computer

सर्वसामान्यांना ग्राफिक्स डिझाइनच्या दुनियेत नेणाऱ्या कॅनव्हाचा प्रवास वाचायलाच हवा

आजच्या इंटरनेट युगात डिजिटल मार्केटिंग हा शब्द खूपच परवलीचा बनला आहे. डिजिटल मार्केटिंगसाठी लागणारे सर्वात मोठे स्कील म्हणजे कंटेंट आणि डिझायनिंग! त्यातही डिझायनिंगसाठी खूपच आटापिटा करावा लागतो. डिझायनरने केलेली डिझाईन त्यांच्या ग्राहकाला पसंत पडेलच असे नाही. त्यात पन्नास जण पन्नास सुधारणा सुचवणार. पण एक इमेज डिझाईन करायला काय आटापिटा करावा लागतो हे कुणाला माहीत आहे. ज्यांनी ज्यांनी वर्तमानपत्राच्या सेटअपमध्ये काम केलं आहे किंवा करत आहेत, जाहिरात क्षेत्रात काम करत आहेत किंवा आजच्या डिजिटल युगात डिजिटल मार्केटिंगमध्ये डिझायनर म्हणून काम करत आहेत त्या सर्वांनाच वेगवेगळे तुकडे जोडून एक अर्थपूर्ण आणि आकर्षक इमेज करणे म्हणजे किती मोठे दिव्य असते याची कल्पना असेल.

डिझायनर लोकांचा हा त्रास आणि त्यांच्या भावना खऱ्या अर्थाने समजून घेतल्या त्या ऑस्ट्रेलियाच्या मेलनी पर्किन्सने. कोण ही मेलनी पर्किन्स आणि तिने डिझायनर लोकांसाठी नेमके काय केले जाणून घेऊया या लेखातून.

मेलनी ही पर्थमधील विद्यापीठात कॉमर्स अँड कम्युनिकेशनमधून ग्रॅज्युएशन करणारी एक विद्यार्थिनी. स्वतः शिकत असतानाच ती मुलांना अडोब फोटोशॉप आणि इन-डिझाईनमधून फोटो एडीट करण्याचे धडे देत होती. हे धडे देत असताना तिला एक गोष्ट जाणवली की इंटरनेट युगात सगळ्या गोष्टी एका क्लिकवर उपलब्ध असताना इमेज एडीट करण्यासाठी मात्र इतके क्लिक करावे लागतात की विचारू नका. मग मुलांना या प्रचंड मोठ्या प्रक्रियेचा कंटाळा यायचा. यावर काही तरी असा ऑप्शन शोधला पाहिजे की इमेज एडिटिंग करण्याची प्रक्रिया साधी, सोपी आणि इंटरेस्टिंग झाली पाहिजे. तिच्या याच कल्पनेतून कॅनवा (Canva) या डिझायनिंग अॅपचा जन्म झाला.

कॅनवा माहिती नाही असा माणूस सापडणे विरळाच! अगदी प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आज कॅनवा अप डाऊनलोड केलेले मिळेलच. कॅनवाचा आजचा प्रसार पाहून आपल्याला कळते की हे ॲप आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले असून अगदी आमंत्रण पत्रिकेपासून ते फेसबुक, इन्स्टा आणि ट्विटर पोस्टसाठी लागणाऱ्या इमेजेस, फ्लायर्स, पॅंपलेट्स, अशा कोणत्याही कामासाठी लागणारी डिझाईन्स कॅनवावर बनवता येतात. विशेष म्हणजे यासाठी काही वेगळे प्रशिक्षणही घ्यावे लागत नाही. ज्या कोणाला डिझायनिंग मध्ये आवड आहे अशी व्यक्ति हे ॲप अगदी सहजतेने वापरू शकते, इतक्या सुटसुटीतपणे या ॲपची रचना करण्यात आली आहे.

