computer

३० वर्षं राबून ३ किलोमीटर लांब कालवा तयार करणारा शेतकरी !!

मांझी सिनेमा तुम्ही पाह्यला असेल. पाह्यला नसला तरी तो कशाबद्दल आहे हे तर नक्कीच माहित असेल. नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत असलेला हा सिनेमा दशरथ मांझी या बिहारच्या अफलातून माणसावर बेतला आहे. एका डोंगरामुळे पलिकडच्या गावी वेळेत पोहोचता आले नाही, त्यामुळे आपल्या पत्नीचा जीव गेला. पण वेळ इतरांवर येऊ नये म्हणून त्यांनी चक्क २२ वर्षं एकट्याने तो डोंगर पोखरून काढला. त्यांची कहाणी या सिनेमामुळे सर्वांपर्यंत पोहोचली. पण हे एकच असे मांझी नाहीत. बिहारमधल्या गया येथेही असाच एक दुसरा मांझी आहे.

बिहारमधील गया जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न मोठा आहे. त्यावर उपाय करण्यासाठी लौंगी भुईया नावाच्या भन्नाट माणसाने तब्बल ३० वर्षं राबून डोंगरापासून गावापर्यंत कालवा खणून गावाला पाणी मिळवून दिलं आहे. गया जिल्ह्यातल्या कोठीलवा गावात लौंगी भुईया यांनी ३० वर्षं एकट्याने राबत ३ किलोमीटर लांब कालवा तयार करून दाखवला आहे.

डोंगरावर पडणारे पाणी वाहून जाते, कालवा तयार केला तर ते पाणी थेट शेतांना देता येईल हा भुईयांचा उदात्त हेतू त्यामागे होता. विशेष गोष्ट म्हणजे या कालव्याचा फायदा लौंगी भुईया पेक्षा इतर गावकऱ्यांना जास्त होणार होता, तरी कुणीही त्यांच्या मदतीला आले नाही. तरी त्यांनी हिंमत हरली नाही, ते सातत्याने आपले काम करत राहिले.

ही गोष्ट हळूहळू काही लोकांना कळाली. त्यातलाच एक रॉबिन कुमार. या रॉबिनकुमारने भुईयांची भेट घेतली. त्यावेळी लौंगी भुईया यांनी आपल्याला ट्रॅक्टरची गरज आहे असं सांगितलं. लागलीच रॉबिन कुमार यांनी त्यांच्यासोबत फोटो काढून ट्विटरवर टाकला. त्यात म्हटले की ३० वर्षं खर्चून कालवा खोदणाऱ्या या माणसाची फक्त एक इच्छा आहे ती म्हणजे स्वतःच ट्रॅक्टर असावा. त्यांनी पोस्टमध्ये थेट महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांना टॅग केले आणि म्हटले महिंद्रा कंपनी या माणसाला मदत करून अभिमान वाटेल असे काम करेल.

आनंद महिंद्रा यांनी लागलीच या गोष्टीची दखल घेत म्हटले की त्यांना ट्रॅक्टर देणे हे माझे सौभाग्य असेल. त्यांनी या कालव्याची तुलना थेट पिरॅमिड आणि ताजमहाल सोबत करून टाकली. पुढे ते म्हणाले की, आमच्या ट्रॅक्टरचा वापर लौंगी भुईया करतील तर हा आमचा सन्मान असेल. अशापद्धतीने देशातल्या एका प्रामाणिक मेहनती माणसाचे स्वप्न एका दानशूर उद्योगपतीने पूर्ण केले आहे.

 

सबस्क्राईब करा

* indicates required