f
computer

स्मगलिंग करण्याचे पाहा कसले भन्नाट प्रकार या लोकांनी शोधले आहेत

स्मगलर्स ही जमात आपल्याला टीव्ही-सिनेमात बघून माहित असते. पण आजकाल या स्मगलर्सना पकडल्याच्या आणि त्यांच्या सोनं-हिरे-पैसे दडवण्याच्या भन्नाट आयडियांच्या बातम्या खूपच येत आहेत असं वाटत नाही का तुम्हांला?

काल-परवापासून २०००रूपयांच्या नोटांचं स्मगलिंग करण्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर अशा बातम्यांचा शोध घेतला, आणि चोरांच्या काही वाटा समजल्या. अर्थात या अशा लोकांना पकडणं हे एअरपोर्टवरच्या अधिकार्‍यांचं यश. बरोबर लोक हुडकून, स्मगलिंगचा माग काढणं सोपं नाही. हो, पण या पद्धती सापडल्या म्हणून कळाल्या तरी. अशा न कळालेल्या अजून किती आयडिया चोरांकडे आहेत कोण जाणे!!

७. स्टेपल पिन्स

२०१६च्या जूनमध्ये नवी दिल्लीच्या विमानतळावर अब्दुल सत्तार नावाच्या माणसाकडच्या सामानामुळं तिथल्या एअरपोर्टवरचे अधिकारी चक्रावले होते. त्यानं परदेशातून टीव्ही आणि ब्लेंडर अशा घरगुती वापराच्या वस्तू आणल्या होत्या. अशा वस्तू कार्डबोर्डच्या बॉक्समध्ये असतात. पण या माणसानं आणलेल्या कार्डबोर्डच्या बॉक्सेना तब्बल १०९ स्टेपलरच्या पिना मारलेल्या होत्या. आणि दिसायला त्या हुबेहूब स्टेपलर पिन्ससारख्या करड्या रंगाच्याच होत्या.   हे जरा जास्तच झालं ना? त्या अधिकार्‍यांनासुद्धा या  रंगवलेल्या या पिना चक्क सोन्याच्या आहेत हे ओळखायला जरा वेळच लागला.  या सोन्याच्या पिनांचं वजनही सुमारे पाऊण किलो भरलं.

६. इलेक्ट्रॉनिक सामान

दिल्ली एअरपोर्टवर एका माणूस फक्त एक बॅग आणि एक एलईडी टीव्ही घेऊन उतरला. त्याला तसं बाजूला घेण्याचं काहीच कारण नव्हतं. पण तो विनाकारण घाई करत असल्यानं आणि थोड्या संशयास्पद हालचालीनं अधिकार्‍यांचा संशय बळावला. टीव्ही उघडला तर आत अस्सल सोनं भरलेलं. 

इमर्जन्सी लाईटच्या रिचार्जेबल बॅटरीजच्या ठिकाणी एकाने सोन्याच्या शिगा ठेवल्या होत्या. गंमत म्हणजे त्या इमर्जन्सी लाईटमध्ये आठ बॅटर्‍यांची जागा होती तर यांनी फक्त त्यातल्या चारच बॅटर्‍यांच्या ठिकाणी सोनं ठेवलं होतं. म्हणजे लाईटही लागेल आणि सोनंही इकडून तिकडं नेता येईल. 

दोन वर्षांपूर्वी हॉंगकॉंगहून गुजरातेतल्या अहमदाबादेत पोस्टानं एक पार्सल आलं होतं. त्यातल्या खेळण्यांतल्या बॅटर्‍यांच्या ठिकाणी सोन्याची बिस्किटं होती. कुणीतरी खोटा पत्ता देऊन ते पार्सल ताब्यात घेण्याआधी गुजरात अधिकार्‍यांना खबर मिळाली. अर्थातच, नंतर ते पार्सल न्यायला कुणी आलं नाही. 

एकदा एका हेअर स्ट्रेटनरमध्ये लपवलेले सोन्याचे दोन रॉड्स विमानतळ अधिकार्‍यांना सापडले होते.

५. चोरकप्पे

बॅगा किंवा इतर कपड्यांना चोरकप्पे शिवून त्यातूनसुद्धा स्मगलिंग करण्याचे बरेच प्रकार घडलेत. 

जुलै २०१६मध्ये दुबईहून कोचीला आलेल्या एका प्रवाशाच्या सॉक्समध्ये एकेका किलोची दोन सोन्याची बिस्किटं सापडली. ती त्यानं कार्बन पेपरमध्ये गुंडाळून तिथं ठेवली होती. परदेशातून इलेक्ट्रॉनिक वस्तू आणताना बरेचजण त्या ऍल्युमिनिअम फॉईलमध्ये गुंडाळतात, त्यांना वाटतं स्कॅनर काही या फॉईलखालची वस्तू दाखवणार नाही. साधारण तसाच समज या कार्बन पेपरबद्दल लोकांना आहे. त्यामुळं कार्बन पेपरमध्ये गुंडाळून सोनंनाणं आणणं अगदी कॉमन आहे. 

अब्दुल रहीम बादशाह पटेल नावाच्या एका माणसाला दिल्ली विमानतळावर थांबवण्यात आलं होतं. कारण होतं की त्याने जरा जास्तच ढगळ पॅंट घातली होती. त्याची झडती घेतली तेव्हा त्याच्या पायाभोवती बांधलेले ५०लाखाचे दागिने सापडले. 

