computer

या आहेत 'मिस वर्ल्ड' ठरलेल्या ६ भारतीय महिला !!

मिस युनिव्हर्स व मिस अर्थच्या बरोबरच ‘मिस वर्ल्ड’ (विश्व सुंदरी) ही स्पर्धा देखील तितकीच महत्वाची मानली जाते. मिस वर्ल्ड स्पर्धेत प्रवेश मिळवण्यासाठी प्रत्येक स्पर्धकाला त्यांच्या देशातील सौंदर्य स्पर्धा जिंकणे भाग आहे. म्हणजेच भारतीय मॉडेलला सर्वात आधी ‘फेमिना मिस इंडिया’ हा खिताब मिळवावा लागतो.

१७ वर्षापूर्वी म्हणजेच २००० साली ‘प्रियांका चोप्रा’ विजेती ठरली होती पण त्यानंतर कोणत्याही भारतीय सुंदरीला ही संधी मिळाली नाही. मंडळी, पूर्वी मिस वर्ल्ड खिताब जिंकलेल्या देशांच्या यादीत व्हेनेझुएला नंतर भारताचा दुसरा क्रमांक लागत होता पण आता भारत व्हेनेझुएलाच्या बरोबरीला आला आहे. आता पर्यंत एकूण ६ भारतीय महिलांना हा खिताब मिळालाय.

आज आपण बघणार आहोत मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकलेल्या ६ भारतीय महिला ! 

१. रीता फारिया - १९६६

१९६६ साली झालेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेत पहिल्यांदा भारतीय महिलेने विश्व सुंदरी होण्याचा मान मिळवला. त्या होत्या रीता फारिया. रिता या भारतीयच नाहीत तर संपूर्ण आशियातील पहिल्या महिला होत्या ज्यांनी 'मिस वर्ल्ड' हा खिताब मिळवला. पुढे एक वर्षाने त्यांनी मॉडेलींग आणि अभिनय सोडून एम.बी.बी.एस. पूर्ण केलं आणि त्या डॉक्टर झाल्या.

सध्या त्या आयर्लंड मधील डब्लिन येथे आपल्या कुटुंबासमवेत राहत आहेत.

२. ऐश्वर्या राय – १९९४

सर्व मिस वर्ल्ड विजेत्यांमध्ये सर्वात जास्त लक्षात राहिली ती ऐश्वर्या राय. १९९४ च्या स्पर्धेत ऐश्वर्या राय विश्व सुंदरी ठरली होती. गम्मत म्हणजे ऐश्वर्या मिस इंडिया स्पर्धेची विजेती नसून उपविजेती होती. तिच्या जिंकण्याने २८ वर्षांनी भारताला हा खिताब मिळाला होता.

१९९४ हे वर्ष दोन अर्थाने खास होतं. एक म्हणजे मिस इंडिया स्पर्धेची विजेती सुश्मिता सेन हिने 'मिस युनिव्हर्स' स्पर्धा जिंकून पहिल्यांदा मिस युनिव्हर्सचा खिताब भारताला मिळवून दिला आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऐश्वर्या राय उपविजेती असूनही तिने मिस वर्ल्ड स्पर्धेत बाजी मारली. १९९४ मध्ये खऱ्या अर्थाने भारतीय सौंदर्य जगभरात चर्चेचा विषय ठरला होता

३. डायना हेडन – १९९७

डायना हेडन ने १९९७ साली मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकली. २००८ सालच्या बिग बॉस स्पर्धेत ती दिसली होती.

४. युक्ता मूखी – १९९९

वयाच्या सात वर्षापर्यंत 'युक्ता मुखी' दुबई मध्ये वाढली. त्यानंतर भारतात येऊन तिने १९९९ सालची विश्वसुंदरी होण्याच्या मान मिळवला. यावेळी तिने स्पर्धेतील ९३ स्पर्धकांन मॉडेल्स ना मागे टाकलं होतं.

५. प्रियांका चोप्रा – २०००

१९९९ आणि २००० या दोन्ही वर्षात भारतीय महिलांनी मिस वर्ल्ड स्पर्धेत आपली छाप पाडली. २००० सालची विजेती ठरली 'प्रियांका चोप्रा'. पुढे तिने बॉलीवूड मध्ये आपल्या अभिनयाची चमक दाखवली हे सर्वांनाच माहित आहे. २०१६ साली प्रियांकाला पद्मश्रीने गौरवण्यात आलं.

६. मानुषी छिल्लर – २०१७

प्रियांका नंतर तब्बल १७ वर्षांनी मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड बनली आहे. जून २०१७ ची ती मिस इंडिया होती. मानुषी मेडिकलची विद्यार्थिनी असून तिने कुचीपुडी नृत्य प्रकार शिकला आहे. हरियाणा सारख्या पुरुषसत्ताक राज्यातून ती आली आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required