भारतातला कोणता समुद्रकिनारा जगात सर्वात जास्त कासवे जन्मण्यासाठी प्रसिद्ध आहे? पाहा कासवजन्माचा हा अद्भुत सोहळा!!

निसर्ग किती गूढ असतो पाहा! एका बाजूला संपूर्ण मानवजात अस्तित्वाच्या शंकेने भयभीत झाली आहे आणि त्याचवेळेस निसर्गाचा नवनिर्माणाचा सोहळा मात्र नव्या जोषात बहरू लागला आहे. आपल्या ओडिशातल्या रूरकीजवळ गहिरमाथा नावाचं एक ठिकाण आहे. तिथला किनारा जगप्रसिद्ध आहे तो ॲालिव्ह रिडले जातीच्या कासवांसाठी. या जातीच्या कासवांचं जगातलं हे सर्वात मोठं प्रजननस्थान आहे.

दरवर्षीप्रमाणं यावर्षीही या गहिरमाथा किनाऱ्यावर शुक्रवारी पहाटे कासवांच्या जन्माचा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. थोड्याथोडक्या नाही, तर ॲालिव्ह रिडले जातीच्या कासवाच्या तब्बल दोन कोटींहून अधिक पिल्लांनी अंड्यातून बाहेर येऊन या जगात प्रवेश केला. आणि लगेचच किनारा ओलांडून आपल्या जलविश्वाच्या कुशीत विहार सुरूही केला.
खरं म्हणजे हा जन्मसोहळा अनुभवण्यासाठी दर वर्षी ओदिशाचे समुद्रकिनारे माणसांच्या गर्दीने फुलून गेलेले असतात. हजारो लोकांच्या उपस्थितीत ॲालिव्ह रिडलेची चिमुकली पिल्ले समुद्राच्या दिशेने पुढे जात असतात. पण शुक्रवारी जन्मलेल्या या पिल्लांना तो स्वागत सोहळा अनुभवता आला नाही. लोक लॉकडाऊनमुळे आपापल्या घरात अडकून पडले आहेत. त्यामुळं यावेळी गहिरमाथ्याचा किनारा फक्त कासवाच्या पिल्लांनीच फुलला होता. ओदिशाचा तो किनारा काल ॲालिव्ह रिडलेच्या कोट्यावधी पिल्लांना त्यांच्या जगाकडे घेऊन जाताना नक्कीच आनंदाने मोहरून गेला असेल.
लाॅकडाऊनमुळे समुद्रकिनाऱ्यांवरील माणसांचा वावर कमी झाला आहे. त्यामुळे ॲालिव्ह रिडलेच्या कासविणींनी या वेळी नेहमीपेक्षा थोडी जास्तच अंडी किनाऱ्यावरील आपापल्या घरट्यात घातली. त्यामुळे यंदाच्या मोसमात जन्मलेल्या पिल्लांची संख्याही नेहमीपेक्षा जास्तच आहे.
जन्मदराचा समतोल राखण्याचे निसर्गाचे हे चक्र अद्भुतच म्हणावे लागेल!
लेखक : दिनेश गुणे