computer

खऱ्या आयुष्यातला रँचो...बॉलपेनच्या स्प्रिंगचा वापर करून त्याने मधुमेह असलेल्या व्यक्तीचे प्राण कसे वाचवले?

तुम्हाला ३ इडियट्स मधला शेवटचा सिन आठवतो का? ज्यामध्ये व्हायरसच्या मुलीची प्रसूती होते. त्या दृश्यात हॉस्पिटलमध्ये जाता येत नसल्याने रँचो आणि त्याचे मित्र तिथल्या तिथेच व्हॅक्युम क्लीनरच्या सहाय्याने प्रसूती करतात आणि बाळाचा जन्म होतो. या आयडीयामागचा हिरो म्हणजे रँचो आणि त्याचे मित्र कोणतं शिक्षण घेत असतात हे वेगळं सांगायला नकोच. सगळेच IIT इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असतात.

हे झालं चित्रपटाचं. पण खऱ्या आयुष्यातही अशा आणीबाणीच्या प्रसंगात शिक्षणाच्या उपयोगातून जीवही वाचवला जाऊ शकतो. असाच प्रसंग खऱ्या आयुष्यातही घडलं होतं. साल होतं २०१८. एका विमान प्रवासात IIT च्या विद्यार्थ्यांने एका मधुमेही व्यक्तीचा प्राण वाचवला आणि तो खऱ्या अर्थाने रँचो बनला. चला पाहूयात नक्की काय घडले?

कानपूर आयआयटीचा विद्यार्थी कार्तिकेय मंगलम स्वित्झर्लंडमधून आपली परीक्षा संपवून नवी दिल्लीकडे येत होता. नेहमी प्रमाणे विमानप्रवास सुरु होता. मॉस्को आंतरराष्ट्रीय विमानतळावर ॲम्स्टरडॅमचा ३० वर्षाचा थॉमस देखील विमानात चढला. उड्डाणादरम्यान थॉमसला अचानक अस्वस्थ वाटू लागले. नंतर कळाले की थॉमसला टाईप 1 मधुमेह आहे. खाण्याच्या आधी त्याला इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावेच लागते आणि ते घेण्यासाठी जे इन्सुलिन पेन लागते ते तो विमानतळावरच विसरला. विमानतळावर जेव्हा सुरक्षा तपासणी झाली तेव्हा तिथल्या ट्रेवरच इन्सुलिन पेन राहिला. थॉमसला इन्सुलिन न मिळाल्याने त्याला त्रास होऊ लागला. एअर होस्टेसने प्रवाशांमध्ये असलेल्या डॉक्टरांना प्रथमोपचार करण्यास सांगितले. सुदैवाने डॉक्टरकडे इंसुलिन पेन होता. परंतु तो थॉमसच्या शरीरात देणे जमत नव्हते. इन्सुलिन एका ठराविक दबावाने आणि  प्रमाणात शरीरात दिले जाते.

अखेर डॉक्टरांनी सांगितले की, आपत्कालीन लँडिंग हा एकच पर्याय आहे, नाहीतर अर्ध्या तासात मल्टिऑर्गन फेल म्हणजे शरीरातील एकाहून अधिक अवयव बंद पडून तो कोमात जाऊ शकतो. इन्सुलिनचा आधीचा डोस घेऊन ५ तास उलटले होते. पुढचा डोस लवकरात लवकर मिळणे आवश्यक होते.

इथेच आपल्या हिरोची एन्ट्री होते. कार्तिकेयने आयआयटीमध्ये पहिल्या वर्षाला काढलेली आकृती त्याच्या मोबाइलवर उघडली. ते पाहून कार्तिकेयला असे समजले की डिव्हाइस पेनमध्ये १२ भाग आहेत, परंतु आकृतीमध्ये १३ भाग दाखवले आहेत. एक भाग गहाळ झालेला होता. त्या भागासाठी शोधाशोध झाली परंतु सापडला नाही. शेवटी एका प्रवाशांकडून कार्तिकेयने बॉल पेन घेतला आणि  बॉलपेनचा स्प्रिंग इन्सुलिन डिव्हाइस पेनमध्ये बसविला. डॉक्टरांनी या जुगडला मंजुरी दिली. त्यानंतर थॉमसला इन्शुलिनचा डोस दिला गेला. थॉमसची प्रकृती हळूहळू सुधारू लागली. विमानातले डॉक्टर थॉमसच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. थोड्यावेळात थॉमसच्या शरीरातील साखरेची पातळी वाढणे थांबले त्यामुळे धोका टळला. डॉक्टरांनी विमानाची आपत्कालीन लँडिंग करण्याची गरज नसल्याचे सांगितले.

विमान नवी दिल्लीत उतरल्यावर कार्तिकेयने थॉमसला एकटे न सोडता हॉस्पिटलमध्ये नेले व तिथे तपासणी करून घेण्यास सांगितले. थॉमसने कार्तिकेयचे आभार मानले व त्याला आपल्या ॲम्स्टरडॅमच्या हॉटेलला भेट देण्यासाठी खास आमंत्रण दिले.

कार्तिकेयने दाखवलेल्या प्रसंगावधानाने थॉमसचा जीव वाचला. या घटनेत शिकलेल्या ज्ञानाचा अक्कल हुशारीने प्रत्यक्ष आयुष्यात केला जाणारा उपयोग दिसून येतो. हे फक्त सिनेमात नाही तर प्रत्यक्ष आयुष्यातही शक्य आहे.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required