computer

एक राजा, एक ब्रिटिश, आणि एक राजज्योतिषी -३

टेलर जेव्हा संस्थान सांभाळतो
१८२४ साली कारकून होण्यासाठी आलेला मेडोज टेलर पुढे विवाहबद्ध झाला.हैदराबाद संस्थानातील एक मोठ्या ब्रिटिश अधिकार्‍याच्या मुलीशी त्याचे लग्न झाले. यानंतर सुमारे तीन वर्षांची रजा घेऊन १८३६ च्या सुमारास पत्नीसह टेलर इंग्लंडला परतला. इंग्लंडला त्याचे वास्तव्य सुमारे तीन वर्षांचे झाले. याच दरम्यान टेलरने 'कन्फेशन्स ऑफ अ ठग' ही कादंबरी पूर्ण केली, आणि १८३९मध्ये ती प्रकाशित झाली. १८४१ च्या सुमारास पत्नीसह जेव्हा टेलर भारतात परतला तेव्हा आपल्याला निजाम परत नोकरीत घेईल का, याची शाश्वती त्याला वाटत नव्हती. पण एक कठीण काम टेलरची वाट पाहत होते. जनरल फ्रेझर यांनी टेलरला भेटायला बोलावले आणि शोरापूर संस्थानाचा कारभार स्वतंत्रपणे सांभाळण्याचे आव्हानात्मक काम आहे, ते करायला तयार आहेस का असा प्रश्न केला.

 

तेव्हा निजामाच्या राज्यात असलेले आणि आज कर्नाटकात असलेले शोरापूर संस्थान हे नायक राजांचे संस्थान होते. हे नायक संस्थानिक पिढ्यानपिढ्या शोरापूरचे राजे होते. तिथे त्यांचा किल्ला आणि राजवाडा होता. नायक राजे हे बेरड समाजाचे, बेडर शब्दातून बेरड बनला असा अपभ्रंश सांगितला जातो. ही नायक मंडळी शूर होती, आणि शोरापुरातील बेरड संस्थानातील काही लाख लोकांसाठी ते तारणहार होते. नायक राजांच्या पूर्वजांनी औरंगजेबालाही जेरीस आणले होते, आणि तीनदा स्वारी करूनही औरंगजेबाला शोरापूर जिंकता आले नव्हते अशी शोरापूरची पार्श्वभूमी होती. यातले काही नायक राजे विलासी, व्यसनी आणि उधळेही होते. काही लढाया व तहांतून त्यांनी निजामाला दरवर्षी खंडणी द्यायची असा वायदा होता.१८४१ मध्ये कृष्णाप्पा नायक हा राजा वारला.कृष्णाप्पाला तीन बायका होत्या. त्या तिघांची पंधरा अपत्येही होती. पण सगळ्या मुली होत्या. मुलगा नव्हता. पुढे कित्येक वर्षांनी कृष्णाप्पाला पुत्र झाला. त्याचे नाव वेंकटाप्पा ठेवण्यात आले. वेंकटाप्पा सात वर्षांचा असताना१८४१ साली कृष्णाप्पा वारला. वारस फक्त सात वर्षांचा असल्याने त्याच्या नावाने त्याची आई आणि कृष्णाप्पाची विधवा राणी बनली. टेलरने आत्मचरित्रात सर्वत्र तिचा उल्लेख राणी असाच केला आहे.ह्या राणीने इंग्रजांना आणि निजामाला हैराण केले होते. पतीच्या निधनानंतरही तिने उधळपट्टी चालू ठेवली होती. तिचे १२००० घोडदळ होते.शिवाय पायदळही मोठे होते.जी खंडणी द्यायची ती न दिल्याने मोठी येणी रक्कम साठली होती. हे ना ते कारण काढून व पैसा असूनही ती रक्कम देत नव्हती. त्या काळी शोरापूर संस्थानात जे ब्रिटिश अधिकारी होते ते ह्या राणीला कंटाळले होते. कंटाळून त्यांनी आपल्या कामाचा राजीनामा सादर केला होता. घोडदळ आणि पायदळ एकीकडे, पण शोरापूर संस्थानातील बेरड जमातीचे लोक दैनंदिन जीवनातही नंग्या तलवारी घेऊन वावरत असत शोरापूरच्या बेरड मंडळींचा उल्लेख टेलरने इंग्रजीत बैदूर असा केला आहे. शोरापुरातले वातावरण त्यामुळे बाहेरील माणसाला भयप्रद वाटेल असे होते.. त्या काळात ब्रिटिशांकडे फारसे सैन्य नव्हते. कारण अफगाणिस्तानातील लढाईसाठी त्यातले बरेच सैन्य बाहेर पाठवले गेले होते.
 

राणीचा तोरा
जनरल फ्रेझरने मेडोज टेलरला शोरापूर संस्थान स्वतंत्रपणे सांभाळशील का, असा जो प्रश्न विचारला होता त्याला ह्या सार्या पार्श्वभूमीची बाजू होती. राणीकडून खंडणी वसूल करण्याचेही काम त्यात अंतर्भूत होते. सात वर्षांच्या राजाला तो सज्ञान होईपर्यंत शिकवायचे, सांभाळायचे, आणि त्याचे संरक्षण करायचे हा भागही त्यात अंतर्भूत होता. टेलरने ते आव्हान स्वीकारले आणि मेडोज टेलर नावाचा नवा ब्रिटिश अधिकारी निजामाचा प्रतिनिधी म्हणून शोरापुरात आला. काही मंडळींनी बरेचदा महाराष्ट्रातील सोलापूर आणि कर्नाटकातील शोरापूर यात गोंधळ केलेला दिसतो. ही दोन्ही ठिकाणे वेगळी आहेत. शोरापूर संस्थानाला पूर्वी सूरपूर, शूरपूर म्हणूनही संबोधले गेले आहे. पण मेडोज टेलरच्या आत्मचरित्रात त्याने शोरापूर असाच उल्लेख केलेला दिसतो.


शोरापूरच्या त्या राणीमध्ये अनेक दोष होते. तिचा सर्वांत मोठा दोष म्हणजे ती व्यभिचारी होती. कृष्णाप्पा म्हणजे तिचा पती असतानाही तिच्या प्रियकराबरोबर तिचे उद्योग चालत असत. ते तिच्या नक्यालाही माहीत होते. शोरापूरमधल्या जनतेलाही त्याची कल्पना होती. ह्या प्रियकरावरही ती बराच पैसा उधळत असे. कृष्णाप्पाला भाऊ होते. त्यातला पिडनायक हा भाऊ राज्याच्या गादीचा हक्कदार होता. जर कृष्णाप्पाला मुलगा झाला नसता तर पिडनायकच राजा बनला असता. पण सात वर्षांचा वेंकटाप्पा असल्याने तो राजा बनू शकला नाही. अशा स्थितीत वेंकटाप्पाच्या जीवालाही दगाफटका होण्याची शक्यता होती. त्यातल्या त्यात एक गोष्ट चांगली होती. ती म्हणजे राणीचे वेंकटाप्पावर-आपल्या मुलावर निस्सीम प्रेम होते.

लेखक माधव शिरवळकर

सबस्क्राईब करा

* indicates required