computer

भारताचे पहिले ध्वजगीत कवीला झोपेत सुचलेले होते?....वाचा 'विजयी विश्व तिरंगा प्यारा' गीताच्या निर्मितीची गोष्ट!!

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी देशभक्तीपर गीते ऐकण्याची मजाच वेगळी असते. इतर दिवशीही अशा गाण्यांमुळे उत्साह म्हणा किंवा एकप्रकारची प्रेरणा म्हणा, ती मिळतेच, पण १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला ही गाणी ऐकल्यानंतर वाटणारी स्फूर्ती काही वेगळीच असते. या गाण्यांत पारायणे करावीत असे एक गाणे नक्कीच असते: "विजयी विश्व तिरंगा प्यारा"!! 

शाळेत असताना हे गाणे तुम्ही नक्कीच गायला असाल, स्मरणरंजन म्हणून त्या ओळी पुन्हा एकदा मनाशी गाऊनही पाहा..

विजयी विश्व तिरंगा प्यारा, झण्डा ऊँचा रहे हमारा।
सदा शक्ति सरसाने वाला
प्रेम-सुधा बरसाने वाला
वीरों को हरसाने वाला
मातृभूमि का तन-मन सारा, झण्डा ऊँचा रहे हमारा।
शान न इसकी जाने पाये
चाहें जान भले ही जाये
विश्व विजय कर के दिखलायें
तब होवे प्रण पूर्ण हमारा, झण्डा ऊँचा रहे हमारा ||

नंतर वर्षभर या गाण्याची क्वचितच आठवण व्हायची. या गीताची एक अजब गोष्ट आहे. हे गीत कोणी लिहिले हा प्रश्न कोणीही कधीच विचारला नाही. या गीताला आपल्या मनाने इतके गृहित धरले होते की हा प्रश्न मनात आलाही नसेल. असो, पण गाणे आहे म्हणजे कवी असेलच नाही का? चला तर वाचूया गाण्याबद्द्ल आणखी काही! 

हे गाणे स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच ध्वजगीत म्हणून मान्यता पावले होते.  १९३८ साली काँग्रेसने याला ध्वजगीत किंवा ध्वजगान म्हणून स्वीकृत केले होते. १९३८ काळ म्हणजे अत्यंत धामधुमीचा, कॉग्रेसच्या अधिवेशनांचा काळ होता तो.  त्या दरम्यान आता स्वातंत्र्य फारसे दूर नाही याची जनमनाला खात्री पटली होती. काँग्रेसने त्यानुसार भारताचा नवा ध्वजही स्वीकृत केला होता. आता कमी होती फक्त ध्वजगीताची! 

या दरम्यान गणेश शंकर विद्यार्थी नावाचे एक गृहस्थ पेशाने पत्रकार आणि नॅशनल काँग्रेसचे नेते होते. असहकार चळवळ आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही ते अग्रेसर होते. त्यांनी हे ध्वजगीत लिहिण्याचे काम श्यामलाल गुप्ता या  'पार्षद' नावाने लेखन करणाऱ्या तरुण कवीवर सोपवली. श्यामलाल गुप्ता हे कानपूरजवळच्या एका गावात राहणारे देशभक्तीने भारलेलेतरुण कवी होते. मध्यंतरी बरेच दिवस गेले. त्यांच्याकडून गाणे लिहिलेच जाईना. इकडे काँग्रेस अधिवेशनाची तारीख जवळ जवळ येत होती, पण पार्षद आणि त्यांचे गाणे दोघेही कुठे दिसेनात. रागावलेल्या गणेश शंकर विद्यार्थींनी पार्षद यांना ध्वजगीत आज रात्रीत लिहून झालेच पाहिजे अशी तंबी दिली. 

पार्षद रात्री लिहायला बसले. पण त्यांच्या लेखणीने चक्क असहकारच पुकारला. त्यांना काय लिहावे ते सुचेनासे झाले. शेवटी थकून 'पार्षद' झोपले आणि रात्री २ वाजता त्यांना अचानक जाग आली. त्यांना कविता स्फुरली होती. एका दमात त्यांनी हे गीत 'विजयी विश्व तिरंगा प्यारा, झण्डा ऊँचा रहे हमारा। लिहून काढले. एकूण ७ कडव्यांची ही कविता विद्यार्थींना पसंत पडली. गाणे महात्मा गांधींकडे पोहचल्यावर त्यांनी गाण्याची कडवी कमी करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार काँग्रेसच्या हरीपुरा अधिवेशनात या गीताला ध्वजगीत म्हणून सुभाषचंद्र बोस यांनी मान्यता दिली आणि उपस्थित ५,००० देशभक्तांनी हे गाणे एकसुरात गायले.

मूळ ७ कडव्यांची कविता अशी होती:

विजयी विश्व तिरंगा प्यारा, झण्डा ऊँचा रहे हमारा।
सदा शक्ति सरसाने वाला
प्रेम-सुधा बरसाने वाला
वीरों को हरसाने वाला
मातृभूमि का तन-मन सारा, झण्डा ऊँचा रहे हमारा।१।
लाल रंग बजरंगबली का
हरा अहल इस्लाम अली का
श्वेत सभी धर्मों का टीका
एक हुआ रंग न्यारा-न्यारा, झण्डा ऊँचा रहे हमारा। २।
है चरखे का चित्र सँवारा
मानो चक्र सुदर्शन प्यारा
हरे रंग का संकट सारा
है यह सच्चा भाव हमारा, झण्डा ऊँचा रहे हमारा। ३।
स्वतन्त्रता के भीषण रण में
लखकर बढ़े जोश क्षण-क्षण में
काँपे शत्रु देखकर मन में
मिट जाये भय संकट सारा, झण्डा ऊँचा रहे हमारा। ४।
इस झण्डे के नीचे निर्भय
लें स्वराज्य हम अविचल निश्चय
बोलो भारत माता की जय
स्वतन्त्रता हो ध्येय हमारा, झण्डा ऊँचा रहे हमारा। ५।
आओ प्यारे वीरो आओ
देश-धर्म पर बलि-बलि जाओ
एक साथ सब मिल कर गाओ
प्यारा भारत देश हमारा, झण्डा ऊँचा रहे हमारा। ६।
शान न इसकी जाने पाये
चाहें जान भले ही जाये
विश्व विजय कर के दिखलायें
तब होवे प्रण पूर्ण हमारा, झण्डा ऊँचा रहे हमारा। ७।

१९३८च्या अधिवेशनात हे गाणे सरोजिनी नायडू यांनी गायले होते. पुढे १० वर्षांनी 'आझादी की राह पर' नावाचा सिनेमा आला, त्यात हे गीत घेतले गेले.हे गाणे १९२३ सालीच लिहून प्रकाशित करण्यात आले होते असाही इतिहास वाचायला मिळतो पण आपल्या स्मृतीरंजनात हे महत्वाचे नाही. हे गीत मनाशी गाताना आपण पुन्हा एकदा शाळेत जातो हेच खरे तथ्य आहे. 

भारत सरकारने या महान कवीला १९६९मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवले.  भारतीय देशभक्तीपर गीतांमध्ये पहिल्या दहांत येणारे हे गीत अनन्यसाधारण आहे. कालांतराने या गाण्याचे मराठीत रुपांतर करण्यात आले. ते तुमच्याकडे असेल तर कमेंटमध्ये नक्की द्या.

सबस्क्राईब करा

* indicates required