computer

केरळातला थय्यम आणि बोटींची शर्यत!! ट्रॅव्हलब्लॉगमधून जाणून घ्या केरळ पर्यटनातल्या काही गंमतीजमती!!

भारताचं नंदनवन अशी ख्याती असलेल्या केरळला बोभाटाचे हितचिंतक श्री. कुमार मोरे आणि अपर्णा मोरे यांनी भेट दिली. त्यांना दिसलेला-गवसलेला केरळ आम्ही त्यांच्याच शब्दांत इथे देत आहोत. श्री. कुमार मोरेंना तुम्ही थेट ओळखत नसाल, पण त्यांनी काम केलेल्या एका कलाकृतीशी आपला चांगलाच परिचय आहे. ही कलाकृती म्हणजे अमूलची प्रसिद्ध अमूल गर्ल. अशा या प्रतिभावंत कलाकाराची मदत बोभाटालाही मिळाली. बोभाटाच्या ठगाची जबानी सिरीजसाठीही कुमार मोरे यांनी आपल्या खास शैलीत स्केचेस काढून दिले होते. त्याबद्दल बोभाटा टीम त्यांची आभारी आहे.

कन्नूरला पोहचता पोहचता संध्याकाळ झाली होती. आम्ही St. Angelo’s किल्ला बघितला. हा किल्ला अगदी समुद्रकिनारी आहे. तिथून सूर्यास्त खूपच छान दिसला. दुसर्‍या दिवशी लवकरच आम्ही हॉटेलमधून चेक आऊट केले आणि मुटप्पन (Muthappan) गावाकडे निघालो. तिथल्या पराशिनी कडऊ(Parassini Kadavu) मंदिरात गेलो. तिथे समजलं थय्यम नृत्य दुपारी २:३० वाजता आहे. आता काय कारायचं? मग आम्ही २०-२५ कि. मी. प्रवास करून कन्नूरला ‘Kerala Folklore Academy’ बघायला परत गेलो.

(St. Angelo’s किल्ला)

ही केरळची अकादमी केरळच्या पारंपारिक कलांचं संरक्षण आणि संवर्धन करते. इथे काही शतकांपूर्वीची भांडी, मुर्त्या, हत्यारे, आदिवासींनी तयार केलेले मुखवटे व प्रामुख्याने थय्यमचे पेहेराव, मुखवटे आणि माहितीही होती. थय्यम चे २५-३० प्रकार, त्यानुसार त्यांचे मुखवटे आणि प्रत्येकाची वेगवेगळी कथा तिथे लिहिलेली आहे. बर्‍याच थय्यमची शोकांतिका आहे. थय्यम ही कला सादर करणारे कलाकार दलित असतात. पण तो मुखवटा चढवला की त्यांच्यात देवत्व येतं व सर्वजण त्यांची पूजा करतात. तिथले फोटो काढून आम्ही निघालो. दुपारी दोनपर्यन्त आम्ही मुटप्पनच्या मंदिरात परत पोचलो. मंदिराच्या सभामंडपात लोक आधीच येऊन बसले होते. मंदिरात फोटो काढायला बंदी होती, अगदी मोबाइलवर सुद्धा. तरीपण मी एक-दोन फोटो काढलेच. तिथे बसलेल्या लोकांमध्ये आम्ही बाहेरचे पर्यटक आहोत हे लगेच ओळखू येत होतं. आजूबाजूच्या बायकांनी खाणाखुणा करून मला बरीच माहिती विचारली व खुणेने जेवलीस का असेही विचारले. तसेही प्रवासात वायनाड सोडल्यानंतर इंग्रजी/हिंदीत बोलणारे लोक कमीच भेटत होते.

(Kerala Folklore Academy)

थय्यमसाठी बरेच लोक २-३ तासांचा प्रवास करून आले होते. हळूहळू गर्दी वाढायला लागली. ४-५ पुजार्‍यांनी केरळचे खास ड्रम वाजवायला सुरवात केली आणि मग त्या तालावर नाचत-नाचत थय्यमने प्रवेश केला. पूजार्‍यांनी त्याला ओवाळले. मग थय्यमने देवाची पूजा केली. नंतर त्याने हातातल्या धनुष्य-बाण आणि तलवारीची पूजा केली. ह्या देवत्वाच्या भूमिकेत थय्यम नाचत-नाचत सभामंडपात सर्वत्र संचार करीत होता. त्याच्या वेगवेगळ्या हावभावांतून आणि नाचातून काही कथा सांगत होता. जरी आम्हाला त्यातली कथा समजली नाही तरी ह्या शब्दात न सांगता येणार्‍या खूप वेगळ्या अनुभवाने आम्हाला जवळजवळ एक तासभर खिळवून ठेवले होते. शेवटी थय्यमचे आशीर्वाद घेण्यासाठी लोक त्याच्याजवळ गोळा झाले व आम्ही तिथून निघालो.

