computer

अतिशय कडेकोट सुरक्षेसाठी प्रसिद्ध तुरुंगातून तीन कैद्यांनी केलेल्या एकमेव यशस्वी पलायनाची ऐतिहासिक गोष्ट!!

अलकटराझ, कॅलिफोर्निया जवळील एक बेट. एकेकाळचा किल्ला, लष्करी तुरुंग, सुधारणागृह. आजूबाजूला उच्च पाण्याचा प्रवाह असणारं हे बेट किनाऱ्यापासून जवळपास दोन किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. १९३४ ते १९६३ ह्या काळातला अमेरिकेतला सर्वात कडेकोट सुरक्षितता असलेला तुरुंग म्हणजे अलकटराझ ओळखला जायचा. अमेरिकेतील कुप्रसिद्ध गँगस्टर अल कपोनसुद्धा याच तुरुंगात शिक्षा भोगत होता.

सर्वात जास्त कुप्रसिध्द, खतरनाक आरोपी ह्या तुरुंगात होते. हा तुरुंग खतरनाक म्हणून ओळखला जायचा. कारण १९६३नंतर हा तुरुंग बंद पडला आणि सध्या तो ओसाड पडला आहे. तर, या अवघड तुरुंगातून एकूण ३६ कैद्यांनी १४ वेळा पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण फक्त ३ कैदी या पलायनात यशस्वी ठरले. ते म्हणजे मॉरिस, जॉन आणि क्लीअरन्स. काय होती यांची कहाणी? हा तुरुंग पळून जाण्यासाठी अभेद्य का होता? वाचा तर मग अल्कटराझ या तुरुंगाची आणि तिथे यशस्वी झालेल्या एकमेव पलायनाची गोष्ट!!

पहिल्यांदा जाणून घेऊयात पळून गेलेल्या तीन कैद्यांबद्दल.

फ्रांक मॉरिस त्या कैद्यांतला एक. वयाच्या अकराव्या वर्षापासून त्याला दत्तक घरात राहावे लागले. कदाचित भावनिक दृष्ट्या स्थिरता न मिळाल्यामुळे लहान वयापासून चोरी करणे, लोकांना लुबाडणे अशी कामे तो करू लागला. असं म्हटलं जात की मॉरिसचा IQ १३३ होता. प्रगल्भ आणि असामान्य लोकांचे IQ साधारण १४० च्या आसपास असतात.

इतर दोघे म्हणजे जॉन आणि क्लीअरन्स अँन्ग्लीन हे दोघे एकमेकांचे भाऊ. त्यांचे आई-वडील शेतमजुर होते. त्यांना एकून १३ मुले होती. त्यांपैकी हे दोघे. १४ वर्षांचे असल्यापासून दोघांनी चोरी करणे, लोकांना लुटणे अशी कामे करायला सुरुवात केली होती. एकदा तर त्यांनी खोट्या बंदुकीचा धाक दाखवून बँक लुटली होती. ते दोघे उत्तम पोहायचे.

(फ्रांक मॉरिस)

तसा या तिघांत ॲलन वेस्ट नावाचा आणखी एक कैदीही होता. तो गाड्या चोरी करायचा. त्याने फ्लोरिडामधल्या तुरुंगातून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. ह्या चौघांनीही प्रत्येक तुरुंगातून पळून जाण्याचे नेहमी प्रयत्न केले होते. म्हणून त्यांना सर्वात जास्त सिक्युरिटी असलेल्या तुरुंगात ठेवण्यात आले. ते तुरुंग म्हणजे अलकटराझ.

