computer

तिने ६०० पुरुषांना विष देऊन स्त्रियांना मुक्ती दिली!! काय होतं हे प्रकरण?

चंद्रकांता मालिकेत विषकन्या होत्या. इतरही काही कथा-कादंबऱ्यांमध्ये विषकन्या हा शब्द तुम्ही कदाचित वाचला असेल. विषकन्या म्हणजे जिला लहानपणापासून थोडे थोडे विष पाजले जाते अशी मुलगी. ही विषकन्या मोठी झाल्यावर ज्या पुरुषांसोबत तिचा संबंध यायचा तो मृत्यू पावत असे. अशा या विषकन्येचा वापर मोठमोठे राजे त्यांच्या शत्रूला मारण्यासाठी करत. अर्थात विषकन्या किती खऱ्या किंवा फक्त काल्पनिक याविषयी पुरावे नाहीत. पण आज आपण इतिहासातल्या अश्या एका महिलेविषयी वाचणार आहोत जिला विषकन्या म्हणले तर चुकीचे ठरणार नाही. आपल्या विषाने तिने ६०० पुरुषांना मारले आहे.

१७ व्या शतकातली इटलीत राहणारी ज्युलिया तुफान ही ती विष बनवणारी महिला. 'ऍक्वा तुफान' हे विष तिने बनवले होते. १६३० ते १६५५ दरम्यान तिच्या विषाने  ६०० पुरुष मारले गेले आणि विशेष म्हणजे हे विष स्त्रियांनी स्वतः तिच्याकडून विकत घेतले होते. याचे कारण काय? ते पाहूयात.

तो काळ असा होता की स्त्रियांना अजिबात कुठले स्वातंत्र्य नव्हते. घरगुती हिंसाचार हे नेहमीचेच असत. स्त्रियांना अक्षरशः गुलाम म्हणून वापरले जायचे. नवऱ्याने मारहाण केली, पैसे दिले नाहीत किंवा कशीही वागणूक दिली तरी बायको त्याच्याविरुध्द तक्रार करू शकत नव्हती. कारण, हा गुन्हाच मानला जात नव्हता. महिलांना घटस्फोट घेण्याचा पर्याय नव्हता. त्यामुळे पतीपासून मुक्त होण्याचा एकच मार्ग होता - पतीचा मृत्यू. ज्युलियाच्या विषाने ते काम बिनबोभाट केले.

ज्युलियाने सेंट निकोलसचे चित्र असलेल्या लहान बाटल्यांमध्ये ऍक्वा तुफान भरण्यास सुरुवात केली. 'ऍक्वा तुफान' नावाच्या या विषाचे चार थेंब कोणालाही कायमचे झोपवण्यासाठी पुरेसे होते. जे लोक मेले त्यांना बहुधा सर्दी, उलट्या, अशक्तपणा आणि ओटीपोटात दुखणे एवढेच व्हायचे. या विषाला चव, रंग किंवा गंध नव्हता. म्हणून ते वाइन किंवा इतर कोणत्याही पेयामध्ये मिसळून सहज दिले जायचे. ज्युलिया हे विष मेकअप किंवा परफ्युमच्या कुपीमध्ये पॅक करत असे. स्त्रिया ते विकत घायच्या आणि नवऱ्याला द्यायच्या.

त्या काळात एखाद्याचा अचानक मृत्यू होणे ही फार सामान्य गोष्ट होती. शवविच्छेदन फारसे व्हायचे नाही. त्यामुळे मृत्यूचे कारण कधी कळायचे नाही. जवळजवळ २५ वर्षे ज्युलिया विष बनवून मृत्यू विकत होती.

असे म्हणतात की, विष बनविणे आणि विक्री करणे हा ज्युलियाचा कौटुंबिक व्यवसाय होता. ज्युलियाची आई टोफानिया हिने आपल्या नवऱ्याला विष देऊन ठार मारले होते. ज्युलियाच्या आईला नंतर सिसिली येथे फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. जूलियाची मुलगीही या विषारी धंद्यात सहभागी होती.

ज्युलियाचे हे प्रकरण अखेरीस एका विष नेणाऱ्या बाईनेच उघड केले. तिने सुपमध्ये विष मिसळले पण तिला त्याचे वाईट वाटले आणि तिने नवऱ्याला थांबवले. नवऱ्याने तिला कारण विचारल्यावर तिने ज्युलिया आणि तिच्या विषाबद्दल सांगितले. शेवटी या प्रकरणाची वाच्यता सगळीकडे झाली. तिला अटक करण्यासाठी अधिकारी तिच्याकडे पोहोचले.

जुलै १६५९ मध्ये ज्युलिया, तिची मुलगी आणि तिला मदत करणाऱ्या तीन महिलांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. ज्युलियाने ज्या ग्राहकांचे नाव सांगितले अशा ग्राहकांनाही शिक्षा झाली. काहींना नदीत टाकण्यात आले तर काहींना तुरुंगात टाकण्यात आले.

ऍक्वा तुफानाचा वापर करून विष बनवून ज्युलियाने काहीजणींना त्रासातून मुक्ती दिली, पण शेवटी हा गुन्हाच होता. ही विष देणारी स्त्री अनेक वर्षे लोकांना लक्षात राहिली.

या घटनेवरून त्याकाळात स्त्रियांना मिळणारी वागणूक, त्यांचा कमी दर्जा आणि जवळजवळ वैयक्तिक हक्कच नसणे ह्या बाबी अधोरेखित होतात. शेवटी प्रत्येक गुन्ह्याच्या मागे एक ठोस कारण असतेच. ज्युलियाच्या निमित्ताने या गोष्टींना उजाळा मिळाला असे म्हणण्यास हरकत नाही.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required