जुलै आणि ऑगस्टच्या जन्माची कथा !!

मंडळी, सध्या जे कॅलेंडर आपण वापरतो, त्याला ग्रेगोरियन कॅलेंडर म्हणतात. या कॅलेंडरचा जुलै महिना संपत आलाय. ऑगस्ट काही दिवसांतच सुरु होईल. आज जी माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ती फारच मनोरंजक आहे.
खरं सांगायचं झालं तर जुलै आणि ऑगस्ट हे दोन्ही महिने उपरे आहेत. हे दोन्ही महिने मूळच्या कॅलेंडर मध्ये कधीच नव्हते. मूळ कॅलेंडर, ज्याला रोमन कॅलेंडर म्हणतात, त्या कॅलेंडरमध्ये फक्त दहाच महिने होते. साहजिकच, सप्टेंबर हा सातवा महिना होता. सेप्टा म्हणजे सात(सप्टेंबर). नंतरचा आठवा महिना ऑक्टो म्हणजे आठ (ऑक्टोबर). नोव्वा म्हणजे नऊ (नोव्हेंबर). आणि डेका म्हणजे दहा (डिसेंबर).
दहा महिन्याच्या कॅलेंडरमध्ये हे दोन उपरे महिने आले कसे ?
जुलियस सीझर (स्रोत)
तर त्याचं झालं असं, रोमन साम्राज्याचा नायक जुलियस सीझर याने स्वतःच्या नावाचा एक महिना, म्हणजे जुलै या दहा महिन्याच्या कॅलेंडरमध्ये टाकला. रोमन साम्राज्याच्या नायकाचा महिना असल्यामुळे त्याने तो ३० दिवसांचा न करता ३१ दिवसांचा केला. सीझरच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा ऑगस्टस सीझर गादीवर आला. त्याने स्वतःचे नाव वापरून ऑगस्ट महिना टाकला. अर्थातच स्पर्धा बापाशी असल्यामुळे त्यानेही ऑगस्ट महिना ३१ दिवसांचा केला. त्यामुळे मुळचे दहा महिन्याचे कॅलेंडर १२ महिन्याचे झाले.
ऑगस्टस सीझर (स्रोत)
हे असे दोन महिने आहेत जे लागोपाठ येतात आणि दोन्हीमध्ये ३१ दिवस आहेत. आता गंमत अशी झाली की, सप्टेंबर सातवा महिना- तो नववा महिना झाला, ऑक्टोबर दहावा, नोव्हेंबर अकरावा, तर डिसेंबर बारावा महिना झाला.
तर अशा प्रकारे आजचे जुलै आणि ऑगस्ट जन्माला आले.