खरं तर अलकटराझ तुरुंग तिथल्या कठोर शिस्तीसाठी ओळखला जायचा. कोणता कैदी कोणत्या वेळी नेमकं काय करतोय अशी सर्व माहिती तेथील वार्डनला माहित असायची. दिवसातून १३ वेळा कैद्यांची हजेरी घेतली जायची. प्रत्येक कैद्याचे स्वतंत्र ब्लॉक होते. हे ब्लॉक्स अगदी छोटे आणि एकमेकांना लागून असल्यामुळे कोण काय करतंय ह्यावर लक्ष ठेवायला सोपं जायचं. प्रत्येक ब्लॉकचे दरवाजे ठराविक वेळीच उघडले जायचे. कोणत्या कैद्याने काही चूक केली तर शिक्षा देखील कठोर मिळायची. त्यामुळे तुरुंग फोडणं जवळजवळ अशक्य होतं. मग ह्या तिघांनी अशी काय जादू केली की त्यांना पळून जाण्यात यश मिळालं?

पलायनाची गोष्ट:

(अलकटराझ तुरुंग)

तुरुंगातून पळून जाण्याचा प्लान डिसेंबर १९६१ मध्ये चौघांनी मिळून बनवला. या योजनेचा मेंदू होता मॉरिस. साफसफाई करताना सापडलेली ब्लेडची पाती, जेवणाच्या टेबलवरून चमचे हे चौघे जमा करत गेले. प्रत्येक कैद्यासाठी स्वतंत्र ब्लॉक होता. प्रत्येक ब्लॉकला व्हेंटिलेशन म्हणजेच वायुवीजनासाठी एक पाईप होता. योजनेचा एक भाग म्हणून व्हॅक्युम क्लीनरच्या मोटरपासून मॉरिसने इलेक्ट्रिक ड्रिल मशीन बनवले. हे ड्रिल मशीन, जमवलेले चमचे आणि पात्यांचा उपयोग करून त्यांनी तो व्हेंटिलेशन पाईपच्या भोवतालचा भाग खोदायला चालू केले.

जवळपास आठ महिने हे काम चालू होते. साधारणत: रात्रीच्या वेळी हे काम व्हायचे. अलकट्राझ तुरुंगात कैद्यांना संगीत आणि संगीत वाद्ये शिकण्याची मुभा होती. ज्यावेळी हे खोदकाम चालू असायचे तेव्हा मॉरिस वाद्यं वाजवायचा जेणेकरून खोदकामाचा आवाज बाहेर जाणार नाही. तुरुंगात कैद्यांना मासिके वाचण्यास दिली जायची. त्यातली जाहिरातीची पाने एका पुठ्ठ्यावर या चौघांनी चिकटवली. हा पुठ्ठा त्यांनी हुबेहूब भिंतीसारखा रंगवला. खोदकाम पूर्ण झाल्यावर त्याजागी हा रंगवलेला पुठ्ठा ठेवला जायचा. त्यामुळे तिथं काही घडलं असावं असा कुणाला संशयही येत नसे.

या चौघांनी तुरुंगातून बाहेर पडल्यावर पळून जाण्यासाठी जवळजवळ ५० रेनकोट, लाईफ जॅकेट्स वापरून एक छोटी बोट बनवली. ही बोट बनवणे देखील काही सोपे काम नव्हते. आधी रेनकोटला सुईने शिवायचे, त्यानंतर वाफेचा वापर करून ती शिवण पक्की सील करून घ्यायची, आणि हे सगळे लपूनछपून करायचे!! अर्थातच हे सर्व सामान त्यांनी चोरले होते. पण हे सगळे काम ते करायचे कुठे? तर त्यांच्या रूम्सच्यामागे रिकामी अरुंद जागा होती. त्यांनी आपली छोटी कार्यशाळा तिथे चालू केली होती. सहसा कोणी गार्ड किंवा कोणीही तिकडे जायचे नाही. तरीही चौघांपैकी एक येणाऱ्याजाणाऱ्यावर पाळत ठेऊन असायचा.

