computer

फ्रिजमध्ये वारंवार बर्फ साचू नये म्हणून काय काळजी घ्याल ?

फ्रीज तसा घरोघरी असतोच. पण होतं काय, पहिल्यांदा फ्रीज विकत घ्यायला गेल्यावर चुकून 'ऑटोमॅटिक डिफ्रॉस्ट' हा पर्याय आहे का हे पाहायला आपण विसरतो आणि मग दर आठवड्याला किंवा पंधरा दिवसांनतर हे फ्रीज डिफ्रॉस्ट करण्याचं काम येऊन पडतं. कधी चुकून उशीर झालाच, तर बर्फाचं पाणी घरभर होतं आणि "गंगा आली रे.. अंगणी" अशी परिस्थिती निर्माण होते.हे सगळं झालं, पण तुम्हाला माहिती आहे का फ्रीझर फ्रॉस्ट कशामुळे होतो, त्याचे परिणाम काय आहेत आणि ते टाळायचे कसे? आपण आज या लेखात तेच समजून घेऊयात.

फ्रीझर फ्रॉस्ट होणे म्हणजे फ्रीझरमध्ये बर्फ साचणे. तुमच्या फ्रिझरच्या आतील भिंती आणि शेल्फवर जमा झालेला गोठलेला ओलावा सामान्यतः फ्रीझर फ्रॉस्ट म्हणून ओळखला जातो. हा ओलावा तुमच्या फ्रीझरमधील बाष्पीभवन कॉइलच्या संपर्कात येतो आणि नंतर गोठतो. त्यामुळे हा असा बर्फ फ्रीजमध्ये साठतो. बाष्पीभवन कॉइलवर ओलावा तसा अनेक कारणांमुळे जमा होतो. या अतिरिक्त बर्फामुळे फ्रीजला वेगळाच उग्र वास येतो. साठवलेले अन्नपदार्थ त्यामुळे खराब होऊ शकतो आणि फ्रीझर फ्रॉस्ट सतत झाल्यामुळे फ्रीजची कार्यक्षमता देखील कमकुवत होते.

फ्रिझर फ्रॉस्ट होण्याची कारणे बरीच आहेत. सगळ्यात नेहमीचं कारण म्हणजे फ्रीझरचा दरवाजा खूप वेळ उघडा ठेवणे. फ्रीझरचे दार खूप कमी वेळ उघड बंद करावे हा त्यावरचा उपाय आहे. जरी दार उघडले तर खूप वेळ ते उघडे ठेवू नये.

दुसरे कारण म्हणजे जीर्ण किंवा खराब झालेले गास्केट म्हणजे फ्रीजच्या दाराला असलेली रबरी पट्टी. गास्केट खराब झाल्यास बाहेरची उबदार किंवा गरम हवा आत जाते आणि आतली थंड हवा बाहेर पडते.

तिसरे कारण म्हणजे फ्रीझरमध्ये ठेवलेले गरम अन्न! गरम अन्नातून वाफ निर्माण होऊन आर्द्रता तयार होते आणि त्यामुळे दंव जमा होते. 

इतर कारणांमध्ये येतात खराब झालेले डीफ्रॉस्ट टाइमर, हीटर्स आणि थर्मोस्टॅट्स. या सर्वांमुळेही फ्रिझर खूपदा फ्रॉस्ट होतो.

तुमच्या फ्रीजरमध्ये दंव जमा झाल्याचे लक्षात आल्यास ते स्वच्छ करावे. त्यासाठी फ्रिज बंद करावा. पूर्ण बर्फ वितळू द्यावा आणि मग ओलावा पुसून घ्यावा. सगळे कोरडे झाल्यावर फ्रीज पुन्हा चालू करावा. चाकू किंवा इतर कोणत्याही तीक्ष्ण वस्तूने बर्फ खरवडून काढू नका. त्यामुळे फ्रिजचे नुकसान होऊ शकते.

फ्रिझर फ्रॉस्ट किंवा हे दंव जमा होण्यापासून टाळण्यासाठी काही टिप्स खालील प्रमाणे:

आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ फ्रीझरचा दरवाजा उघडू नका

गास्केट नियमितपणे तपासा

फ्रीझरचा दरवाजा पूर्णपणे बंद झाला आहे याची खात्री करा.

फ्रीझरमध्ये फक्त थंड केलेले अन्न ठेवा.

भट्टी, ड्रायर किंवा वॉटर हीटर यांसारख्या उबदार उपकरणांजवळ फ्रीझर ठेवू नका.

फ्रीजरच्या मागील बाजूस आणि भिंतीच्या दरम्यान जागा सोडा.

फ्रीझर योग्य तापमानावर सेट केल्याची खात्री करा.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required