९० टक्के पॅरलाईज माणूस आज लाखोंना देतोय जगण्याची प्रेरणा !!

आज शनिवार स्पेशलमध्ये आम्ही घेऊन आलो आहोत एका अशा माणसाची कथा ज्याने दाखवून दिलंय की तुम्ही जर हार मानली नाहीत, आणि आपले विचार सकारात्मक ठेवून जिद्दीने उभे राहिलात, तर जगातलं कोणतंच संकट तुम्हाला रोखू शकणार नाही.

चला आज एक वेगळा अनुभव घेऊया...

आयुष्य बदलणारा तो दिवस !

‘गिरीश गोगिया’ हे गेल्या १८ वर्षांपासून ९० टक्के पॅरलाईज्ड आयुष्य जगत आहेत. व्यवसायाने ते एकेकाळी ‘इंटिरियर डिझायनर’ होते. ऐन तारुण्याच्या दिवसात गोव्यात एका दुर्घटनेने त्यांचं आयुष्य संपूर्णपणे बदललं. क्लिफ डायव्हिंग (उंच कड्यावरून पाण्यात उडी मारण्याचा खेळ) करत असताना त्याचं डोकं खोल पाण्यातल्या दगडावर आपटलं आणि त्यांची मान मोडली. या घटनेमुळे त्यांच्या शरीराचा ९० टक्के भाग पॅरलाईज झाला.

हा क्षण त्यांना एकतर नैराश्याच्या अंधारात ढकलणारा होता किंवा नव्या उर्जेने भरणाऱ्या प्रकाशाची वाट दाखवणारा होता. माणूस अशावेळी यातलं जे निवडतो ते त्याचं भविष्य बदलतं. गिरीश गोगिया यांनी यातला दुसरा मार्ग निवडला आणि नव्या उर्जेने काम करू लागले. अशा परिस्थितीतही आपल्याला जे मिळालंय त्याचा स्वीकार करून त्यांनी आपला व्यवसाय आणखी दुप्पट वाढवला.

 

नव्या मार्गावर

त्यांचं आयुष्य पुन्हा सुरळीत सुरु असताना त्यांना जाणवलं की आपल्या आयुष्यात जे संकट येऊन गेलं त्या संकटातून आपण तर बाहेर पडलो, पण असे अनेकजण आहेत जे यातून बाहेर पडू शकलेले नाहीत. इथूनच त्यांच्या आयुष्याचं ध्येय सुरु झालं. गिरीश गोगिया यांनी आपला व्यवसाय बंद करून लाखो लोकांना नैराश्य आणि तणावातून बाहेर काढण्याची धुरा हाती घेतली.

गिरीश गोगिया हे आज एक नावाजलेले ‘मोटिवेशनल स्पीकर’ आहेत. आपल्या जीवनात जो बदल झाला तोच बदल इतरांच्या आयुष्यात घडवून आणण्यासाठी ते आज झटत आहेत. सामाजिक संस्था, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, शाळा, ब्लाइंड होम, इत्यादी ठिकाणी ते आपल्या अनुभवातून लोकांना त्यांच्या लक्षापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवतात. त्यांचं स्वतःच जीवनच इतरांसाठी एक मोठी प्रेरणा ठरत आहे.

त्यांच्या बरोबर त्यांच्या पत्नी एषा गोगिया (ज्या स्वतः देखील ९० % पॅरलाईज्ड आहेत) त्या देखील लोकांना प्रेरणा देण्याचं काम करत आहेत. या दांपत्याने लाखो लोकांना त्यांच्या नैराश्यातून बाहेर काढून त्यांची स्वतःमधल्या असीम क्षमतेशी ओळख करून दिली आहे यात शंका.

 

दि पॉझिटीव्ह मॅन

गिरीश गोगिया यांच्या कामामुळे टाईम्स ऑफ इंडियाने त्यांना ‘दि पॉझिटीव्ह मॅन’ म्हटलं आहे. आणि हे विधान त्यांच्या कार्याला अगदी साजेसं आहे. त्याचं पुढील मिशन आणखी जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं आहे. ते या मिशनला ‘Mission Positive Earth’ म्हणतात. अर्थात संपूर्ण जग सकारात्मकतेने भरण्याची मोहीम.

त्यांचं हे कार्य एकही पैसा न घेता चालत असलं तरी ते डोनेशन स्वीकारतात. या डोनेशनमधून त्यांना त्यांच्या कामात येणाऱ्या आर्थिक समस्यांना तोंड देता येतं. तुम्हीही त्यांना या कार्यासाठी डोनेशन देऊ शकता.

सध्याच्या घडीला अनेक तरुण नैराश्याचे शिकार होत असताना गिरीश गोगिया यांच्या सारख्या माणसांची समाजाला जास्त गरज आहे. त्यांच्यामुळेच माणसाच्या आत रसातळाला गेलेल्या आत्मविश्वासाला एक नवी उभारी मिळू शकेल.

सबस्क्राईब करा

* indicates required