computer

या पठ्ठ्याने घरच्या घरीच तयार केली आहे सोलर सायकल....पूर्ण प्रक्रिया जाणून घ्या!

पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरामुळे दुचाकी किंवा चार चाकी गाड्या वापरणे आता अनेकांच्या आवाक्याबाहेरची बाब बनली आहे. पेट्रोल, डिझेलच्या किंमती इतक्यात तरी कमी होतील अशी काही चिन्हे नाहीत. त्यामुळे लोकांनी आपापल्या परीने या समस्येवर तोडगा काढायचा असे ठरवले आहे. आता पुन्हा काही जण सायकलीच्या वापराकडे वळत आहेत. सायकलीमुळे इंधन बचत होते, पैसा वाचतो हे खरं असलं तरी सायकल कमी वेळेत जास्त अंतर पार करू शकत नाही. त्यामुळे यात एकतर अधिक वेळ जातो शिवाय, चढणीचा रस्ता असेल तर सायकल चढवण्यासाठी खूपच जास्त मेहनत घ्यावी लागते. सायकल चालवण्याचे काही फायदे आहेत तसेच काही तोटेही आहेत.

इंधन बचत होईल, पैसेही वाचतील आणि जास्त वेळही जाऊ नये असा काही तरी पर्याय शोधण्यासाठी राजकुमार मुप्पारापू याने प्रयत्न सुरू केले. कारण जिथे महिन्याकाठी त्याचा एकूण खर्च ३००० रुपये होत होता तिथे या इंधन दरवाढीमुळे त्याचे दरमहा पाच हजार रुपये खर्च होऊ लागले. हा वाढीव खर्च त्याला झेपणारा नव्हता. त्यामुळे त्याचे बजेटच कोलमडून जाऊ लागले.

यावर काय पर्याय काढता येईल असा विचार करत असतानाच त्याला आठवले की आपल्याला लहानपणी एक इलेक्ट्रिक सायकल बनवायची होती, पण तेव्हा आपल्याकडे तितके बजेट नसल्याने आपण तो विचार डोक्यातून काढून टाकला होता. हे आठवतच त्याने आपल्या वडिलांशी चर्चा केली आणि त्यांच्याकडे थोडी मदत मागितली. त्याचे वडील राजमल्ली इलेक्ट्रिशियन आहेत. त्यामुळे या कामात त्यांची मदत नक्कीच झाली असती. दोघांनी मिळून सायकलला इलेक्ट्रिक बॅटरी आणि मोटार कशी जोडता येईल यावर चर्चा केली आणि त्याचा एक ढोबळ आराखडा तयार केला.

आराखडा तयार झाल्यावर फक्त दहा दिवसांत त्यांनी त्यांच्या कल्पनेतील ही सायकल तयार केली. यासाठी राजकुमारला काही जास्त खर्च आला असेही नाही. वीस हजार पेक्षाही कमी पैशात त्याची ही सोलर-बाईक तयार झाली. सायकलला एक बॅटरी आणि मोटार जोडून त्यांनी  बनवलेली ही सायकल सोलर लाईटवर चार्ज होते. त्यामुळे बॅटरी चार्जिंग करण्यासाठीही पैसे मोजण्याची गरज नाही. अगदी स्वस्तात मस्त अशी ही कल्पना त्याने प्रत्यक्षात उतरवली. सोलर बॅटरीवर चालणारी ही सायकल एका तासाच्या चार्जिंग मध्ये २५ किलोमीटरचे अंतर पार करते.

