computer

स्टील उपकरणांची काळजी घेण्याच्या आणि ती चकचकीत ठेवण्याच्या साध्यासोप्या टीप्स!!

स्वयंपाकघरात स्टेनलेस स्टीलची बरीच भांडी आणि उपकरणे असतातच. आजकाल स्टीलची उपकरणे छान दिसतात आणि मुख्य म्हणजे स्वच्छ करणेही सोपे असते म्हणून स्टील उपकरणे घेतली जातात. फ्रिज, ओव्हन, वॉशिंग मशीन, डिश वॉशर अशी अनेक उत्पादनेही स्टीलची मिळतात. टिकाऊ असल्याने दीर्घकाळ वापरायला चांगली म्हणून ग्राहक ही स्टीलच्या उपकरणांना पसंती देतात. पण कालांतराने ही उपकरणं जुनी वाटू लागतात, त्यावर ओरखडे येतात, नवी असल्यावर जी चमक असते कालांतराने ती नाहीशी होते. असे का होते? स्टीलची उपकरणे स्वच्छ कशी करावीत, ती जतन कशी करावीत याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत.

उपकरणं म्हणजेच यंत्रांबद्दल बोलायचं तर नवे उपकरण घेताना त्याबरोबर एक माहिती पत्रक दिले असते ते जरूर वाचावे. कारण बरेच ब्रँड्स साफसफाईसाठी वापरण्यासाठी कोणत्या गोष्टी वापरावीत आणि कोणते घटक उपकरणासाठी हानिकारक असतात त्याची यादी देतात.

ब्लीच, क्लोराईड, क्लोरीन, अमोनिया आणि अल्कोहोल-आधारित उत्पादने स्वच्छ करायला वापरू नयेत. तुम्ही जर पहिल्यांदा एखादे असे नवे उत्पादन वापरत असाल तर त्याची स्पॉट टेस्ट करा आणि मगच ते वापरा.

या उपकरणांवर कोणताही अन्नपदार्थ सांडला किंवा डाग पडला तर तर सुकून घट्ट होऊ देऊ नका. तो जितका सुकेल तेवढे स्वच्छ करणे कठीण होते. तसेच उपकरणाची कार्यक्षमताही कमी होऊ शकते

स्टेनलेस स्टील गंजण्यास प्रतिरोधक आहे. पण तरीही दीर्घकाळ पाण्याशी संपर्क आला तर ते गंज धरू शकते. त्यामुळे शक्यतो पाण्याचे डाग त्वरित पुसले पाहिजेत. कोरड्या फडक्याने पुसून असे डाग स्वच्छ करावेत. गंज तयार होऊ लागल्यास, बेकिंग सोडा आणि पाण्याची पेस्ट तयार करा, नंतर टूथब्रश वापरून सोड्याचे हे द्रावण गंजलेल्या डागांवर घासून घ्या.

डाग काढण्यासाठी ओल्या कपड्यावर थोडासा बेकिंग सोडा लावा आणि हलकेच पुसून काढा. नंतर पावडरचे डाग जाण्यासाठी दुसऱ्या ओल्या कापडाने पुसा.

बाजारात व्हिनेगर ही सहज मिळते. डिस्टिल्ड व्हाईट व्हिनेगर स्प्रे स्टीलवर शिंपडा. मायक्रोफायबर कपड्याने किंवा पेपर टॉवेलने व्हिनेगर पुसून टाका.

साध्या पाण्याने साफ करणे देखील मदत करू शकते. आठवड्यातून एकदा साफ केल्यास बरेच डाग पुसून जातात. उपकरणाच्या वरच्या बाजूने डावीकडून उजवीकडे पुसत यावे.

स्टेनलेस स्टील क्लिनर तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग करताना मिळतील. त्याचाही खूप उपयोग होतो. क्लिनर आणि शाईनर एकत्र असणारी 
सोल्यूशन्स सुध्दा आहेत. त्याने चमकही येते.
स्टेनलेस स्टीलची नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी, तुम्हाला एक व्यावसायिक स्टेनलेस स्टील क्लिनर आणि पॉलिश वापरणे आवश्यक आहे. पॉलिशींग साठी सुद्धा काही लिक्वीड उपलब्ध आहेत.लायझॉल सारख्या कंपन्या विविधोपयोगी लिक्वीड स्प्रे तयार करतात, त्याचाही वापर तुम्ही महिन्यातून एकदा करू शकता.

सुरक्षित घटक असलेले कोणतेही लिक्वीड वापरताना हाताची काळजी घ्या. कॉटन कापड वापरा. पुसताना उपकरण बंद आहे याची काळजी घ्या.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required