१९५ वर्षांपूर्वी बाजारात आली जगातील पहिली काडेपेटी !!

टिकली, बालक, शिप...ही नावं कसली आहे आठवताहेत का ? अहो, ही तर आपण पूर्वी वापरत असलेल्या काडेपेट्यांची नावं. बाजारात लायटर येण्यापूर्वी स्टोव्ह, गॅस पेटवायला सारेच लोक काडेपेटीच वापरायचे. आता निरनिराळे स्टायलिश लायटर सहजपणे मिळतात; तरीही सिगारेट, बिड्या फुंकणाऱ्या अट्टल 'फुकरे' मंडळींच्या खिशात माचिस म्हणजे काडेपेटी  हटकून सापडतेच. ही इवलीशी काडेपेटी आली कुठून माहितीय का ?  अग्नी पेटवण्यासाठी चकमक वापरण्याच्या किचकट मार्गातून सुटका करायला जॉन वॉकर या ब्रिटिश शास्त्रज्ञानं काड्यापेटीचा शोध लावला. माचिस बाजारात आली त्याला आज तब्बल 191 वर्षं झाली.

स्रोत

गाय छाप अन माचिस बाळगणाऱ्याची सहप्रवाशांशी पटकन गट्टी जमते असं गमतीने म्हटलं जातं. त्यातला विनोदाचा भाग सोडला तर माचिस कशी अडीनडीला उपयोगी पडते, हे लक्षात येतं. पूर्वी चूल, स्टोव्ह पेटवण्यासाठी चकमकीची दगडं म्हणजे गारगोट्या वापरायचे. त्यातून मार्ग काढण्यासाठी काडेपेटीसारखी वस्तू बनवायचा प्रयत्न अनेकांनी केला. अखेर, फॉस्फरस, गोंद आणि जिलेटीनचा गुल असलेली काडी,  पेटीला लावलेल्या मेणाच्या पृष्ठभागावर घासुन ज्वाला निर्माण करणारी काडेपेटी जॉन वॉकरने तयार केली, अन ७ एप्रिल 1827 ला पहिली काडेपेटी जगाच्या बाजारात आली. दैनंदिन जीवनात गरजेची ठरलेल्या काडीपेटीचा जगभर वेगानं प्रसार  झाला. आजही बहुतेकांच्या किचन ओट्यावर ती हाताशीच ठेवलेली असते.

आपल्याकडं शिवकाशीला जसं फटाक्यांचं मोठं मार्केट आहे, तसंच तिथं काडेपेटी उत्पादनाचाही मोठा उद्योग आहे. केरळातल्या कोचिमध्येही हे कारखाने आहेत.  हजारो लोकांचं पोट या उद्योगावर अवलंबून आहे. अलीकडच्या काही वर्षांत गॅस लायटर्सचं प्रस्थ बरंच वाढलं. धुम्रपानविरोधी मोहीम जगभर सुरू झालीय. त्याचा परिणाम काडेपेटी उद्योगांवर झालाय. वार्षिक तब्बल दीड हजार कोटींची उलाढाल असलेल्या या उद्योगात दहा वर्षांत पंचवीस टक्क्यांनी घट झालीय. माचीस बनवणारे  8 हजार कारखाने बंद पडलेत. पूर्वी आपण पाकिस्तान आणि आफ्रिकेतही माचिस निर्यात करायचो. आता पाकिस्तानमध्ये हा उद्योग सुरू झालाय. त्यांच्या स्वस्त दरामुळं आफ्रिकन देश त्यांच्याकडून काडेपेट्या आयात करतात. आपल्याकडं 'विमको' ही काडेपेटी उत्पादन करणारी प्रमुख कंपनी.त्यांचे 'एम', 'आय नो ', 'होम लाईट' ,'शिप' हे माचीस ब्रँड सर्वांनीच कधी ना कधी हाताळलेत यात शंकाच नाही.

स्रोत

८०-९० च्या दशकात अनेक मुलं रिकाम्या काडेपेट्यांपासून आगगाडी, घर, पिस्तुल अशा वस्तू बनवायची. काडेपेटीच्या वैविध्यपूर्ण कव्हर्सचा संग्रह करायचे. मुलुंडच्या सज्जनवाडीत राहणाऱ्या नंदकुमार देशपांडे यांनी गेल्या ४० वर्षांपासून हा छंद जोपासलाय. त्यांनी निरनिराळ्या प्रकारच्या  तब्बल सहा हजार काडेपेट्या जमवल्यात. त्यात आपल्याकडच्या सर्वात जुन्या 'अनिल' ब्रॅण्डसोबतच अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सचिन तेंडुलकर, अझरुद्दीन, श्रीदेवी यांची चित्र असलेल्या वैशिष्ठयपूर्ण माचिस आहेत. स्वीडन, इंडोनेशिया, पाकिस्तान, चीन, जपान, अमेरिका, कॅनडा,  ऑस्ट्रिया या देशातल्या त्रिकोणी,चौकोनी, आयताकृती अन लिपस्टिक, बॅटरी सेलच्या आकाराच्याही काडेपेट्या त्यांच्या संग्रहात आहेत. त्यातल्या रिकाम्या काड्यांतून आयफेल टॉवरची प्रतिकृती उभारून एका प्रदर्शनात त्यांनी लक्ष वेधून घेतलं होतं....

 

लेखक : आबिद शेख, पुणे
(मो.8806706466)

सबस्क्राईब करा

* indicates required