computer

काय म्हणता हिंग भारतात पिकत नाही ? मग तो येतो तरी कुठून ? रोजच्या जेवणात वापरतो त्याला अस्सल हिंग का म्हणता येणार नाही ?

आश्चर्य वाटेल, पण आपण रोजच्या स्वयंपाकात वापरतो त्या हिंग अगदी एक ग्रॅमही भारतात पिकत नाही. आपली कुठलीच फोडणी हिंगाशिवाय पूर्ण होत नाही, पण.. हिंग काही भारतात पिकत नाही. हजारो वर्षे आपण बाहेरच्या देशांतून म्हणजे अफगाणिस्तान, इराण, उझबेकीस्तान अशा दूरवरच्या देशांतून हिंग मागवतो. जगात पिकणार्‍या एकूण हिंगापैकी ४% हिंग आपणच वापरतो. दरवर्षी एकूण १२०० टन हिंग आयात करण्यासाठी आपण १३० कोटी डॉलरचा खर्च करतो.

या हिंगाची एक गंमत अशी आहे की भारतासारखे मोजकेच देश हिंगाचा वापर पाककृतीत करतात. युरोपियन अणि अमेरिकन लोकांना तर हिंगाचा वाससुद्धा नकोनकोसा वाटतो. त्यामुळे हिंग त्यांच्याकडे 'डेव्हिल्स डंग' या नावाने ओळखला जातो. भारतात ईशान्य-पूर्व राज्यांत पण हिंग जवळजवळ वापरला जात नाही. असं म्हणतात की १६ व्या शतकात मोगलांनी पहिल्यांदा हिंग आपल्याकडे आणून स्वयंपाकात रुजवला. पण या दाव्यात काही तथ्य असावे असे वाटत नाही कारण आयुर्वेदात हिंग औषध म्हणून वापरला जातो. सध्या आपल्याला बाजारात जो हिंग मिळतो ती पावडर म्हणजे खरा हिंग नव्हे. ती पावडर म्हणजे गव्हाच्या पिठात ७०:३० प्रमाणात मिसळलेला हिंग. तर असा हा आपल्या अन्नातला महत्वाचा घटक भारतात पिकतच नाही. पण आता एक चांगली बातमी अशी आहे की भारतात हिंगाची रोपे तयार करून त्याची योग्य पध्दतीने वाढ करण्याचे तंत्र भारतीय कृषीतज्ञांनी विकसित केले आहे.

हिंग हा वनस्पतीच्या खोडातून पाझरणारा एक प्रकारचा डिंक आहे. त्यात गंधकाचे प्रमाण असल्याने तो खास गंध त्या डिंकाला मिळतो. सुकल्यावर हा डिंक गर्द तपकिरी रंगाचा होतो. हा डिंक असल्याने त्याची पावडर करणे कठीण असते. त्याला खलबत्त्यात घालुन तासनतास कुटावे लागते. त्यानंतर मैदा आणि इतर साधा नैसर्गिक डिंक घालून कुटल्यावर आपण वापरतो तशी हिंगाची पावडर तयार होते.

पण मुळात प्रश्न असा आहे की हिंग आपल्याकडे का पिकत नाही?? महत्वाचे कारण असे की हिंगाची लागवड कशी करावी यावर शास्त्रशुध्द मार्गदर्शन कुठेच उपलब्ध नाही. म्हणून आपल्या शास्त्रज्ञांना या वनस्पतीची अ‍ॅग्रोटेक्नॉलॉजी विकसित करावी लागली.

२०१६ पासून (CSIR) सेंटर फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रीअल रिसर्चची एक शाखा इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन बायो रिसोर्स टेक्नीलॉजी हिंग वनस्पतीची रोपे तयार करण्याचा प्रयत्न करत होती. भारतात हिंगाची रोपे उपलब्ध असल्याचा अनेकांचा दावा आहे, पण ती रोपे म्हणजे खरा हिंग अ‍ॅसाफोटीडा फेरुला नाहीत. हिंगाचे बीज गेल्या ३० वर्षांत भारतात कोणीही आणले नाही. दुसरे असे की इराण-अफगाणिस्तान हे देश युध्दात इतके गुंतलेले आहेत की त्यांच्याकडून काही मदत मिळण्याची अपेक्षाच नाही.

हिंगाची रोपे उगवली की काही दिवसातच ती जमिनीत गडप होतात आणि नंतर बर्‍याच कालांतराने वर येतात. दुसरे असे की या रोपांची वाढ फक्त बर्फामुळे हवेतून जे बाष्प मिळते त्यावरच होते. इतर पिकांसारखे पाणी देता येत नाही. रासायनिक खतांचा वापर करता येत नाही. थोडक्यात हिमालयाच्या परिसरातच हिंगाचे पिक घेणे शक्य आहे. हिमालयन बायो रिसोर्स टेक्नीलॉजीने एकूण ५०० हेक्टर जमिनीवर हिंगाची शेती केली आहे. सोबत त्या भागातील शेतकर्‍यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. सोबतच 'टिश्यू कल्चर' सारखे तंत्र वापरून मोठ्या प्रमाणात या वनस्पतीची रोपे उपलब्ध होतील याची तयारीही चालू आहे. हे सर्व यशस्वी होण्यासाठी चार-पाच वर्षांचा कालावधी जाईल, पण त्यानंतर अफगाणिस्तानच्या दर्जाचा हिंग भारतात उपलब्ध होईल अशी खात्री शास्त्रज्ञांना आहे.

सध्या बाजारात १०० ग्रॅम हिंगाचा भाव रुपये ३०० ते १००० इतका आहे. हे लक्षात घेता एक नवे 'कॅश क्रॉप' म्हणजेच नगदी पीक शेतकर्‍यांना मिळून थोड्याच वर्षांत जगभरात भारतीय हिंगाचा घमघमाट पसरला असेल!

सबस्क्राईब करा

* indicates required