भारतातली सर्वात कमी उंचीची वकील,कोणत्या मानसिक त्रासांतून तिने हा टप्पा गाठला आहे माहित आहे?

१० वी, १२ वी झाली की पुढे काय करायचे हा प्रश्न सर्वांना पडतो. पण काही लोक असे असतात ज्यांना इथून पुढे फक्त शिकणे हेच मोठे संकट वाटते. यामागे अनेकांचे अनेक कारणे सांगता येतील. काहींना शारीरिक गोष्टींवरून दिला जाणारा त्रास हा मोठा मुद्दा असतो. याही गोष्टींचा सामना करून मोठे यश संपादन करणारे दिसतात.

हरविंदर कौर नावाच्या मुलीला तिच्या कमी उंचीसाठी चिडवले जायचे. यामुळे तिच्या वयाचा उमेदीचा काळ डिप्रेशनमध्ये गेला. यामुळे ती शाळेत जायचे सुद्धा टाळत असे. अशा सर्व गोष्टींचा संघर्ष करूनही ती थांबली नाही आणि आज ती भारतातील सर्वात कमी उंचीची वकील बनली आहे.

हरविंदर तिसरीत असताना तिला समजले की तिची उंची इतर मुलींसारखी वाढत नाहीये. तिच्यावर उपचारही करण्यात आले. पण या उपचाराचा काहीही फायदा झाला नाही. तिला लहानपणी एअरहोस्टेस व्हायचे होते. पण आपले हे स्वप्न काही पूर्ण होत नाही हे तिला कळून चुकले. शाळेत तिला कमी उंचीवरून प्रचंड टोमणे सहन करावे लागत होते. याच कारणाने शाळा पूर्ण झाल्यावर तिला कॉलेजमध्ये जायची भीती वाटू लागली होती. पण तिला आपल्या कुटुंबावरील ओझे म्हणून जगायचे नव्हते.

पूर्ण हिंमत एकवटून तिने जालंधर येथील केसीएल इन्स्टिट्यूट येथे कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी ऍडमिशन घेतले. इथेही तिला त्रास नव्हता असे नाही. तिला इथेही टोमणे पडतच होते. जज समोर उभी राहिल्यावर दिसशील तरी का? असे टक्केटोणपे ती सहन करत होती. आता मात्र तिने जालंधर येथील सेशन्स कोर्टात वकिली सुरु केली आहे. तिचा त्रास संपला असे वाटत असेल तर तुम्ही चूक आहात. आता फरक एवढा आहे की तिची हिंमत वाढली आहे. आपली ओळख आपल्या कामावरून होते आपल्या दिसण्यावरून नाही हे तिला कळून चुकले आहे.

एकेकाळी तिला चिडवले जात होते, पण आज तिचे २ लाख ७५ हजार इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स आहेत. तसेच ती मोटिव्हेशनल स्पीकर म्हणूनही ओळखली जाते आहे. यापुढे शारीरिक कमींचा सामना करणाऱ्या लोकांना मदत करण्याचा तिचा मानस आहे.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required