राजकुमारने विज्ञान शाखेतून पदवी घेतलेली आहे. वडिलांशी चर्चा करतानाच त्याला त्याच्या अभ्यासाचा आणि शालेय जीवनात केलेल्या काही प्रयोगांचाही फायदा झाला. राजमल्ली यांनीही आपल्या मुलाला या प्रयोगात मदत केली. पैशाचा प्रोब्लेम तर होताच त्यासाठी राजकुमारने त्याच्या मित्राकडून काही पैसे उसने घेतले. त्यातील आठ हजार खर्च करून त्याने नवीन सायकल आणली. आणखी १०,००० खर्च करून त्याने १२ व्होल्टच्या दोन बॅटरीज, एक सोलर पॅनेल, एक कंट्रोलर, आणि २४ व्होल्टचे फ्री-व्हील डीसी मोटार, असे साहित्य आणले. हीच मोटार सायकलला जोडण्यात आली ज्याच्या सहाय्याने सायकल चालवली जाते.

सायकलची सीट आणि हँडलच्या मध्ये जो रॉड असतो त्यावर त्यांनी ही बॅटरी बसवली. फ्री-व्हील मोटार मागच्या चाकाला जोडली आणि ही मोटार बॅटरीला जोडली. कंट्रोलर लाईन्स मोटारकडून हँडलकडे वळवण्यात आल्या ज्यामुळे सायकलला ब्रेक लावणे सोपे झाले. अशा पद्धतीने सहज सोपी आणि दणकट अशी सोलर सायकल त्याने बनवली. यामुळे त्याचा महिन्याला इंधनावर जो पैसा खर्च होत होता तो पूर्णतः वाचतो आहे. सायकलच्या उजव्या बाजूला त्याने सोलर पॅनेल बसवले आहे. जे दिवसभरात अपोआप चार्ज होते आणि बॅटरी फुल्ल राहते.

राजकुमारला कामानिमित्त गोपालपूरम मधील वारंगल ते गिर्निबावी असा दररोज वीस किमीचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्याला गाडीची किती निकड असेल हे समजू शकते. वाढत्या इंधानाचा त्याच्या खिशावर किती ताण आला असेल हेही लक्षात येते, पण त्यानेच निर्माण केलेल्या या साधनामुळे आता प्रवासासाठी खर्च होणारी रक्कम शिल्लक राहते. तो कामावर तर वेळेवर पोहोचतोच, पण त्याच्या या सोलर-बाईकमुळे प्रदूषणही होत नाही.

राजकुमारचा हा जुगाड पाहून अनेकजण त्याच्याकडे अशा प्रकारची सायकल बनवून देण्यासाठी विचारणा करत आहेत. त्याने आपल्या काही जवळच्या मित्रांना अशा प्रकारे सायकल बनवून दिलेली आहे. यासाठी त्याने फक्त दहा हजार रुपये इतके शुल्क आकारले. त्यातही नऊ हजार रुपये तर सर्व प्रकारचे साहित्य खरेदी करण्यासाठीच जातात. त्याला यातून एका सायकलमागे एक हजार रुपयाचा फायदा मिळतो.

आता त्याला अनेक दूरच्या ठिकाणांवरून मागणी येऊ लागली आहे. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश या राज्यातूनही लोक त्याला संपर्क करू लागले आहेत. मात्र एकट्या राजकुमारला इतक्या मोठ्या प्रमाणात सोलर-सायकल्सची निर्मिती करणे शक्य नाही, म्हणून त्याने अजून तरी इतरांसाठी अशा प्रकारची सायकल बनवून दिलेली नाही. त्याच्या हाताखालीही कुणी मदतीला नाही. त्याच्या मते यासाठी जर सरकारी मदत मिळाली किंवा कुणी गुंतवणूक करण्यास तयार झाले तर मात्र तो व्यावसायिकदृष्ट्या या सायकल्सची निर्मिती करण्याचा नक्की विचार करेल. शिवाय अवघ्या सहा हजार रुपयात मी अशा सायकल्स उपलब्ध करून देईन असाही त्याचा दावा आहे.

राजकुमारला जर आर्थिक पाठबळ आणि मनुष्यबळ मिळाले तर नक्कीच तो स्वतःचा उद्योग उभारू शकेल. ज्यामुळे त्याच्या परिसरातील काही लोकांना रोजगार मिळेल आणि इतरांना स्वस्त दारात सोलर-सायकलही मिळतील.

 

लेखिका: मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required