computer

एकच सण आणि भारतातल्या प्रत्येक राज्यातल्या वेगवेगळ्या पद्धती! तुम्हाला किती माहीत आहेत?

काय मग, आज पतंग उडवायचा कार्यक्रम ठरला की नाही? संक्रात म्हणजे तिळगूळ हे जसं आपल्या डोक्यात बसलं आहे तितकंच खरं आहे- हे पतंगाचं नातं. मकर संक्रात हा आपला एकमेव सण आहे जो आपण तिथीने साजरा ना करता तारखेनुसार साजरा करतो. भारताच्या प्रत्येक राज्यात तिथल्या भौगोलीक परिस्थिती, संस्कृतीनुसार हा सण साजरा केला जातो. प्रत्येक राज्यात या सणाला वेगळंच नांव आहे.

तर आज आपण बघूयात हा सण नक्की कुठं आणि कसा साजरा केला जातो ते...

दिल्ली आणि हरियाणा

दिल्ली, हरियाणा आणि इतर आजूबाजूच्या राज्यात मकर संक्रात साजरी केली जाते. या दिवशी तुपातला चुरमा, हलवा आणि खीर या स्पेशल डिशेस बनवल्या जातात, लग्न झालेल्या स्त्रियांना त्यांचे भाऊ गरम कपडे भेट म्हणून देतात..

पंजाब

पंजाबमध्ये संक्रात माघी नावानं साजरी केली जाते तर भोगी लोहडी म्हणून साजरी होते. या दिवशी सकाळी लवकर उठून नदीत स्नान केले जाते आणि घरोघरी तिळाच्या तेलाचे दिवे लावले जातात. पंजाबच्या संस्कृतीनुसार भांगडा करणं तर कंपल्सरी आहेच, खीर हा इथला मुख्य गोड पदार्थ असतो. 

राजस्थान आणि मध्य प्रदेशाचा काही भाग

राजस्थानात संक्रात काही अंशी महाराष्ट्रासारखीच साजरी केली जाते. इथं स्त्रिया १३ बायकांना वाण देतात. इथं फिनी, घेवर, तीळ पापडी, तीळ लाडू अशा पदार्थांची रेलचेल असते.  तर जयपूर भागात लोक पतंग उडवतात.

तामिळनाडू

इथं हा सण पोंगल नावानं चार दिवस साजरा केला जातो. पहिला दिवस भोगी, दुसरा दिवस थाई पोंगल, तिसरा दिवस मट्टू पोंगल आणि चौथा कंनुं पोंगल. तामिळ महिना मार्गाझीच्या शेवटच्या दिवसापासून थाई महिन्याच्या चौथ्या दिवसापर्यंत साजरा केला जातो.

आसाम

आसाममध्ये हा सण माघ बिहू नावानं साजरा केला जातोो. माघ महिन्यात सुगीचे दिवस संपत आल्यानंतर आठवडाभर हा सण साजरा केला जातो. तरुण लोकं बांबू, पानं यापासून छोट्या छोट्या झोपड्या तयार करतात. त्यात या दिवसाचं स्पेशल जेवण होतं आणि मग नंतर या झोपड्या जाळून टाकण्यात येतात. या काळात आसाममध्ये टेकली भोंगा आणि म्हशींची लढाई असे खेळ पण खेळतात.

गुजरात

गुजरातेत संक्रांत उत्तरायण नावानं ओळखली जाते. १४  आणि १५ तारखेला हा सण साजरा होतो. गेल्या काही वर्षांत गुजरातेतील पतंग महोत्सव फेमस झाला आहेच.  या काळात खाण्याच्या बाबतीत प्रसिद्ध असलेले गुजराती लोक उंधियो खातात. तिळाची चिक्की करण्याची पण इथं पद्धत आहे.

हिमाचल प्रदेश

सिमला आणि आजूबाजूचा भागात हा सण माघ साजी नावानं साजरा केला जातो. सकाळी लवकर उठून स्नान करणं आणि दिवसा शेजाऱ्यांच्यासोबत तूप घालून खिचडी खाणं हे इथलं मुख्य कार्यक्रम आहेत.

उत्तर प्रदेश

या भागात असलेला गंगा नदीच्या संस्कृतीचा परिणाम आपल्याला प्रत्येक सणात सापडतो.  इथं संक्रातीच्या दिवशी लवकर उठून गंगा स्नान करण्याची प्रथा आहे. महाराष्ट्राप्रमाणेच इथेही तीळ गूळ घालून लाडू, वड्या असे गोडाचे प्रकार केलं जातात.

पश्चिम बंगाल

बंगालमध्ये हा सण "पौष संक्रात" नावानं साजरा केला जातो, खेजुरेर गुर हा खजुरापासून केलेला गूळ विविध प्रकारचे गोड पदार्थ बनविण्यासाठी वापरला जातो.

सबस्क्राईब करा

* indicates required