computer

'रशियन झुकरबर्ग'- टेलिग्रामचा मालक पॉवेल दुरॉवला देश कायमचा सोडावा लागलाय?जाणून घ्या त्याचा जीवनप्रवास !!

काही लिहायला जावे आणि त्याचा संबंध गेल्या सहा-सात महिन्यांच्या लॉकडाऊन सोबत जोडला जातोच. म्हणजे असं आहे बघा, लॉकडाऊनच्या सुरुवातीला फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर दिसणारा ओळखीचा प्रत्येक माणूस पुढच्या तीन महिन्यात 'टेलीग्राम' वर दिसायला लागला. हळूहळू टेलीग्रामवर असणे किती आवश्यक आहे याच्या चर्चा व्हायला लागल्या. टेलीग्रामवर खातं असूनही न वापरणार्‍या अनेकांना यामुळे जाग आली. आता फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपसोबत 'टेलीग्राम' पण अत्यावश्यक यादीत आलं आहे.

आता टेलिग्राम कसं वापरायचं आणि त्याची इतर समाजमाध्यमांशी स्पर्धा हा आजच्या लेखाचा विषय नाही. पण या निमित्ताने ४० कोटी वापरकर्ते असलेल्या टेलीग्रामच्या निर्मार्त्याची कहाणी आम्ही सांगणार आहोत. चला तर वाचू या 'रशियन झुकरबर्ग' या टोपण नावाने ओळखल्या जाणार्‍या पॉवेल दुरॉवचा जीवनप्रवास ! योगायोग असा की १० ऑक्टोबरला त्याचा वाढदिवसही आहे.

१. पॉवेल दुरॉवचा जन्म १० ऑक्टोबर १९८४ रोजी रशियात झाला. तो आणि त्याचा भाऊ निकोलॉय दुरॉव हे दोघंही लहानपणापासून 'जिनीयस' म्हणूनच ओळखले जात. इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिंपियाडच्या हॉल ऑफ फेममध्ये निकोलॉय दुरॉवच्या नावासमोर तीन सुवर्ण पदकांची नोंद आहे. टेलीग्रामच्या यशात पॉवेल इतकाच निकोलायचाही सहभाग आहे. शाळकरी वयातच पॉवेलने सॉफ्टवेअर कोडींग आत्मसात केले होते. अर्थात शा़ळेच्या वयात त्याचा उपयोग तो खोड्या काढण्यासाठी करायचा.

२. २००६ साली या दोन्ही बंधूंनी मिळून फेसबुकसारखेच VKontakte हे रशियन सोशल अ‍ॅप बनवले. अगदी थोड्याच दिवसांत ते लोकप्रिय झालं आणी वापरकर्त्यांची संख्या ३५ कोटींच्या वर पोहोचली. अल्पावधीतच दुरॉवने या सोशल अ‍ॅपमधून कोट्यावधी डॉल्र्सची कमाई व्हायला लागली.

(निकोलॉय दुरॉव आणि पॉवेल दुरॉव)

थोड्याच दिवसांत दुरॉवने २६ कोटी डॉलर्सचा टप्पा गाठला. अर्थातच इतकी मोठी संपत्ती जमा झाल्यावर रशियन सरकारचे लक्ष त्याच्याकडे वळले आणि सरकारने त्याच्या कंपनीत अधिकाधिक भागीदारी मागायला सुरुवात केली.

(VKontakte)

३. २०११मध्ये या मागणीला उत्तर म्हणून त्यांनी VKontakteवर जिभल्या दाखवणार्‍या कुत्र्याचा फोटो टाकला. नंतरच्या काळात तर सरकारची टर ऊडवणारा ज्याला आपण मराठीत 'तुमच्या नानाची टांग' असे म्हणू अशा प्रकारच मधले बोट वापरून दर्शवणारे फोटो VKontakte वर टाकले. अर्थातच आता हा फोटो डिलीट करण्यात आला आहे. परिणामी VKontakte वरचा ताबा मिळवण्यासाठी सरकारने Mail.ru या इन्व्हेस्टर कंपनीचा वापर केला आणि दुरॉवच्या हातातून कंपनीचा ताबा निसटला.

४. पुतीन सरकारला विरोध करणारे राजकीय गट VKontakteचा वापर करत होते हा एक सरकारी रोषाचा भाग होताच. अलेक्सी नवलानी या पुतीन विरोधकाला दुरॉव मदत करतो आहे असा संशय सरकारला होताच. या ॲलेक्सची बोभाटावरची ही कथा नक्की वाचा.

थेट पुतीनला दहशत देणारा विरोधक अलेक्सी नवेलनी आणि त्याला मारण्यासाठी वापरलेल्या नोव्हीचोक विषाची गोष्ट!!

(अलेक्सी नवलानी)

५. २०१३ साली दुरॉवला अडकवण्यासाठी त्याने ड्रायव्हींग करताना एका पोलीस अधिकार्‍याला ठोकले असा आरोप त्याच्यावर लावण्यात आला. पण दुरॉवला ड्रायव्हींग येतच नसल्याने तो त्या आरोपातून निसटला.