आमचा प्रवास आता पयन्नूरच्या (Payannur) दिशेने चालू झाला. इथे आमचा मुक्काम ‘Lake View Home Stay’ मध्ये होता. आम्ही तिथे पोहोचल्यावर बाला नावाच्या माणसाने आमचे स्वागत केले. आमचं सामान उचलून आमच्या रूममध्ये नेण्यास त्याने मदत केली. त्याचं घर ह्या ट्रीपमधलं आत्तापर्यंतच बेस्ट लोकेशन होतं. घरासमोर backwaters आणि घरामागे समुद्र! आवारात मोठमोठी नारळाची झाडं!! आणखी काय पाहिजे? बंगल्यात खाली बाला आणि त्याचं कुटुंब राहातं आणि वरच्या मजल्यावर 3 रूम्स आहेत व शेवटी डायनिंग आणि किचन आहे. 

(Lake View Home Stay)

बाला खूपच बोलघेवडा आहे. मनाने सरळ आणि अगत्यशील आहे. आल्याआल्या त्याने आम्हाला चहा आणि स्नॅक्स आणून दिले आणि बरोबर त्याच्या बागेतली केळीही दिली. लगेच तो आमच्याबरोबर गप्पा मारायला बसला. थय्यमचा विषय निघाल्यावर तो हळहळला, म्हणाला की "तुम्ही सकाळीच असायला पाहिजे होते."  कारण जवळच एका गावात सकाळपासून थय्यमचा कार्यक्रम होता. सकाळी थय्यम निखार्‍यांवरही चालला. त्यानंतर तो डोंगरावर गेला आहे व वरच्या देवळात पुजा करून संध्याकाळी गावातल्या देवळात येणार आहे. तुम्हाला बघायचे असेल तर थोडावेळ आराम करून बघायला जावू शकता. हे ऐकून आम्हाला खूपच आश्चर्य वाटले आणि आपण किती सुदैवी आहोत असे वाटले. एकाच दिवशी दोन वेगवेगळे थय्यम बघणं आमच्या नशिबी होतं!

खरंतर आम्ही खूप थकलो होतो. पण आपल्याला वेगळं काही बघायला मिळेल म्हणून थोडा आराम करून आम्ही १६ मिनिटे ड्राइव करून ‘Pilicode Veeth Kunnu’ ह्या देवळात गेलो. हे देऊळ थोड उंचावर होतं. बरेच लोक पायर्‍या उतरून येत होते. वरती कार्यक्रम संपला होता व लोक पांगले होते. फोटो काढायची परवानगी सहज मिळाली. थय्यम एका ठिकाणी बसला होता व लोक रांग लाऊन त्याचे आशीर्वाद घेत होते. लोक प्रश्न विचाराचे, तो त्यांना उत्तर द्यायचा आणि पैसे घेऊन विभूति द्यायचा. वर्षातले आठ एक महिने अशा प्रकारे मिळालेली दक्षिणा हीच त्यांची कमाई असते. लोकांची एवढी भाबडी श्रद्धा आहे की त्यांचे प्रश्न तर सुटतातच, पण कित्येकांना त्याच्या आशीर्वादाने मुलेही होतात!

रात्री परत आल्यावर बालाने सांगितले की पुरामुळे केरळमधील सुप्रसिद्ध बोट रेस पुढे ढकलली गेली होती, ती उद्या जवळच्याच गावात आहे. बघायला आवडेल का? व्वा!! एवढी नामी संधी कोण सोडेल? देव, ईश्वर जो कोणी वरती आहे ‘वो देता है तो छप्पर फाडके देता है!’ आणि आम्ही तर त्याच्याच देशात आलो होतो. God’s Own Country!

दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही बालाच्या घरामागील समुद्रावर गेलो, बीच वर कोणीही नव्हते! एका बाजूला झाडीतून सूर्य उगवत होता, लांबच्या लांब निर्मनुष्य व शांत समुद्रकिनारा, फक्त समुद्राच्या लाटांचा आवाज आणि पायाखाली मऊ मऊ रेती! खूपच भाराऊन टाकणारं, फक्त अनुभवावं असं दृष्य होतं! आम्ही लहान मुलांसारख पाण्यात खेळलो, पडलो, धडपडलो! तिथून दमून आल्यामुळे रुचकर नाश्त्यावर आडवा हात मारला. नंतर जेवणाच्या आधी आम्ही अशी एक जागा बघायला गेलो जिथे backwaters आणि समुद्र मिळतात. तेही त्याच्या घराच्या दहा मिनिटांवर.