आणि शेवटी तो दिवस उगवला. ११ जून १९६२ ला त्यांनी तिथून पळ काढण्याचा निश्चय केला. आपापल्या ब्लॉकमधून खोदलेल्या मार्गे निघून रूम्सच्यामागे असणाऱ्या पाईपवर चढून गच्चीवरच्या व्हेंटिलेशन शाफ्ट मधून ते बाहेर पडले. व्हेंटिलेशन शाफ्ट तोडताना आवाज झाला होता. तो तेथे पहाऱ्यावर असणाऱ्या गार्डने ऐकलाही होता. पण असेल काहीतरी म्हणून त्याने दुर्लक्ष केले होते. एकदा इमारतीमधून बाहेर पडल्यावर तिथून १२ फुट उंच कुंपणावरून चढून ते तिघे बाहेर पडले. सोबत बनवलेली बोट, लाईफ जॅकेट्स हे सर्व सामान घेऊन ते निघाले होते. ॲलन वेस्टला मात्र तेव्हा आपल्या ब्लॉकमधून निघता आले नाही. उशीरा निघून तो ठरलेल्या ठिकाणी पोहोचेपर्यंत बाकी तिघे निघून गेले होते.

तर आता तुम्ही म्हणाल की तीन तीन कैदी आपल्या ब्लॉकमध्ये नाहीयेत हे कळले कसे नसणार?? तर त्यांनी ह्याची देखील काळजी घेतली होती. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मदतीने त्यांनी मानवी डोकी बनवली. त्यावर नकली केस चिकटवणे अशी सर्व कामे अँग्लीन भावांनी केली होती. आपल्या नेहमीच्या झोपायच्या जागी ही नकली डोकी ठेऊन ते तिघे पसार झाले होते. दुसऱ्या दिवशी जेव्हा हा प्रकार उघडकीस आला तेव्हा बरीच मोठी शोध मोहीम सुरु झाली. किनाऱ्यावर रेनकोटचे दोन तीन तुकडे फक्त सापडले. त्यांचा ठावठिकाणा सापडला नाही. हे तिघे तिथून यशस्वीरित्या गायब झाले होते.

पुढे जवळपास १७ वर्षं या तिघांचा शोध चालू होता. अँग्लीन भावांच्या एका नातेवाईकांनी असा दावा केला होता की १९६२ नंतर त्यांच्या आईला प्रत्येक मदर्स डे दिवशी फुले मिळायची. नक्की कोण ही फुले पाठवायचं ते काही सांगता येणार नाही, पण नक्कीच जॉन आणि क्लीअरन्स असावेत असा सर्वांना संशय होता. ज्यादिवशी त्या दोघांची आई वारली होती तेव्हा दफनविधीवेळी दोन अज्ञात बायका दिसल्या होत्या. स्त्रीवेष धारण करून ते दोघे आले असावेत असं म्हटलं जातं.

जॉन आणि क्लीअरन्स ब्राझीलमध्ये होते असा दावा त्यांच्या मित्रांनी केला होता. पुढे काही वर्षांनी FBI ला एक पत्र मिळाले. ते पत्र जॉन आणि क्लीअरन्स पैकी एकाने पाठवले होते. त्यादिवशी पळून जाण्यात आम्ही यशस्वी झालो अशी कबुली त्या पत्रात होती. फ्रँक मॉरिस आणि माझा भाऊ आता ह्या जगात नाहीत, आपण ८३ वर्षांचे असून कॅन्सरग्रस्त आहोत, उपचारासाठी पैसे नसल्याने एक वर्ष कैदेत राहून मला कैद्यांसाठी असणाऱ्या रुग्णालयात उपचार मिळावेत अशी विनंतीही त्या पत्रातून केली होती. पण FBI ने ह्या गोष्टीकडे लक्ष दिले नाही.

शेवटपर्यंत त्यांना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले नाही. ते नक्की त्या दिवशी पळून जाण्यात यशस्वी ठरले का? उच्च दबावाच्या पाण्याचा प्रवाह, गोठून टाकणारे प्रचंड थंड पाणी, शार्क माशांचा वावर या सर्व प्रतिकूल परिस्थितीत ते तिघे खरंच किनाऱ्यावर पोहोचण्यात यशस्वी ठरले असतील का? आणि ते इतकी वर्षं कुठे होते? काय करत होते? असे प्रश्न आजही कोड्यात टाकणारे आहेत.

 

लेखिका : स्नेहल बंडगर

सबस्क्राईब करा

* indicates required