computer

या भारतीय मुंग्यांना मेंदूचा आकार लहान करता येतो? आणखी काय वेगळेपणा आहे त्यांच्यात??

जर तुम्हाला आम्ही असं सांगितलं की या जगात काही अशा प्रजाती आहेत ज्या स्वतःच्या मनाने त्यांना हवं तेव्हा स्वतःच्या मेंदूचा आकार बदलू शकतात तर तुमचा त्यावर विश्वास बसेल? नाही ना? पण जगात अशा प्राणी प्रजाती खरोखर अस्तित्वात आहेत.

नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून जगात असलेल्या काही प्रजाती त्यांच्या मेंदूचा आकार सहज बदलू शकतात व पुन्हा तो पूर्ववत सुद्धा करू शकतात. उदाहरणच द्यायचं झालं तर पहिली प्रजाती म्हणजे Harpegnathos saltator असे शास्त्रीय नाव असलेली मुंगी. या मुंगीला आपल्याकडे इंडियन जम्पिंग अँन्ट्स या नावाने ओळखले जाते.

इंडियन जम्पिंग अँन्ट् ही मुंग्यांची अशी एक प्रजाती आहे की ज्या प्रजातीत राणीच्या मृत्यूनंतरसुद्धा या मुंग्यांची वसाहत संपत नाही, आधीचे निवडलेले लोकं हे राणीचं काम करत राहतात व त्यांची वसाहत कायम राहते व वाढत राहते. 

इंडियन जम्पिंग अँन्ट् हे कसं करतात ?

तर, या मुंग्यांच्या शरीरात एक विशिष्ट गुण असतो ज्याचा वापर करून त्या त्यांच्या मेंदूचा आकार बदलू शकतात. मेंदूचा आकार लहान करण्यामागे एक मुख्य कारण आहे. या मुंग्या मेंदूचा आकार लहान करून अंडाशय वाढवतात. अंडाशय वाढवल्याने त्यांना जास्तीतजास्त संतती निर्माण करता येते.

अमेरिकेच्या केनेसाव्ह स्टेट युनिव्हर्सिटीमधील अग्रगण्य लेखक डॉ. क्लिंट पेनिच यांच्या म्हणण्यानुसार, इंडियन जंपिंग अँन्ट्समध्ये प्रौढ अवस्थेतदेखील स्वत: ला पूर्णपणे बदलण्याची क्षमता आहे. इतकंच नाही तर राणीपद भूषवून झाल्यानंतर त्या त्यांचे शरीर पुन्हा पूर्ववत सुद्धा करू शकतात. सहसा एक मुंगी अळी असतानाच ती कामगार बनेल की राणी हे ठरलेले असते. जर एखाद्या मुंगीकडे हार्मोन्स आणि निरोगी शरीर असेल तर तिला त्या वसाहतीची राणी म्हणून निवडले जाते. पण इंडियन जंपिंग अँन्ट्सच्या बाबतीत असे नाहीये.

या वसाहतीत असणाऱ्या कामगार मुंगीची कर्तव्य म्हणजे संततीची काळजी घेणे, त्यांना स्वच्छ ठेवणे, तसेच शिकार करणे. इंडियन जंपिंग अँन्ट्सच्या वसाहती इतर मुंगी प्रजातींच्या तुलनेत कायम टिकतात आणि त्याचं कारण म्हणजे राणी मुंगी मेल्यानंतरही या मुंग्या कार्यरत राहतात. या प्रजातीमध्ये पुनरुत्पादनाची संपूर्ण जबाबदारी राणीची असते. राणीशिवाय इतर कोणत्याही महिला कामगार मुंग्यांना अंडी घालण्याची परवानगी नसते.

या मुंग्यांप्रमाणेच कीटकांच्या जगात अजूनही कितीतरी रंजक बारीक गोष्टी असतील नाही का ? त्या सुदधा आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करू. तोवर ही पोस्ट शेअर करायला विसरू नका.

 

लेखक: श्रीपाद कुलकर्णी

सबस्क्राईब करा

* indicates required