६. हे सगळं घडत असताना दुरॉवने गरज पडली तर वापरण्याचा इमर्जन्सी प्लॅन आधीच आखून ठेवला होता. त्याने अमेरिकेत त्याचं नवं ऑफीस तयार ठेवलं होतं. बर्‍याचश्या कर्मचार्‍यांना आधीच अमेरिकेत हलवलं होतं. या दरम्यान त्याचा कंपनीवरचा ताबा हळूहळू जात होता. त्याला पोलीस स्टेशनमध्ये येऊन जबानी देण्यासाठी धमक्या देण्यात येत होत्या. सरतेशेवटी तो पोलीस स्टेशनला येणारच नाही हे लक्षात आल्यावर त्याच्या घरावर छापा मारण्यात आला. दुरॉवने त्याआधीच देशाबाहेर पळ काढला होता.

७. रशियन सरकार त्याच्यामागे हात धुवून लागण्याचे कारण फक्त VKontakte पुरते मर्यादित नव्हते. दुरॉव आणखी एका सिक्रेट प्रोजेक्टमध्ये गुंतला आहे असा त्यांना संशय होता . हा सिक्रेट प्रोजेक्ट म्हणजे 'टेलीग्राम'. मॉस्को टाइम्स या वृत्तपत्राने जेव्हा दुरॉवकडे सिक्रेट प्रोजेक्टबद्दल विचारले तेव्हा त्याने 'शॉन पार्कर'चा सोशल नेटवर्क या चित्रपटातला फोटो उत्तरादाखल पाठवला होता.

८. टेलीग्राम या अ‍ॅप्लीकेशनचे सॉफ्टवेअर इतके जटील आहे की त्याचे एनक्रिप्शन तोडण्यात कोणत्याही सरकारला अजून यश मिळालेले नाही. पण अजूनही टेलीग्राम चालवण्यासाठी दुरॉवला दरमहा १० लाख डॉलर खर्च करावे लागतात. आजच्या तारखेस ४० कोटी वापरकर्ते असलेल्या टेलीग्रामला फेसबुकसारखे व्यावसायिक यश मिळालेले नाही.

९. रशियातून बाहेर पडल्यावरही सरकार आपल्याला सोडणार नाही याची खात्री असल्याने बरीच वर्षे दुरॉव अनेक देशांत फिरत होता. सतत राहण्याच्या जागा बदलत होता. हॉटेलमध्ये रहाण्यापेक्षा 'एअर बी अँड बी'चा वापर करत होता.

१० दुरॉव त्याच्या जीवनशैलीसाठी प्रसिध्द आहे. मॅट्रिक्स चित्रपटातल्या निओसारखा तो नेहमी काळे कपडेच वापरतो. अजूनही त्याला गाडी चालवता येत नाही. २०१२ साली रशियन चलनाची म्हणजे अप्रत्यक्षरित्या सरकारची टवाळी करण्यासाठी त्याने ५००० रुबलच्या कागदी नोटांची विमानं बनवून ऑफीसच्या खिडकीतून उडवली होती. याचा संबंध अप्रत्यक्षपणे टेलिग्रामच्या लोगोमधल्या कागदी विमानाशी आहे. अ‍ॅलना शिस्कोवा या रशियन मॉडेलसोबत त्याचे अफेअर चालू आहे असं म्हणतात, पण दुरॉवच्या वागण्याबद्दल कोणीच काही खात्रीलायक सांगू शकत नाही.

(दुरॉव कागदी नोटांची विमानं उडवताना)

११. रशियातून बाहेर पडल्यावर अनेक ठिकाणी फिरून आता तो दुबईत स्थायिक झाला आहे असं म्हणतात. अर्थात खर्च चालवण्यासाठी त्याला काहीतरी करणे भागच आहे, कारण टेलीग्राममधून त्याला काहीच फायदा मिळत नाही. यासाठी त्याने 'बिटकॉइन' सारखी एक व्हर्च्युअल करन्सी तयार केली आहे. या करन्सीच्या विक्रीची सुरुवातीची रक्कम म्हणजे इनिशिअल कॉइन ऑफर तब्बल दोन बिलीयन म्हणजे २०० कोटी डॉलरची होती.

१२. टेलिग्राम आता लोकप्रिय झाले असले तरी त्या अ‍ॅपबद्दल जगातल्या अनेक सरकारांना त्याच्या गैरवापराबद्दल शंका आहेत. आयसिस आणि त्यासारख्या अनेक दहशतवादी संघटना टेलिग्रामचा वापर करतात असा संशय आहे. बर्‍याच देशांत त्यावर बंदी आणण्याचा पण विचार केला गेला होता. आपल्या देशात तसे काही घडल्याचे वृत्त अजूनतरी नाही. पण अनेक बेकायदेशीर उद्योग टेलीग्रामचा वापर करत असावेत अशी शंका घ्यायला वाव आहे. उदाहरणार्थ, सध्याची युवा पिढी अनेक पुस्तके-मासिके-चित्रपट बेकायदेशीररीत्या डाऊनलोड करण्यासाठी टेलिग्रामचा वापर करते. बेकायदेशीर वापराचे हे एक सौम्य उदाहरण आहे असे म्हणायला हरकत नाही. सोबत अनेक कंपन्या आणि सामाजिक समूह त्याचा योग्य वापर करतानाही आढळतात.

१३. टेलिग्रामचे भविष्य काय हे आजच्या घडीस कोणीही सांगू शकत नाही. मात्र सोशल मिडीयाचा आता तो अविभाज्य भाग झाला आहे हे नक्की!

सबस्क्राईब करा

* indicates required