तुटलेला रेल्वेमार्ग सांगण्यासाठी हा गुजरातेतला तरुण १ किमी धावला!! बक्षीस मिळालेच, पण केवढी मोठी दुर्घटना टळली!!
आपले दैनंदिन आयुष्य साधरणपणे जगत असणारे लोक खरंतर कुणाच्या अध्यात मध्यात नसतात. पण या लोकांमध्येही एक हिरो लपलेला असतो. एखादी दुर्घटना घडली किंवा घडण्याची शक्यता असेल अशावेळी काही लोक दुर्लक्ष करून आपल्या कामाला लागतात. पण काही मात्र धोका पत्करून स्वतःला झोकून देतात.
गुजरातचे राकेश बारिया हे ३० वर्षीय गृहस्थ त्यांच्या प्रसंगावधानासाठी देशभरात कौतुकास पात्र ठरले आहेत. दिल्ली-मुंबई रेल्वेमार्गावर रतलाम हे गाव आहे. ते तसे या मध्यप्रदेशात असले तरी ते राजस्थान-गुजरात यांच्या सीमाभागात येते. या रतलाम विभागात दाहोड जिल्ह्याजवळ एके ठिकाणी रेल्वे ट्रॅकमध्ये बिघाड असल्याचे राकेश यांना दिसून आले. त्यांनी लागलीच धाव घेत हा धोका टाळला.
राकेश आपल्या बकऱ्या चारण्यात व्यस्त असताना, त्यांना एके ठिकाणी रेल्वे ट्रॅक खंडित झालेला दिसला. ते मग किलोमीटरभर अंतरावर असलेल्या स्टेशनवर धावले. पण तिथे त्यांना कोणीही सापडले नाही. ही गोष्ट मग राकेशने आपल्या वडिलांना सांगितली. त्यांनीही रेल्वे कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून बघितला. इथेही त्यांना यश आले नाही.
शेवटी राकेश आपल्या घरी परतले आणि एक मोठा लाल रुमाल घेऊन आले. जिथे हा ट्रॅक खंडित झाला होता. त्यापासून २ किलोमीटर पुढे जाऊन ते उभे राहिले. त्यांना लाल रुमाल दाखवताना पाहून लोको पायलटने गाडी थांबवली आणि ट्रॅक दुरुस्त करून पुढची दुर्घटना टाळली.
राकेश यांच्या या सजगतेचा सन्मान म्हणून रतलाम रेल्वे डिव्हिजनकडून त्यांना ५ हजार रुपये बक्षिस देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. इंटरनेटवर राकेश यांच्यासारख्या सामान्य माणसाने केलेल्या असामान्य कामाचे प्रचंड कौतुक होत आहे.
उदय पाटील




