computer

इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री आणि कृष्णा मेनन यांच्या विमानाप्रवासाचे किस्से!! एअर इंडियाच्या सुवर्णदिवसांच्या आठवणी!!

आपली राष्ट्रीय नागरी विमान सेवा कंपनी 'एअर इंडिया' विकण्याचा प्रयत्न सध्या जोरात चालू आहे. टाटा कंपनी वगळता ही तोट्यात चालणारी कंपनी कोणीही गळ्यात बांधून घ्यायला तयार नाही. एकेकाळी हीच कंपनी आपला मानबिंदू होता. एअर इंडियाच्या अगत्याचे प्रतिक म्हणजे झुकून स्वागत करणारा महाराजा ! या महाराजाची प्रतिकृती घराघरात पोहचली होती. विमानाने प्रवास करणे हे त्या काळचे स्वप्न असायचे, पण आता ते सगळे संपत आले आहे ! एअर इंडियाच्या त्या सोनेरी वर्षांची आठवण करून देणार्‍या बर्‍याच आठवणींना आता पुन्हा जाग येईल. जाहिरात क्षेत्रातील एक मान्यवर राम सेहगल यांची पहिली नोकरी एअर इंडियात फ्लाइट पर्सर म्हणू केली होती. या काळात अनेक व्हिआयपी प्रवाशांसोबत त्यांचा संपर्क आला. या मोजक्या आठवणी त्यांनी त्यांच्या आत्मचरीत्रात लिहिल्या आहेत. त्यापैकी मोजक्या काही आम्ही तुमच्या समोर मांडत आहोत. 

पंडित नेहरू -लाल बहादूर शास्त्री -इंदिरा गांधी हे सर्व पंतप्रधान नेहेमी इतर प्रवाशांसारखेच विमान प्रवास करायचे. व्हिआयपीजना वेगळे विमान देण्याची प्रथा तेव्हा नव्हती. आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती बघता आपल्यापुरते विमान वापरणे म्हणजे देशाचा पैसा वाया घालवणे, अशी ठाम श्रध्दा असलेल्या नेत्यांचे ते दिवस होते. 

नाम परिषदेसाठी इंदिरा गांधींना दिल्लीहून कैरोला जायचे होते. विमानाच्या फर्स्ट क्लास भागात त्यांची सीट बुक करण्यात आली होती. आपल्या देशाच्या पंतप्रधान आपली विमान सेवा वापरत आहेत, याचा विशेष आनंद सगळ्यांनाच वाटत होता. त्यावेळी एअर इंडियाचे अध्यक्ष जे आर डी टाटा होते. त्यांच्या आदेशानुसार पंतप्रधानांच्या आवडीनिवडीचा विचार करून खास मेनू -विशेषतः खास केक बनवण्यात आले होते. त्या ट्रेवर 'खास पंतप्रधानांसाठी' असे लेबल लावून ट्रे सज्ज ठेवण्यात आले होते.

इंदिरा गांधी स्थानापन्न झाल्यावर ताबडतोब झोपी गेल्या. प्रवास तीन चार तासाचाच होता. केबीन स्टाफ त्यांचा पाहुणचार करायला उत्सुक होता, पण इंदिराजी ज्या झोपल्या त्या प्रवासाच्या शेवटच्या तासातच उठल्या आणि टॉयलेटला गेल्या. आता त्या बाहेर आल्या की त्यांच्यासाठी बनवलेला खास केक सादर करण्याची स्टाफ्ला उत्सुकता होती. इंदिराजी सीटवर बसल्यावर फ्लाइट पर्सरने जाऊन त्या काही घेणार का असे विचारल्यावर त्या म्हणाल्या, ''धन्यवाद पण मला खरंच काही नको आहे. मला तहान लागली होती, पण मी टॉयलेटच्या आतल्या पिण्याच्या पाण्याच्या नळावरच पाणी पिऊन घेतले. धन्यवाद." असे म्हणून त्यांनी पुन्हा डोळे मिटून घेतले. इतकी साधी रहाणी त्या वेळच्या नेत्यांची होती..

पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींच्या निगर्वी आणि साधेपणाचा अनुभव राम सहगल यांनी त्यांच्या आठवणीत लिहिला आहे. शास्त्रीजी एका बैठकीसाठी परदेशी जात होते. स्थानापन्न झाल्यावर त्यांनी फ्लाइट पर्सरला बोलावून सांगीतले की, 'मी आता झोपणार आहे कैरो विमानतळ येण्यापूर्वी ४५ मिनिटे आधी तुम्ही मला जागे करा". इतकं बोलून शास्त्रीजी गाढ झोपले. तो पर्सर म्हणजे राम सहगलच होते. 

गोंधळ असा झाला की राम सहगल शास्त्रीजींना जागं करण्याचं विसरूनच गेले आणि जेव्हा पायलटने येत्या २० मिनिटात आपण कैरो विमानतळावर उतरू, अशी घोषणा केली तेव्हा राम सहगल हडबडूनच गेले. पंतप्रधानांना आपण वेळेत जागे केले नाही हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांच्या पोटात गोळाच उठला. जर हे एअर इंडियाच्या मॅनेजमेंटला कळले तर कदाचित तो नोकरीचा शेवटचा दिवस ठरणार होता. होय, त्यावेळी अत्यंत कडक शिस्तपालनासाठी एअर इंडिया प्रसिध्द होती. 

