पार्ल्यात होतोय मिसळ महोत्सव...मुंबईकरांनो तयार रहा !!

कडधान्याची उसळ, फरसाण, वरती चिरलेला कांदा, पेरलेली कोथिंबीर, लिंबाची फोड आणि त्यावर झणझणीत तर्री. या वर्णनावरून काही आठवलं का भाऊ ? भाऊ ही आपली मिसळ आहे. मिसळ म्हटलं तरी तोंडाला पाणी सुटतं राव.

संपूर्ण महाराष्ट्रात मिसळ आवडीने खाल्ली जाते. मुंबई पुण्यात तर ती प्रसिद्ध आहेच पण नाशिक, कोल्हापूर, नागपूर अश्या महत्वाच्या ठिकाणी सुद्धा मिसळ मिळते. मिसळ ही साधारणपणे एकाच पद्धतीने तयार होते पण शहर बदलतात तशी त्याची लज्जत बदलत जाते. त्यामुळेच महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगळी मिसळ चाखायला मिळेल.

मंडळी, संपूर्ण महाराष्ट्र फिरून प्रेत्येक जिल्ह्यातील मिसळ खाणे आपल्या काही शक्य नाही. पण लोकमान्य सेवा संघाने हे शक्य करून दाखवलंय राव. विले पार्ले मध्ये होणाऱ्या मिसळ महोत्सवात ठाणे, पुणे, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद इत्यादी ठिकाणची मिसळ एकाच ठिकाणी चाखायची संधी आपल्याला मिळणार आहे. या महोत्सवात एकूण १२ अफलातून मिसळी सामील असणार आहेत.

९ आणि १० डिसेंबर रोजी हा मिसळ महोत्सव होणार आहे.

स्रोत

ठाण्यातील ‘मामलेदार’, पुण्यातील ‘काटा किर्र’,  कोल्हापूरची ‘फडतरे’,  नाशिकची‘भगवती’,  मुंबईतील ‘आस्वाद’, लोणावळ्याची ‘मनशक्ती’ इत्यादी शहरात मिसळ प्रसिद्ध आहे. कधी ब्रेड सोबत तर कधी पावा सोबत किंवा नुसतीच मिसळ खाल्ली जाते. राव कशीही खाल्ली तरी मिसळ प्रेमात पाडते हे नक्की.

तर मुंबईकरांनो तयार व्हा मिसळ महोत्सवासाठी. ९ आणि १० तारीख लक्षात ठेवा.

ठिकाण : स्वातंत्र्यवीर सावरकर पटांगण, लोकमान्य सेवा संघ, विले पार्ले

सबस्क्राईब करा

* indicates required