जगातलं सर्वात एकटं घर... कुठे आहे हे घर आणि कोणी बांधलं ?

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला? लहानपणापासून गायलेलं हे अतिशय लाडकं गाणं आठवतंय का? तेव्हा चॉकलेट प्रिय म्हणून चॉकलेटचा बंगला त्याला ट्रॉफी चे दार.. असं ते स्वप्नांची यादी घेऊन पुढे जात राहतं....घराविषयी किती वेगळी कल्पना हो ना?
तुम्हा सगळ्यांचं एक स्वप्नातलं घर असेल ना? शहरवासी असाल तर या गर्दी, प्रदूषण, कोलाहलापासून दूर निसर्गाच्या सानिध्यातलं घर, जिथे शांतपणे राहता येईल. अश्याच एका घराचा फोटो नुकताच समोर आला आहे. अतिशय सुंदर अश्या दुर्गम बेटावरील घराचा फोटो सध्या व्हायरल होतोय. समुद्राभोवतालच्या दुर्गम बेटावरील हे नयनरम्य घर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. त्याचे चित्र 'world's lonliest house' म्हणजे 'जगातील सर्वात एकटे घर' म्हणून ओळखले जात आहे. फोटो पाहिल्यावर तुम्हाला लगेच लक्षात येईलच.
तुम्हाला वाटेल की हा फोटो फोटोशॉप करून कोणीतरी पोस्ट केला आहे. आजकाल असं सर्रास चालतं. पण मंडळी हे घर खरंच अस्तित्वात आहे. आश्चर्य वाटलं ना? चला करूया या घराची सफर.
हे घर आयलँडच्या दक्षिणेकडील एलियाए (Elliðaey) बेटावर आहे. वेस्टमानायेआर आर्किपेलागोच्या जवळ अटलांटिक महासागरामध्ये एलियाए (Elliðaey) हे बेट आहे. हे बेट आता पूर्णपणे निर्जन असले तरी १८ आणि १९व्या दशकात काही कुटूंबे इथे राहत होती. हे कुटुंब मासेमारी, थोडीफार शेती आणि पाळीव प्राणी वाढवणे यावर गुजराण करत होते. १९३० मध्ये ते रहिवासी बेट सोडून गेले. तेव्हापासून हे बेट निर्मनुष्य आहे. कोणी तिथे कोणी राहत नाही.
अशीही एक अफवा आहे की हे घर एका अब्जाधीश गायक जोर्कने बांधले आहे. पण सत्य काय आहे? हे घर नक्की बांधले कोणी?
एलियाए हंटिंग एसोसिएशनने हे घर बांधले आहे. हे लोक इथून मासेमारी करतात, विविध प्रजातींवर लक्ष ठेवून अभ्यास ही करतात. या बेटाच्या चोहोकडे मोठया संख्येने मासे सापडतात! इथे सूचना मिळताच अनेक मासेमारी शहरातून शिकारीसाठी येतात. त्यांच्यासाठी हे बेट मासेमारीसाठी नंदनवन म्हणता येईल.
एलियाए बेटावर बांधलेले हे घर मासेमारी करणाऱ्यांसाठी एक समुद्री तळ आहे. इथे पावसाचे पाणी साठवण्यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंगची सिस्टिम आहे. घरात एक सौना आहे जिथे नैसर्गिक पावसाचे पाणी जमा होते. एलियाए हंटिंग एसोसिएशनने इथे राहण्याची व्यवस्था केली आहे असंही समजते.
एलियाए बेटाला "नेचर रिजर्व ऑर प्रोटेक्टेड एरिया (निसर्ग राखीव आणि संरक्षित क्षेत्र) म्हणून घोषित केले आहे. अनेकविध पक्षीही इथे विणीच्या हंगामात येतात. अनेकदा समुद्रात वादळ आलं की समुद्रजीवही इथे आश्रयास येतात. इथला निसर्ग, बर्फाच्छादित डोंगर, त्याच्या मधोमध असलेले हे निळ्याशार समद्रातले सुंदर असे हे दुर्गम बेट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असते
तुम्हाला जायला आवडेल का या बेटावर?किंवा कुठल्या बेटाला तुम्हीही भेट दिली आहे का? नक्की कळवा..आणि शेयर करत रहा..कारण चांगल्या माहितीचा बोभाटा तर झालाच पाहिजे….
लेखिका: शीतल अजय दरंदळे