धैर्य एकवटून ते शास्त्रीजींजवळ गेले. सीटचा दिवा चालू केला. शास्त्रीजी जागे झाले. राम सहगल यांनी त्यांची माफी मागीतली आणि त्यांना म्हणाले "मला माफ करा, मी तुम्हाला आधीच उठवायला हवे होते, पण मी विसरलो. आता फक्त २० मिनिटातच आपण विमानतळावर उतरू". यावर शास्त्रीजींनी स्मितहास्य केले आणि म्हणाले "हरकत नाही. आता उतरल्यावर विमानतळावर मी २० मिनिटं कमी बोलेन इतकेच". राम सहगल यांचा जीव भांड्यात पडला. पण विचार करा एखादा गर्विष्ठ माणूस शास्त्रीजींच्या जागी असता तर ...? 

इंदिरा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या निगर्वी-साधेपणाचे दोन प्रसंग आपण वाचलेत पण सगळेच व्हिआयपी तसे नसतात.काही लोकांना आपल्या पदाचा, अधिकाराचा प्रचंड गर्व असतो. असा उध्दट व्हिआयपी जर विमानात असेल तर काय गोंधळ होतो याची पण एक कथा आपण वाचलीच पाहिजे. 

हा किस्सा आहे आपले भूतपूर्व संरक्षण मंत्री कृष्णा मेनन यांचा ! कृष्णा मेनन जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रीमंडळात संरक्षण मंत्री होते. ते नेहरूंच्या खास मर्जीतील मंत्री होते. हे त्यांना माहिती असल्याने कृष्ण मेनन त्यांचा तोरा मिरवत असत. हा अनुभव जवळजवळ सगळ्यांना होता. साहजिकच कृष्ण मेनन विमानाने प्रवास करत तेव्हा वातावरण तणावपूर्णच असायचे. नेहरू आजारी असताना त्यांच्या वतीने मेनन लंडनला गेले होते. त्यांचा  परतीचा प्रवास लंडन - मुंबई या रुटने होता. मुंबईला उतरून ते नंतर दिल्लीला जाणार होते. 

त्या फ्लाइटवर राम सहगल फ्लाइट पर्सर होते. निघतानाच एअर इंडियाच्या लंडनच्या स्टेशन मॅनेजरने त्यांना बोलावून खास निरोप दिला होता. कृष्ण मेनन अत्यंत चिडचीड करणारे प्रवासी आहेत. त्यांच्या सोबत जरा सांभाळूनच रहा. नशिबाने बहुतेक प्रवासात त्यांनी फारशा तक्रारी केल्या नाहीत, पण विमान मुबईला पोहचायला एकच तास बाकी असताना त्यांनी बोटाची टिचकी वाजवून पर्सरला बोलावले आणि सांगीतले, "पायलटला सांगा माझी नेहरूंसोबत तातडीची बैठक आहे, विमान मुंबईच्या ऐवजी दिल्लीला घेऊन चला".

राम सहगल त्यांचा निरोप देण्यासाठी वैमानिकाला भेटायला कॉकपीटमध्ये गेले आणि त्यांनी पायलटला निरोप दिला, "कृष्णा मेनन यांनी असे सांगीतले आहे की फ्लाइट डायव्हर्ट करून मुंबईच्या ऐवजी दिल्लीला चला. त्यांची नेहरूंसोबत तातडीची बैठक आहे". यावर पायलटने उत्तर दिले, "जर त्यांना दिल्लीला जायचे होते तर या फ्लाइटने ते का प्रवास करत आहेत?"

(कृष्णा मेनन आणि जवाहरलाल नेहरू)

आता आली का पंचाईत. वैमानिकाचा निरोप जसा आहे तसा मेनन यांना दिला असता तर तमाशाच झाला असता, म्हणून त्यांनी कृष्ण मेनन यांना सागीतले की पायलटला हवाई मार्गात असे अचानक बदल करण्याचे अधिकार नाहीत, त्यामुळे विमान मुंबईलाच जाईल. हे ऐकल्यावर मेनन भडकून म्हणाले, "मी तुम्हाला उपदेश करायला नाही सांगीतलं. जा परत जा आणि पायलटला सांगा की तो समजतो काय स्वतःला, मी संरक्षण मंत्री आहे, काढून टाकीन त्याला नोकरीवरून".

पायलटला हा निरोप दिल्यावर तो भडकून कॉकपीटमधून बाहेर यायला निघाला. काय व्हायचा राडा तो आमनेसामने झालाच असता, पण राम सहगल आणि को-पायलटने पायलटला समजावून शांत केले. पायलटने रागावून निरोप दिला की, "तुम्ही डिफेन्स मिनिस्टर असाल तरीही मी रुट बदलणार नाही. तुम्हाला दिल्लीला जाण्याची इतकी घाईच असेल, तर दिल्ली शक्य तितक्या जवळ आल्यावर मी दरवाजा उघडतो, तुम्हाला पॅराशूट देतो ते घ्या आणि मारा उडी !!"

हा निरोप ऐकल्यावर मेनन भयंकर संतापले पण करणार काय ? उरलेल्या तासात त्यांनी भयंकर बडबड आणि चिडचीड करून केबीन कर्मचार्‍यांना त्रस्त करून टाकलं. 
दिल्लीला पोहचल्यावर त्यांनी तक्रार केली. आपली मागणी अवाजवी असल्याची त्यांना कल्पना असल्याने त्यांनी वैमानिकाची तक्रार न करता फ्लाइट पर्सरची तक्रार केली. 
तर वाचकहो, व्हिआयपी पॅसेंजर असेही असतात!!

आणखी एका किश्शाची आठवण तुम्हाला करून देतो. माहाराष्ट्राच्या एका उपमुख्यमंत्र्याला दारु पिऊन धिंगाणा घातल्यामुळे त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आठवत नसेल तर थोडं गुगलून बघा. 

एअर इंडियाचे काहीच दिवस आता बाकी आहेत पण किस्से भरपूर आहेत, ते पण वाचू या सवडीने !!

सबस्क्राईब करा

* indicates required