computer

२०१९ उजाडलं तरी भारतातल्या या गावात दहावीची परिक्षा आजवर कुणी का दिली नव्हती??

आज आम्ही कमला नावाच्या मुलीची गोष्ट सांगणार आहोत. ही मुलगी राजस्थानच्या ‘भीलों की धनि’ गावातली दहावीची परीक्षा देणारी पहिली मुलगी ठरली आहे. तिची आणि तिच्या गावाची गोष्ट आपल्याला भारताचा वेगळा चेहरा दाखवते. चला तर जाणून घेऊया कमलाची गोष्ट आजच्या घडीला इतकी विलक्षण का ठरतेय...

राजस्थानच्या बारमार जिल्ह्यात ‘भीलों की धनि’ हे गाव आहे. या गावाजवळून भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमा जाते. बॉर्डर नजीकचं गाव असल्याने या गावात भीतीचं वातावरण होतं. याच भीतीपोटी लोकांनी मुलींना उच्च प्राथमिक शिक्षण देण्यास बंदी घातली होती. जेमतेम शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुलींची लग्नं लावून देण्यात येत होती. ही परिस्थिती बदलली जवळजवळ ६ वर्षापूर्वी.

या भागात आता सैन्याची चौकी बसवण्यात आली आहे. सैन्याने मुलांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं. तरी भीती ही होतीच. पहिली हिम्मत दाखवली ती मजुरी करून पोट भरणाऱ्या एका गावकऱ्याने. त्यांनी आपल्या मुलीला दहावीपर्यंतचं शिक्षण दिलं. ती मुलगी म्हणजेच कमला. तिने दहावीत प्रवेश केल्यावर एक महत्वाची बाब गावकऱ्यांच्या लक्षात आली. आजवर गावातल्या कोण्या पुरुषाने पण दहावीची परीक्षा दिली नव्हती. आज कमला ही दहावीची परीक्षा देणारी गावातली पहिली मुलगी ठरली आहे.

कमला आणि तिच्या वडिलांनी पहिल्यांदा ही हिम्मत दाखवली. सैन्याची चौकी बसवल्यानंतर कमलाच्या वडिलांनी तिला शाळेत पाठवलं. तिच्या दहावीच्या प्रवेशाने इतिहास तर रचलाच, पण आता गावातल्या इतर मुलींसाठी शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

कमलाला तिच्या यशाबद्दल विचरल्यावर ती म्हणाली की ‘’मला आनंद आहे की मी दहावीची परीक्षा देणारी गावातली पहिली मुलगी आहे. पण मला वाटतं की मी शेवटची मुलगी नसावी.”

‘भीलों की ढाणी’ गावाची परिस्थिती आजही वाईट आहे. गावात पिक येत नाही. गावकऱ्यांना पोटापाण्यासाठी बारमार किंवा गुजरातला जावं लागतं. गावाजवळून गेलेल्या सीमा रेषेमुळे भीतीचं सावटही आहेच. 

मंडळी, कमला आणि तिच्या वडिलांनी दाखवलेली हिम्मत गावासाठी नवीन सुरुवात ठरली आहे. या पुढे सगळ्याच मुलींना शिक्षण मिळेल अशी आपण आशा करूया !!

सबस्क्राईब करा

* indicates required