परत येईपर्यंत बालाने दुपारच्या जेवणाची तयारी केली होती. जेवायला काय काय आणि कित्ती पदार्थ होते. फिश फ्राय, केळीच्या फुलांची भाजी, कच्या पपईची भाजी, तिथला मसाला घालून बनवलेले चिकन व एका थाळीत काही पांढरे पांढरे तुकडे होते. बालाकडून कळाले की नारळ जमिनीत लावल्यावर काही रोपे उगवत नाहीत. मग ती उकरून काढली तर त्यात असे पांढऱ्या रंगाचे असलेले नारळाच्याच आकाराचे नरम खोबरे असते. खूपच चवदार होतं ते! बालाने तीस वर्ष U.A.E च्या राजाकडे त्याचा personal staff म्हणून नोकरी केली आहे. नोकरी सोडून तो इथे स्थायिक झाला. त्याचं हिन्दी उत्तम आहे. एकूणच बालाकडची प्रत्येक गोष्ट उच्च प्रतीची आणि राहायला आरामदायक अशीआहे. तो अगदी मन लाऊन आणि प्रेमाने सगळं करत होता.

दुपारी जेवण करून आम्ही बोट रेस बघायला गेलो. पंधरा वीस मिनिटांत तिथे पोचलो. ही रेस पदन्ना (Padanna) नदीवर होती. रेस जिथे संपत होती त्याच बाजूच्या दोन्ही काठांवर व काठांना जोडणार्‍या पुलावर प्रेक्षकांनी गर्दी केली होती. एका स्टेजवरुन मल्याळी भाषेत कॉमेंट्री चालू होती, पाण्यात फोटोग्राफर्ससाठी मचाण उभारले होते. रेस एक कि. मी. दूरवरुन चालू होत होती. आम्ही गेलो तेव्हा बायकांची रेस सुरू होणार होती. सुदैवाने आम्हांला जवळून बघता येईल अशी जागा मिळाली. रेस सुरू होण्याआधी एका बोटीवर ड्रम वाजवणारा चमू ड्रम वाजवत वाजवत प्रेक्षकांसमोरून जायचा. दूरवर रेस सुरू झाली की लोक उत्साहाने ओरडायला लागायचे. जशा जशा बोटी जवळ येतील तसा लोकांचा आवाज वाढत जायचा. आम्हीही त्यांना साथ देत होतो. एकदम भारी आणि रोमांचकारी अनुभव होता! आम्हाला एकूण चार रेस बघायला मिळाल्या. सर्व रेस संपल्यानंतर आम्हीही सर्वांबरोबर निघालो. त्यांच्यामध्ये आम्हीच एकटे पर्यटक होतो. तिथले लोक खूपच अगत्यशील होते. आम्हाला त्यांनी त्यांच्यातलं असल्यासारख सामाऊन घेतलं होतं. खरंतर हे शब्दात सांगणं कठीण आहे. ते सगळं अनुभवणं आणि त्यात बुडणं आमच्यासाठी खूपच मोठा euphoria होता.

आज आमचा शेवटचा दिवस होता. आज आम्ही बोट क्रूझ करणार होतो. घराजवळच जेट्टी होती. आम्ही बरोबर आठ वाजता जेट्टी वर पोचलो. पाच दहा मिनिटांतच बोट आली. आम्ही बोटीत चढलो. बोटीत एकच प्रवासी होता. आम्ही तिकीट काढले. Last stop Rs.13/- only! ही फेरी बोट तिथल्या लोकांसाठी बससारखी आहे. बोट प्रत्येक जेट्टीवर थांबत होती, लोक चढत होते - उतरत होते, आम्ही आपले आजूबाजूचा निसर्ग डोळ्यांत आणि कॅमेर्‍यात साठवून घेत होतो. आम्ही दहा वाजता शेवटच्या स्टॉपवर पोचलो. बोट अर्धा तास थांबून परत आल्या मार्गी जाणार होती. बोटीचा ‘आवाज’ सोडला तर आमची cruise मस्तच झाली! ते ही प्रत्येकी 26/- रुपयात!

दुपारनंतर आम्ही कसारगोडचा ‘Bekel Fort’ बघायला गेलो. हा फोर्ट ही समुद्रकिनारी आहे. किल्ल्यात शिरल्यानंतर छान बाग होती. किल्ल्याच्या तटबंदी च्या भिंतीवरून खालचा फेसाळणारा समुद्र खूपच छान दिसत होता. वायनाड सोडल्यानंतर इथे आम्हाला टुरिस्ट भेटले. ते ही मराठी होते. दुसर्‍या दिवशी पहाटे आम्ही मेंगलोर विमानतळासाठी निघालो. बालाने आपुलकीने बरोबर खाऊ दिला. बालाकडचं आणि एकूणच केरळमधलं वास्तव्य आमच्यासाठी आयुष्यभर लक्षात राहील असं होतं! खूप धम्माल केली आम्ही!

विमानात बसलो आणि केरळला बाय बाय केले! मनापासून प्रार्थना केली की इथला निसर्ग ज्या रॉ फॉर्म मधे आहे तसाच राहू दे.

 

लेखिका: अपर्णा मोरे

सबस्क्राईब करा

* indicates required