computer

कोरोनावरच्या जागतिक संशोधनात या दोन भारतीयांचे आहे महत्त्वाचे योगदान. एक आहे बंगाली, तर दुसरा आहे कोल्हापूरचा गडी!!

जगभरातील जवळजवळ २ लाख लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. हजारो लोकांचा बळीही गेला आहे. हा विषाणू चीनमध्ये पसरला तेव्हापासून या विषाणूवर मात करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. बऱ्याच प्रयत्नानंतरही अजून तरी एकच एक औषध तयार करण्यात यश आलेलं नाही, पण कदाचित लवकरच कोरोनावर औषध उपलब्ध झालेलं असेल. या दिशेने आपण पहिलं पाऊल टाकलं आहे.

(अरिंजय बॅनर्जी)

कोणत्याही विषाणूवर औषध शोधण्यासाठी आधी तर तो विषाणू वेगळा काढणं महत्त्वाचं असतं. कॅनडातील शास्त्रज्ञांना या कामात यश आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या शास्त्रज्ञांच्या टीमने ही कामगिरी फत्ते केली त्यात एक भारतीय शास्त्रज्ञ सुद्धा आहे. या शास्त्रज्ञाचं नाव आहे अरिंजय बॅनर्जी.

अरिंजय बॅनर्जी हे मॅकमास्टर युनिव्हर्सिटीत रोगप्रतिकारशास्त्र, विषाणूशास्त्र, संक्रमण आणि जीवशास्त्राचा अभ्यास करतात. सनीब्रुक रिसर्च इन्स्टिट्यूट, टोरोंटो युनिव्हर्सिटी आणि मॅकमास्टर युनिव्हर्सिटी या तीन विद्यापीठांनी मिळून शास्त्रज्ञांची कोरोना विषाणूवर अभ्यास करण्यासाठी टीम तयार केली होती. या टीममध्ये अरिंजय बॅनर्जी यांनी काम केलं.

कोरोना विषाणूच्या दोन नमुन्यांवर काम करून कोरोना विषाणूला बाजूला काढण्यात आलं आहे. अरिंजय बॅनर्जी म्हणाले, की ‘आम्ही SARS-CoV-2 विषाणूला वेगळं करण्यात यश मिळवलं आहे. आता आम्ही ही माहिती इतर शास्त्रज्ञांना देऊन एकत्र काम करू शकतो. जितके जास्त विषाणू वेगळे केले जातील तेवढंच आम्हाला शिकायला मिळेल, एकत्र काम करता येईल आणि इतरांसोबत माहिती वाटता येईल.’

कोरोना विषाणूवर औषध शोधण्याची ही पहिली पायरी  होती. विषाणू वेगळा केल्यामुळे तो विषाणू कशाप्रकारे काम  करतो आणि त्याला कोणत्या पद्धतीने रोखता येईल याचा अभ्यास सोप्पा होणार आहे. हे शक्य केल्याबद्दल कॅनडाच्या शास्त्रज्ञांचे आणि आपल्या भारतीय अरिंजय बॅनर्जी यांचं नाव नक्कीच इतिहासात अभिमानाने घेतलं जाईल.

हा झाला एक भारतीय. असाच एक भारतीय आणि मुळचा आपल्या महाराष्ट्राचा असलेला जय शेंदुरे सध्या अमेरिकेतील संशोधनाची धुरा सांभाळत आहे. जेव्हा कोरोना विषाणू चीनमध्ये अजून कुठे पसरत होता तेव्हाच जय शेंदुरे आणि त्याच्या फ्लू सोसायटी संस्थेने मिळून कोरोना विषाणूवर संशोधन सुरु केलं होतं. कोरोना विषाणूवर सर्वप्रथम संशोधन करणाऱ्या लोकांमध्ये जय शेंदुरे आणि त्याच्या टीमचं नाव घेतलं तर वावगं ठरणार नाही. दुर्दैवाने काही कायदेशीर बाबींची पूर्तता अपूर्ण असल्यामुळे त्यांच्या संशोधनाची परवानगी नाकारण्यात आली. असं असलं तरी फ्ल्यू सोसायटीने आपलं संशोधन  सुरूच  ठेवलेलं आहे. याबद्दल त्यांचं कौतुक करायलाच हवं.

तर मंडळी, औषध शोधलं जाईलच, पण तुम्ही काळजी घेताय ना? हात स्वच्छ ठेवा आणि इतरांपासून दोन  हात लांबच रहा.

सबस्क्राईब करा

* indicates required