ७० डेसिबलहून जास्त तर नाही ना हे तपासू शकता. तुम्ही बांधकाम किंवा सेंट्रिंग व्यवसायासारख्या गोंगाट असणाऱ्या ठिकाणी काम करत असाल, तर कानाच्या सुरक्षेसाठी (hearing safety aids) काही साधने वापरण्याची सवय लावून घ्या. हल्ली बाजारात इअरमफ्स, फोम प्लग, अशी विविध साधने उपलब्ध आहेत. ज्यांच्या वापर करून आपण आजूबाजूचा गोंगाट टाळू शकतो. 

इअरबड्स किंवा हेडफोनचाच वापर करावा लागत असेल तर त्यावर आवाजाची मर्यादा निश्चित करता आली पाहिजे. एकदा का अशी मर्यादा निश्चित केली की, पुन्हा आवाज वाढवताना आपल्याला मोठ्या आवाजात न ऐकण्याची सूचना मिळते. विशेषत: लहान मुलांसाठी याचा नक्कीच फायदा होईल. तरीही मुलांना इअरबड्स किंवा तत्सम साधने देण्यापूर्वी त्यांना त्याचे दुष्परिणामही समजावून दिले पाहिजेत.

याव्यतिरिक्त, वेळोवेळी कानांचे आरोग्य तपासणेही हिताचे ठरेल. बहिरेपणावर वेळीच उपचार करता आले तर पुढे होणारे गंभीर दुष्परिणाम नक्कीच टाळता येतात. कानात आवाज येत असेल, कमी ऐकू येत असेल, किंवा ऐकू आले तरी समोरच्याचे बोलणे कळत नसेल तर कान तपासून घेणे उत्तम ठरेल. 

तुम्हालाही इअरबड्स किंवा हेडफोन वापरण्याची हौस असेल तर वेळ निघून जाण्यापूर्वीच यावर जरूर विचार करा. 

 

लेखिका: मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required