या पठ्ठ्याने चक्क बेड्या घालून पोहण्याचा जागतिक विक्रम केलाय...कोण आहे तो?

जागतिक विक्रम करण्यासाठी जगभरातील लोक विविध गोष्टी करत असतात. कधीकधी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवावे यासाठी अनेकजण चित्रविचित्र प्रयत्न करताना दिसतात. कधी कोणी आपल्या शेतात मोठमोठ्या आकाराची फळं-भाज्या उगवतं, कुणी लांबलचक नखं वाढवतं, कोणी मिशी वाढवतं तर काही विक्रमासाठी वर्षानुवर्षे केसही कापत नाहीत. विविध खेळातही अनेक जागतिक विक्रम आहेत. फुटबॉल, बास्केट बॉल ,पोहणे असे अनेक साहसी खेळ. आता नुकताच एका तरुणाने पोहण्याचा विक्रम केला आहे. तुम्हाला वाटेल पोहण्याचा कसला विक्रम? तर या पठ्ठ्याने चक्क हातात बेड्या घालून जागतिक विक्रम केला आहे. नक्की काय आहे हा प्रकार?
बेन कॅटझमन असे त्या जागतिक विक्रम करणाऱ्याचे नाव आहे. व्हर्जिनाच्या ३२ वर्षीय बेनने हातात बेड्या घालून ८.६ किलोमीटर एवढे अंतर पार केले आहे. याआधीच हा रेकॉर्ड २०१९ मध्ये एल्हम सदात यांनी केला होता. त्यांचे अंतर ५.४९ किलोमीटर इतके होते. त्यांनीही बेड्या घालून पोहण्याचा जागतिक विक्रम केला होता. तो विक्रम मोडण्यासाठीच बेन कॅटझमन यांनी हा जगावेगळा प्रयत्न करायचे ठरवले. हा कोणी चोर किंवा दरोडेखोर नाही बरं का? केवळ जागतिक विक्रम करण्यासाठी त्यांनी हा बेड्या घालून पोहण्याचा सराव केला आहे.
बेन कॅटझमन यांना पोहण्याची खूप आवड आहे. अगदी लहानपणापासूनच त्यांना पोहायला आवडायचे. ते म्हणतात की, 'ताण घालवण्यासाठी पोहण्याचा खूप उपयोग होतो. शारिरीक व्यायाम म्हणून पोहणे चांगलेच पण मानसिक स्थिती ही तणावरहित राहायला नक्कीच मदत होते.' या आवडीमुळेच यात काही रेकॉर्ड करावे असा त्यांच्या मनात विचार आला. खूप अभ्यास केल्यानंतर त्यांना बेड्या घालून पोहण्याची कल्पना सुचली. त्यांनी तयारी सुरू केली. बेड्या घातल्यामुळे पोहताना खूप अडचणी आल्या. हाताला खूप जखमा झाल्या. पाण्याचा प्रचंड दाब असल्याने पोहायला सर्व ताण बाकीच्या अंगावर यायचा. या प्रकारे पोहताना वेळ खूप महत्वाची ठरते. बेड्या नसताना पोहणं जितक्या जलद करता येतं तितकं बेड्या घालून पोहणे कठीण जाते.
त्यांनी विक्रम करण्याचा निर्णय घेतल्यानंतर खूप मेहनत घेतली. पोहण्याबरोबरच धावणे, जिम ट्रेनिंग, पोहण्याचे वेगवेगळे प्रकार जसे लांब पल्ल्या पर्यंत पोहणं, श्वास थांबवून लांबवर सूर मारणं याचे कठोर प्रशिक्षण घेतले. सलग ८ तास पाण्यात राहून त्यांनी आतापर्यंत सर्वात जास्त वेळ प्रशिक्षण घेतले आहे.
बेन यांनी जागतिक विक्रम केला त्यादिवशीचे सर्व फोटो, व्हिडिओ आणि टाइम लॉगबुक गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत वेबसाईटवर सादर केले आहेत आणि लवकरच त्यांचे नाव गिनीज बुक मध्ये नोंदवले जाईल. आपल्या आवडीतून बेन यांनी केलेला हा विक्रम जरी वेगळा असला तरी साहसी नक्कीच आहे.
लेखिका: शीतल दरंदळे