computer

थट्टा नाही, पण खरंच एक देश विकायला काढला आहे. का आणि कुठे घडतंय हे?

शाळेत असताना मी पंतप्रधान झालो तर, मी मंगळावर गेलो तर.. असे निबंध लिहायला असायचे. तेव्हा "मी एखाद्या देशाचा मालक झालो तर" हा विषय दिला नसला तरी आता प्रत्यक्ष आयुष्यात ही संधी तुम्हांला मिळू शकते. कोणता आहे हा देश? आणि आपण कसे त्याचे मालक होणार अशा असंख्य प्रश्नांनी आता तुमच्या मनात गर्दी केली असेल. हा लेख वाचल्यानंतर त्याची उत्तरे तुम्हाला नक्कीच मिळतील.

बाजारात विकायला आलेल्या या देशाचे नाव आहे हट रिव्हर. तसे तर हे नाव पूर्वी कधी तुमच्या ऐकण्यात आले असण्याची शक्यता कमीच आहे. कारण ऑस्ट्रेलियाचाच एक भाग असणारा हा प्रदेश पूर्वी एक स्वतंत्र देश होता. म्हणजे त्या प्रदेशाच्या मालकांनी स्वतःपुरते तरी तसे घोषित केले होते. जागतिक पातळीवर कुणीही या प्रदेशाला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली नसली आणि ऑस्ट्रेलियानेसुद्धा त्यांचे स्वातंत्र्य मान्य केले नसले तरी, या देशाने स्वतःचे स्वतंत्र चलन आणि स्टँपदेखील अंमलात आणला होता. ऑस्ट्रेलियन डॉलर आणि हट रिव्हर डॉलर दोन्हींची किंमत समानच होती. गेल्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा देश पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियामध्ये विलीन झाला.

जगातला सर्वात लहान देश- व्हॅटिकन सिटी हा देशही पूर्वी इटलीचाच एक भूभाग होता पण व्हॅटिकन सिटीचे सार्वभौमत्व आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्य केले गेले आणि त्याला स्वतंत्र देशाचा दर्जा देण्यात आला. हट रिव्हर हा तर व्हॅटिकन सिटीपेक्षा ७० पट मोठा प्रदेश आहे, तरीही त्याचे सार्वभौमत्व कुणीच मान्य केले नाही. पन्नास वर्षानंतर या गेल्या वर्षी या देशाचे सार्वभौमत्व संपुष्टात आले.

ऑस्ट्रेलियातील नॉर्थम्पटनपासून उत्तरेस ४३ किमी अंतरावर वसलेला हा प्रदेश एकूण ६१०० हेक्टर परिसरात पसरलेला आहे. १९६० साली ऑस्ट्रेलियाने गुरे चरवण्यासाठी आणि शेती पिकवण्यासाठी म्हणून ही शेती करण्यायोग्य जमीन विकत घेतली होती. नंतर १९७० साली ऑस्ट्रेलियाने ही जमीन फक्त गव्हाच्या पिकासाठी राखीव राहील असा निर्णय घेतला. तेव्हा आपल्या जमिनीचे रक्षण करण्यासाठी आणि आपले हक्क सुरक्षित राहावे म्हणून जमिनीच्या मूळ मालकाने- लेनर्डने स्वतःची जमीन स्वतंत्र असल्याचे घोषित केले. अर्थात त्यांच्या या घोषणेची ऑस्ट्रेलियन सरकारने कसलीही दखल घेतली नाही. लेनर्डने तर स्वतःला प्रिन्स लेनर्ड ही पदवीही लावून घेतली. प्रिन्स लेनर्डने ऑस्ट्रेलियन सरकार विरोधात अनेकदा उठाव केला आहे. १९७० साली आपला प्रदेश स्वतंत्र असल्याचे जाहीर केल्यानंतर १९७७ मध्ये तर त्याने ऑस्ट्रेलियाविरोधात युद्ध जाहीर केले होते.

ऑस्ट्रेलियाने या प्रदेशातील कर आकारणीसाठी तगादा लावला तेव्हा कर भरण्याऐवजी यांनी ऑस्टेलियाविरुद्ध युद्ध पुकारले. अगदी थोडक्या दिवसातच हे युद्ध संपुष्टातही आले.
अशा प्रकारे एखाद्या मोठ्या देशातील एखाद्या प्रदेशाने जर स्वतःला स्वतंत्र घोषित केले तर त्याला मिनी नेशन म्हणून ओळखले जाते. तेव्हापासून हट रिव्हर मिनी नेशन म्हणून ओळखले जाऊ लागले. पर्यटकांना या मिनी नेशनचे खूपच जास्त कौतुक होते. दरवर्षी इथे पर्यटकांची चांगलीच गर्दी जमत असे. इथे येणाऱ्या पर्यटकांना या देशाचा स्वतंत्र व्हिजा आणि पासपोर्ट काढावा लागत असे. इथले स्थानिक पोस्ट ऑफिस, ऐतिहासिक सोसायटी, धार्मिक शिक्षण देणारी ठिकाणे, अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे इथे आहेत. अगदी आरामात वेळ घालवण्यासाठीही इथे विविध प्रकारच्या अॅक्टिव्हिटी रूम आहेत. शिवाय इथे सुंदर कलाकृतींचे एक संग्रहालय देखील आहे. या संग्रहालयात प्रिन्स लेनर्डचा भव्य पुतळाही उभारण्यात आला आहे.

परंतु गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीमुळे इतर देशांप्रमाणेच या देशातील व्यवहारही ठप्पच आहेत. याचा हट रिव्हर आर्थिकदृष्ट्या चांगलाच फटका बसला. प्रिन्स लेनर्डचेही २०१९मध्ये दु:खद निधन झाले. या सगळ्या कारणास्तव हा देश पुन्हा ऑस्ट्रेलियात विलीन करण्याचे घोषित केले.

पूर्वी सत्तर ऐंशी वर्षापूर्वी जसे हा प्रदेश ऑस्ट्रेलियाने विकत घेतला होता अगदी त्याचप्रमाणे पुन्हा एकदा शेती आणि कुरणांसाठी हा प्रदेश विकायला काढला आहे. फक्त यावेळी हा प्रदेश सलग टप्प्यात विकण्याऐवजी त्याचे तीनवेगवेगळे भाग करण्यात येणार आहेत. एल्डर्स रिअल इस्टेट डब्ल्यूए या रिअल इस्टेट डीलर्सच्या वतीने हा प्रदेश विकला जात आहे. या कंपनीचे एजंट क्रिस टिकले हिने ही माहिती दिली आहे. या कंपनीच्या साईटवर तुम्हाला या प्रदेशाची सगळी माहिती मिळेल. आता हा प्रदेश का विकला जात आहे आणि त्याची नेमकी किंमत किती याचा अजून तरी खुलासा केलेला नाही.

आता हा प्रदेश विकला जाणार की ऑस्ट्रेलियन सरकार त्यावर काही रोख लावणार? याबाबत स्पष्टता नसली तरी, एक संपूर्ण देश विकत घेण्याची इतकी चांगली संधी कदाचित पुन्हा मिळणार नाही.

- मेघश्री श्रेष्ठी

 

सबस्क्राईब करा

* indicates required