एका माणसाच्या बेल्टच्या बक्कलमध्येसुद्धा एकदा सोनं सापडलं होतं. 

४. शरीरात लपवून स्मगलिंग करणं

हा सगळ्यात धोकादायक असा स्मगलिंगचा प्रकार. लोक शरीरात पॅकेट्स ठेवून घेतात आणि नंतर ती बाहेर काढली जातात. ही पॅकेट्स शरीरात कशी जातात हेही मोठं गंमतीदार प्रकरण आहे. 

२०१६च्या मे महिन्यात गोव्यातल्या दाबोळी विमानतळावरच्या अधिकार्‍यांना असाच एक अनुभव आला. फक्रुद्दिन मणियार नावाच्या २३ वर्षांच्या एका तरूणानं कंडोममध्ये लपवून सोन्याची दोन बिस्किटं त्याच्या ’मागून’ आत सारली होती. इतकंच नाही, तर आणखी चार बिस्किटं बुटांतसुद्धा लपवली होती. तिथल्या अधिकार्‍यांनी याची ’बिघडलेली चाल’ हेरली आणि मस्तपैकी बाजूला घेतलं.  यानंही कंडोममध्ये घालण्याआधी त्या सोन्याच्या बिस्किटांभोवती कार्बन पेपर गुंडाळला होता म्हणे. या बिस्किटांची किंमत २४ लाख होती. हा मुलगा मुंबईहून गोव्याला गेला होता आणि अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार कुणा परदेशाहून आलेल्या माणसानं त्याला ही बिस्किटं दिली असावीत. 

आणखी एका केसमध्ये खबर्‍यानं खबर दिल्यानंतर एका माणसाला ’बाजूला’ घेतलं गेलं. पण त्याच्याकडे काहीच सापडलं नाही. खबर्‍या आणि त्याची खबर तर पक्की होती. त्यामुळं काहीच न सापडलेल्या अधिकार्‍यानं वैतागून त्या प्रवाशाच्या मुस्कटात मारली, तर कळालं की त्यानं दाढीमध्ये सोन्याच्या अगदी बारीक तारा लपवल्या होत्या!!

३. इमिटेशन ज्वेलरीची अदलाबदल

हा सगळ्यात सोपा आणि पकडलं जाण्याची कमी शक्यता असलेला मार्ग आहे. परदेशात जाताना खोटे दागिने सोबत घेऊन जायचं, पण जाताना त्यांची सोन्याचे दागिने म्हणून नोंद करायची. तिकडे गेलं की हे खोटे दागिने फेकून द्यायचे आणि अस्सल सोन्याचे दागिने परत घेऊन यायचे. जाताना आधीच नोंद केली असल्यानं धोकाही तुलनेनं कमी. 

२. कपड्यांतून पैसे लपवून नेणं

हा प्रकार गेल्या आठवड्यातच घडला. नवीन कपड्यांच्या घड्यांमधून दोन जाड पुठ्ठे एकमेकांना चिकटवले आणि त्या पुठ्ठ्यांच्या मध्ये चिकटवली पैशांची पाकिटं. एक-दोन नाही, चक्क बावन्न पाकीटं. या पाकीटांत म्हणे ७५ करोड रूपये होते. 

१. अंतर्वस्त्रांतून सोन्याचं स्मगलिंग

ही स्मगलर्सची सर्वात आवडती पद्धत दिसतेय. हे लोक चड्ड्यांना आतून चोरकप्पे शिवतात, नाहीतर एकावर एक भरपूर चड्ड्या घालतात आणि त्यांच्या थरांत सोनं-हिरे-दागिने लपवतात. पण तरीही ते विमानतळावरच्या स्कॅनरमध्ये सापडतात. 

याच्या एक नाही, अनेक बातम्या आहेत. आत्ता ३१ डिसेंबरला हैदराबाद एअरपोर्टवर दोन लोकांना अंडरवेअरमधून सव्वाकिलोचं सोनं आणताना पकडलं गेलंय.

बायकाही या प्रकारात मागे नाहीत. या वर्षी ऑगस्टमध्ये एका फरहत उन्नीसा नावाच्या बाईला दिल्ली विमानतळावर अंडरवेअरमधून २.१६ किलो सोनं आणताना पकडलं.

हे तर काहीच नाही,एप्रिल २०१४ मध्ये एका नैरोबियन बाईने एकावर एक सहा चड्ड्या घालून त्यातून सोनं आणि हिरे आणायचा प्रयत्न केला. पण तिला मुंबईच्या विमानतळावर बरोबर हेरलं गेलं आणि सगळे दागिने काढून घेतले.

जोडपं आणि तेही लेकुरवाळं असेल तर त्यांच्यावर सहसा संशय घेतला जात नाही. पण २०१३ मध्ये एका जोडप्याला मंगलोर एअरपोर्टवर हटकलं आणि त्या बाईच्या अंडरवेअरमध्ये सोन्याची नाणी आणि दागिने सापडले.

२०१४मध्ये चेन्नईतसुद्धा अशाप्रकारे स्मगलिंग करू पाहणार्‍या काही तरूणांना पकडलं  गेलं होतं.

 

इतकं करूनही १०%हूनही कमी स्मगलिंग पकडली जाते असं रिपोर्टस म्हणतात. आता याहून काय वेगळ्या आणि विचित्र मार्गाने हे लोक स्मगलिंग करत असतील देव जाणे.