पण याची सुरुवात तिने कशी केली? मेलनीने आपली ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कॅनवाचे सह-संस्थापक क्लिफ ऑब्रेच यांच्याकातून काही रक्कम कर्जाऊ घेतली आणि त्यानंतर तिचे पहिले फ्युजन बुक बनवण्यासाठी तिने एक टीम तयार केली. तिचे हे पहिले-वाहिले फ्युजन बुक चांगलेच प्रसिद्ध झाले. अगदी ऑस्ट्रेलियाच्या एका मोठ्या पब्लिशरने या पुस्तकाचे प्रकाशन केले. आता मेलनीला पुढचा टप्पा गाठायचा होता. तिला तिच्या व्यवसायात कुणीतरी मोठा सह-संस्थापक हवा होता जो तिच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जे तंत्रज्ञान लागणार आहे त्यासाठी फंडिंग करेल. याच शोधात असताना तिची भेट कॅमेरून अडम्सशी झाली. अडम्सने याआधी गुगलमध्ये काम केले होते. त्याला मेलीन आणि ऑब्रेचच्या या प्रोजेक्टमध्ये इंटरेस्ट निर्माण झाला आणि मग तिघांनी एकत्र येऊन कॅनवासाठी काम सुरु केले. आपला हा प्रोजेक्ट डिझायनिंगच्या विश्वात क्रांती आणेल याची तिघांनाही पक्की खात्री होती.

कॅनवाची जर मोठ्या प्रमाणात वाढ करायची असेल तर मोजक्याच फंडिंगवर अवलंबून राहून चालणार नाही हे ओळखून मेलीनने सिलिकॉन व्हॅलीला भेट देऊन आणखी गुंतवणूकदार शोधण्यास सुरुवात केली. तिची कल्पना आवडल्याने गुंतवणूकदार बिल ताई यांनी तिच्या या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करण्याची तयारी दाखवली आणि अशाप्रकारे कॅनवाला ७ कोटी डॉलर्सचे फंडिंग मिळाले. ७ कोटी डॉलरच्या फंडिंगवर उभारलेल्या या कंपनीची आजची किंमत अडीच अब्ज डॉलर आहे. नंतर तर कॅनवाने पिक्सेल आणि पिक्साबे या सर्वात मोठ्या फोटोग्राफी पोर्टलसोबतसुद्धा संधान बांधून त्यांचे फोटो कॅनवा युजर्ससाठी उपलब्ध करून दिले.

डिझायनिंग करणे ही एक मोठी किचकट प्रक्रिया आहे. ज्या लोकांना डिझायनिंगचा गंधही नाही असे लोक कॅनवाचा वापर करून उत्तम डिझाईन करू शकतात. मेलीनचा या उद्देश या ॲपमधून सफल झाला होता. तरीही कुणाला कुठे काही अडचण येते का याचा फीडबॅक घेत घेत ग्राहकांच्या सूचनेनुसार मेलीनने यात अनेक सुधारणा केल्या. कारण शेवटी ग्राहक हाच राजा आहे हे सूत्र तिने पक्के ध्यानात ठेवले.

कॅनवाने दिलेले टूल वापरून अगदी हवी तशी आणि प्रोफेशनल डिझाईन करता येते. असे असले तरी काही लोकांना स्वतःवरच विश्वास नसतो की, त्यांना हे जमेल किंवा डिझायनिंग खरेच इतके सोपे असेल. अशा नवशिक्या लोकांनाही हे ॲप वापरताना काही अडचणी येऊ नयेत याची मेलीन आणि टीमने चांगलीच खबरदारी घेतलेली आहे.

आज कॅनवा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहे, याचे कारण एकच आहे, लोकांना नेमकं काय हवं आहे, बाजारपेठेची खरी गरज काय आहे हे ओळखणं आणि त्याची पूर्तता करणं. बाजारपेठेचा हाच नियम अनुसरल्याने दिवसेंदिवस कॅनवाच्या प्रगतीचा आलेख वरच्या दिशेने जात आहे. २००७ ते २०२१ फक्त चौदा पंधरा वर्षांच्या प्रवासात या कंपनीने अब्जावधी डॉलर्सचा टप्पा पार केला आहे.

तरीही कॅनवाला ॲडोब डिझाईन आणि मायक्रोसॉफ्ट डिझाईन या मोठ्या कंपन्यांच्या ग्राहक वर्गाला टार्गेट करायचे आहे. कॅनवाला अजून एका मोठ्या उंचीवर घेऊन जाने हे मेलनी आणि टीमचे उद्दिष्ट आहे. अशा करूया की, येत्या काळात त्यांचे हे उद्दिष्ट पूर्ण होईल आणि आम्हाला अजून उत्तमोत्तम इमेज एडीट करण्याची कला आत्मसात करता येईल तेही अगदी विना कटकट!

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required