एकट्याने १६० किलोमीटर लांब नदी साफ करणाऱ्या इकोबाबांबद्दल ऐकलंय??

आपल्याकडे "सरकार करेल ना!" या आशेवर असलेल्या लोकांची संख्या खूप आहे. अर्थात ते चुकीचे आहे असे नाही. पण काही लोक सरकारी मदतीची अपेक्षा न करता काम सुरू करतात आणि इतिहास घडवत असतात. अशा अवलियांची कहाणी आम्ही तुम्हाला नेहमी सांगत असतो. आज अशाच एका कर्मयोग्याची गोष्ट आम्ही सांगणार आहोत.
बाबा बलबीर सिंग सीचेवाल पंजाबमधले पर्यावरण कार्यकर्ते आहेत. यांनी काय केले असेल? तर तब्बल १६० किलोमीटर लांब नदी एकट्याने स्वच्छ करून दाखवली. सुरुवातीला सरकारी मदत मिळते का म्हणून प्रयत्न करून बघितले तिथे टाळाटाळ होत आहे असे दिसल्यावर गडी एकटा निघाला.
सहापेक्षा जास्त शहरांमधून जाणारी काली बीन नावाची एक नदी पंजाबात आहे. या नदीत रोजच्या रोज बराच कचरा टाकला जात असे. यामुळे या नदीचा एक अस्वच्छ नालाच झाला होता. आता मात्र नदीकिनारी सहल केली तरी हरकत नाही अशी या काली बीनची परिस्थिती आहे.
वर्ष २०००साली बाबा बलबीर सिंग सीचेवालनी ही नदी साफ करण्याचा संकल्प केला होता. सुरुवातीला त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन किनाऱ्यावर रस्ते तयार केले. लोकांना कचरा दुसरीकडे टाकण्यासाठी सांगण्यात आले. ज्या गटारींचे पाणी नदीत जात होते त्यांचा रस्ता वळविण्यात आला. अशाप्रकारे नदी साफ झाली.
ही नदी साफ झाल्यानंतर सरकारने त्यांच्या कार्याची बरीच प्रशंसा केली. एवढेच नाही, तर सरकारने त्यांच्या अनेक कामांत बाबा सीचेवाल यांना सामील करून घेतले. या त्यांच्या सगळ्या कामामुळे त्यांना इको बाबा असंही नाव पडले आहे.
देशभर सर्वांना इको बाबांबद्दल माहित नसलं तरी त्यांच्या कामाची दखल बऱ्याच ठिकाणी घेतली गेली आहे. यांचा कार्याचा उल्लेख एकदा देशाचे माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याकडून करण्यात आला होता. २०१७मध्ये राष्ट्रपती प्रणब मुखर्जींच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं आणि टाईम मॅगेझिनने त्यांना हिरो ऑफ इन्व्हायर्नमेंट हा किताब देऊन गौरवलं आहे.
आपल्याकडेही असं काही काम होण्याची नितांत गरज आहे. मुंबईतल्या मिठी नदीचा नाला झालाय आणि दरवर्षी पावसाळ्यात ती तुंबतेच. महाराष्ट्रात इतर ठिकाणीही अशा घाणीत अडकलेल्या नद्या असतील. नद्या साफ करणाऱ्या इकोबाबांची आणि त्यांना साथ देणाऱ्या सहकाऱ्यांची खरंच खूप गरज आहे.