भारतीय नौदलाची शान आज होणार निवृत्त : वाचा आयएनएस विराटची वीरगाथा

मुंबई : अनिकेत जोशी | भारतीय नौदलाची शान आणि शक्तीस्थळ असणारी, सागरी सेवेचा जगात विक्रम प्रस्थापित करणारी आयएनएस विराट युद्धनौका आज ६ मार्चला नौदलाच्या सेवेतून निवृत्त होतेय. त्यासाठी एका विशेष समारंभाचे आयोजन मुंबईच्या नौदल  गोदीत करण्यात येत आहे.
याच मुंबई गोदीमध्ये १९८७ मध्ये आयएनएस विराट भारतीय नौदलाच्या ताफ्यात सहभागी झाली होती. त्या आधी ही नौका इंग्लंडच्या नौदलामध्ये होती आणि तिचं नांव होतं ’एचएमएस हरमीस’. इंग्लंडच्या नौदलात तिनं तब्बल २७ वर्षांची सेवा बजावलेली होती. अशा प्रकारे सत्तावन्न वर्षांची सलग नौदल सेवा या आधी कोणत्याच युद्धनौकेने बजावलेली नाही असं भारताच्या पश्चिम नौदल विभागाचे प्रमुख रिअर अडमिरल गिरीश लूथ्रा यांनी अभिमानाने नमूद केलं आहे. नौदलाने काही पत्रकारांना विराट नौकेच्या अखरेच्या दर्शनासाठी पाचारण केले होते त्या वेळी ते बोलत होते. 

भारतीय नौदल विराटला निरोप देताना-स्त्रोत

विराटचं पुढे काय होईल? 
पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना रिअर अडमिरल लूथ्रांनी यासाठी बरेच पर्याय समोर असल्याचं सांगितलंय. विराटचे रूपांतर नौदल संग्रहालयात करावे किंवा आंध्र सरकारच्या मागणीनुसार तरचे उपहारगृह बनवण्यासाठी ही नौका सोपवावी किंवा त्याची आणखी काही उपयोग करावा या विषयीचा निर्णय़ संरक्षण मंत्रालयात घेतला जाईल. जुन्या निवृत्त युद्धनौकांचा विविध प्रकारे उपयोग नौदल करू शकते”.  “काही छोट्या युद्ध नौका या किनाऱ्यावर योग्य ठिकाणी ठेवून जनतेसाठी पाहण्यासाठी स्मारकरूपात ठेवल्या जातात, काहींचा उपयोग नौ सैनिकांच्या प्रशिक्षणाच्या कामी केला जातो आणखी काही नौका या प्रत्यक्ष युद्ध व अस्त्र सरावासाठी लक्ष्याची भूमिकाही पार पाडू शकतात आणि काही अखेरीस भंगारात काढल्या जातात. या आधीची आपली विमानवाहू नौका विक्रांतची रवानगी अखेरीस भंगारासाठीच कऱण्यात आली होती. विराट नौकेचे रूपांतर संग्रहालयात कऱण्याची मागणी सध्या केंद्र सरकारच्या स्तरावर विचाराधीन आहे.”

स्त्रोत

काय होती आय.एन.एस. विराटची ताकद?
“जलमेव यस्य, बलमेव तस्य” म्हणजेच ज्याच्या हाती सागर आहे सत्ता त्याचीच आहे, असे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या विराटवर एकेकाळी अठरा सी-हॅरिअर विमाने व काही चेतक हेलिकॉप्टर्स ठेवलेली असत. विराट युद्धनौकेवर एकाच वेळी एकराशे नौसैनिक असत. ऑपरेशन ज्युपीटर आणि ऑपरेशन पराक्रम या दोन्ही मध्ये विराटने अतुलनीय कामगिरी बजावली. श्रीलंकेमध्ये भारतीय शांतीसेनेच्या कारवाई वेळी झालेल्या ऑपरेशन ज्युपीटरमध्ये जुलै 1989 मध्ये विराट सहभागी होती. शेकडो हेलिकॉप्टर फेऱ्या करून अनेकांना वाचवण्यात विराटने यश मिळवले. संसदेवर अतिरेक्यांनी हल्ला केला त्यानंतर 2001 मध्ये ऑपरेशन पराक्रम निमित्ताने भारतीय सैन्याने पाकला ताकद दाखवली होती. अनेक महिने ती मोहीम सुरु होती. त्यावेळी पश्चिम नौदल ताफ्याचे नेतृत्व करताना विराटने अनेक महिने पूर्ण तयारीत सज्ज राहून भूमिका निभावली होती. 

 

विराटनंतर पुढं काय?
रिअर अडमिरल गिरीश लूथ्रा यांनी सांगितले की नवीन विमानवाहू नौका विक्रमादित्य आता पूर्ण क्षमतेने नोदलाच्या सेवेत रुजू  झाल्यानंतर विराट निवृत्त होत आहे. एकाच वेळी तीन विमानवाहू युद्ध नौका असाव्यात असे नौदलाचे धोरण आहे. दुसऱ्या विमानवाहू नौकेचे बांधकाम कोचीन मध्ये सुरु असून त्या नौकेचे नाव विक्रांत ठेवण्यात येणार आहे. नौदलासाठी आधुनिक बहुद्देषीय हेलिकॉप्टर मिळवण्याचा कार्यक्रमही लौकरच पूर्णत्वास जायला हवा असे ते म्हणाले.

कोची बंदरातून निघताना आय एन एस विराटला मिळाला निरोप (स्त्रोत) 

आणखी कोणत्या युद्धनौका बाद केल्या जातील? 
तीन वर्षांपूर्वी  स्पोटात सापडलेली अडीच हजार टनी, किलो क्लासची पाणबुडी सिंधुरक्षक देखील आता निवृत्त करण्यात येणार आहे. पावसाळ्यापूर्वी ती सेवेतून बाद करावी असा नौदलाचा विचार आहे. मात्र अंतिम निर्णय दिल्लीतून येणे अपेक्षित आहे. या पाणबुडीवर ऑगस्ट 2013 मध्ये झालेल्या स्फोटात अठरा नौसैनिक शहिद झाले होते. बुडालेली ही पाणबुडी नंतर बाहेरही काढण्यात आली होती.

सबस्क्राईब करा

* indicates required