११ वेळा कोरोना लस घेणारे आजोबा १२व्यांदा लस घेताना पकडले गेले!! ते त्यांनी कसे साध्य केले हा किस्सा मूळातून वाचायला हवा!!!

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता ज्यांनी अजूनही आपले दोन डोस पूर्ण केलेले नाहीत ते पूर्ण करून घ्यावे म्हणून सगळीकडून आवाहन केले जात आहे. तर दुसरीकडे बिहारमधून मात्र चांगलीच विचित्र बातमी येत आहे. एका ८४ वर्षांच्या आजोबांनी एक-दोन नाही,तर तब्बल ११ डोस घेतले आहेत.

बिहार येथील माधेपुरा जिल्ह्यातील ओराई या गावात ब्रह्मदेव मंडल नावाचे ८४ वर्षांचे आजोबा राहतात. हे आजोबा ११ वेळा लस टोचून १२ व्या वेळीही लस टोचायल हजर झाले, त्यावेळी हे बिंग फुटले. वरून आजोबा म्हणतात ही लस एकदम भारी गोष्ट आहे, यामुळे माझ्या शरीरातील अनेक दुखणी पळून गेली आहेत.

हा किस्सा घडल्यावर तेथील डॉक्टरांनी डोक्याला हात मारून घेतला असेल हे निश्चित आहे. मंडल पोस्ट ऑफिस कर्मचारी म्हणून निवृत्त झाले आहेत. यात विशेष गोष्ट ही की आधी ८ वेळा त्यांनी एकाच मोबाईल नंबर आणि स्वतःच्या आधारवरून लस घेतली, तर इतर तीन वेळा स्वतःच्या बायकोचा नंबर आणि मतदान कार्ड दिले.

आता प्रश्न असा पडतो की इतक्या वेळा ते लस घ्यायला येत होते, त्यातही दरवेळी एकच नंबर देऊनही हे गौडबंगाल कुणाच्या लक्षात कसे आले नाही? या आजोबांना तर मस्तपैकी लस घेतल्याने आपली दुखणी कमी होत असल्याचा साक्षात्कार झाला आणि ते परत परत लस घ्यायला येऊ लागले, पण दोन डोस झाल्यावरही त्यांना लस कशी मिळू शकली हा ही प्रश्न आहे.

अजून एक प्रश्न म्हणजे नेमक्या कोणत्या लसीचे किती डोस त्यांनी घेतले आहेत हे ही स्पष्ट झालेले नाहीत. या विचित्र प्रकाराने मात्र देशभर हा विषय चर्चिला जात आहे.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required