computer

'हायकोर्टाचे किस्से'-भाग ३-‘क्वार्टर मास्टर’ न्यायाधीश!

मी बातमीदारीसाठी हायकोर्टात जायला लागलो आणि पहिल्या काही वर्षांतलाच हा अनुभव. हे न्यायाधीश महाशय केंद्र सरकारमध्ये अनेक पदांवर राहून केंद्रीय कायदा खात्याचे सचिव असताना त्यांना १९८३ मध्ये हायकोर्टात न्यायाधीश म्हणून नेमले गेले. उणीपुरी पाच वर्षे म्हणजे १९८८पर्यंत ते न्यायाधीश होते. माणूस अत्यंत बुद्धिमान. प्रत्यक्ष भेटीची संधी कधी मिळाली नाही. पण आज ४० वर्षांनंतरही त्यांची छबी मनात लख्ख आहे. त्याचे कारण म्हणजे त्यांच्या रूपाने मला हायकोर्टातील एकमेव ‘क्वार्टर मास्टर’ न्यायाधीशाची माहिती मिळाली!  लष्करात ‘क्वार्टर मास्टर’ हा ‘नॉन कमिशन्ड ऑफिसर’चा एक हुद्दा आहे. पण हायकोर्टातील या ‘क्वार्टरमास्टर’च्या अजुब्याचे गारूड माझ्या मनावरून अद्याप उतरलेले नाही. आज हे न्यायाधीश हयात नाहीत. मृतात्म्याची निंदा करणे सुसंस्कृतपणाला धरून नाही. म्हणून मी त्यांचा नामोल्लेख करणार नाही. पण हायकोर्टातील हे एकमेवाव्दितीय ‘कॅरेक्टर’ तुम्हाला समजावे एवढ्यासाठीच मी हा किस्सा सांगणार आहे.

त्या काळात हायकोर्टात न्यायाधीश कमी होते. सर्व कोर्ट तळमजजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर भरायची. न्यायाधीशांच्या चेंबर दुसर्‍या मजल्यावर आणि न्यायालयाची विविध कार्यालये तिसर्‍या मजल्यावर अशी व्यवस्था होती. अपवाद फक्त या न्यायाधीशांचा होता. त्यांचे एकट्याचेच चेंबर तिसर्‍या मजल्याच्याही वर पोटमाळ्यावर होते. त्यांना असे एकाकी चेंबर देण्याचे कारणही खास होते.

त्या काळात कोर्टाची जजमेंट आजच्या सारखी लगेच वेबसाईटवर मिळत नसत. साहेबांची सही झाल्यावर, चेंबरमध्ये जाऊन, स्टेनोच्या दाढीला हात लावून, ती वाचावी लागत. एक दिवस या न्यायाधीशांनी एक महत्वाचे जजमेंट दिले म्हणून कोर्ट संपल्यावर त्यांची चेंबर शोधत तेथे गेलो. साहेब घरी गेले होते. ‘पीए’ला ओळख सांगितली व काय काम आहे तेही सांगितले. त्यांनी बसायला सांगितले व मला हवे असलेले जजमेंट साहेबांच्या टेबलावर आहे का ते पाहायला ‘पीए’ आत गेले. मी त्यांच्या टेबलापाशी बसण्यासाठी खुर्ची ओढली. त्यांच्या टेबलावर जमिनीला टेकेल एवढा लांब टेबलक्लॉथ टाकलेला होता. खुर्ची टेबलासमोर घेऊन बसल्यावर सवईप्रमाणे पाय थोडे पुढे गेले. पायाच्या धक्क्याने टेबलक्लॉथच्या पलिकडे ठेवलेली काही तरी काचेची वस्तू घरंगळून खाली पडल्याचा आवाज झाला. मी चटकन खुर्ची मागे ओढली. तेवढ्यात ‘पीए’ आतून बाहेर आले.

`माझा पाय लागून काचेचं काही तरी फुटलं का?’, मी विचारले.

‘नाही, काही नाही!’ , ओशाळलेल्या ‘पीए’ची सारवासरव.

उत्सुकता ताणली गेली. खुर्चीतून उठलो व टेबलाच्या पलिकडे जाऊन टेबलक्लॉथ वर करून पाहिले. दारुच्या रिकाम्या क्वार्टरच्या बाटल्यांची रचलेली चळत माझ्या पायाच्या धक्क्याने कोसळली होती!

‘कोर्टात दारु पिता?-अचंबित होऊन माझा प्रश्न.

‘छै...’ कान पकडून व जीभ चावत ‘पीए’चे उत्तर.

जजमेंट वाचले आणि चेंबरमधून बाहेर पडलो. पण तरी मनातील कोडे काही सुटले नव्हते. पुढील काही दिवस ‘पीए’ला विश्वासात घेऊन माहिती काढली. टेबलाखाली, टेबलक्लॉथच्या आड रचून ठेवलेली चळत साहेबांच्या बाटल्यांची होती!

‘पीए’ने दिलेली माहिती थोडक्यात अशी होती:

बाकी सर्व न्यायाधीशांची घर ते कोर्ट अशी ये-जा चर्चगेट, चौपाटी, मलबार हिल अशी व्हायची. पण या न्यायाधीशांची येण्या-जाण्याची वाट क्रॉफर्ड मार्केटवरून होती. साहेबाची गाडी कोर्टात येताना क्रॉफर्ड मार्केटजवळ ‘शाह वाईन्स‘समोर थांबायची. ड्रायव्हर खाली उतरून दोन क्वार्टर घेऊन यायचा. सव्वा दहाला कोर्टात आले की, पावणे अकरापर्यंत चेंबरमध्ये बसून एक क्वार्टर साहेब रिचवायचे. ११ ते २ कोर्टात. पुन्हा दोन ते पावणे तीन या मधल्या सुट्टीत दुसरी क्वार्टर! पावणे तीन ते पावणे पाच कोर्ट. परत जाताना पुन्हा शाह वाईन्सकडून एक क्वार्टर घेऊन साहेब घरी जायचे.

‘मग एकदम खंबाच का आणत नाही’, माझा प्रश्न.

‘प्यायला क्वार्टर सुटसुटीत पडते!’, ‘पीए’चा खुलासा.

यानंतर. दोन क्वार्टर पोटात रिचवून न्यायासनावर बसलेल्या न्यायाधीशाचे कोर्ट कसे चालते, याचे निरीक्षण करण्याचा शिरस्ता मी अनेक दिवस ठेवला. साहेबांचे कोर्ट व्यवस्थित, नव्हे, इतर कोर्टांहून अधिक शिस्तीत चालायचे. फरक एवढाच की, साहेब तोंडातून एकही शब्द काढायचे नाहीत. घारे, तेजस्वी डोळे गरागरा फिरवत आणि मान हलवत समोरच्या वकिलाच्या युक्तिवादाला प्रतिसाद द्यायचे!

एखादे गुपित कळल्याच्या आनंदात नंतर मी हा विषय हायकोर्टात अनेक वकील व न्यायाधीशांकडे काढला. त्या सर्वांना हे आधीपासूनच माहित होते. आणि मुख्य म्हणजे कोणीही याचा इन्कार केला नाही. न्यायाधीश म्हणून साहेबांच्या असामान्य गुणवत्तेबद्दल सर्वांच्या मनात नितांत आदरच मला दिसून आला. त्यानंतर आजवर कधीही दारु पिणारा माणूस वाईट, हा विचार माझ्या मनाला शिवला नाही आणि कामाच्या ठिकाणी दारू पिण्यास बंदी करणे खरंच योग्य आहे का, याचे कोडेही अद्याप सुटलेले नाही. हल्ली हायकोर्टात तिसर्‍या मजल्यावर डझनभर न्यायाधीशांची चेंबर आहेत. पण त्याचे कारण जागा अपुरी पडते हे आहे.

या साहेबांचे चेंबर तिसर्‍या मजल्यावर अगदी अडगळीत ठेवण्याचे कारणही न सांगता स्पष्ट झाले. इतके समजूतदार ‘अ‍ॅडिमिनिस्ट्रेशन’   सर्वांच्याच नशिबी कधी येईल, याची मी वाट पाहतोय!

-लेखक:अजित गोविंद गोगटे
व्यवसाय: निवृत्त पत्रकार (लोकसत्ता,मुंबई-२९ वर्षे आणि लोकमत, मुंबई १० वर्षे)
विशेष प्राविण्य: कायदा आणि न्यायालये यासंबंधीची पत्रकारिता. 

सबस्क्राईब करा

* indicates required