माऊंट एव्हरेस्टवर जाणारे इतके गिर्यारोहक का मरत आहेत ? ही आहेत त्याची काही कारणं...

पूर्वी लोक शांततेच्या शोधात हिमालयात जायचे. आजही लोक गंमतीत म्हणतात, “मी सगळं सोडून हिमालयात जाणार आहे”. पण आता हिमालय हा काही चांगला पर्याय राहिलेला नाही. अहो, का म्हणून काय विचारताय? माउंट एव्हरेस्टवर लोकांनी एवढी गर्दी केली आहे की गर्दीमुळे ४ जणांना जीव गमवावा लागला आहे. याखेरीज मोठा प्रश्न हा स्वच्छतेचा आहे. एकट्या एव्हरेस्ट भागातून तब्बल १० टन कचरा काढण्यात आलाय.
नक्की काय घडलंय ?

गेल्या आठवड्यात माउंट एव्हरेस्टवर ट्रॅफिक जाम झाला होता. एकावेळी जवळजवळ २०० लोक एव्हरेस्ट सर करायला निघाले होते. याची काही लक्षात घेण्यासारखी कारणं आहेत. सध्या माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा मौसम आहे म्हणून मोठ्या प्रमाणावर लोक जमले होते. दुसरी गोष्ट. एव्हरेस्टवरचं हवामान बिघडण्यापूर्वी चढाई पूर्ण करण्याची सगळ्यांना घाई झाली होती. याच कारणाने सगळे एकदमच एव्हरेस्ट सर करायला निघाले. आता याला दुसरी एक बाजू आहे. तिथलं तापमान, ऑक्सिजनची कमतरता बघता लोकांची गर्दी धोकादायक ठरू शकते. नेमकं हेच घडलंही.
मृतांमध्ये मुंबईच्या ५५ वर्षाच्या गिर्यारोहक अंजली कुलकर्णी आणि अकलूजचे निहाल बागवान हे दोघं होते. माउंट एव्हरेस्ट सर करून खाली येत असताना ट्राफिकमुळे त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यास उशीर झाला. या मधल्या काळात कमी दबावामुळे त्यांच्या जीवावर बेतलं. दोघांनाही प्राण गमवावा लागला. अंजली कुलकर्णी या गेल्या अनेक वर्षांपासून माउंट एव्हरेस्ट सर करण्याचं स्वप्न बाळगून होत्या. स्वप्न पूर्ण झालं, पण त्यांचा जीव गेला.
(अंजली कुलकर्णी)
मंडळी, याच दरम्यान कॅनेडियन दिग्दर्शक ‘एलिया सेकली’ माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी आले होते. त्यांना ४ अरब गिर्यारोहक स्त्रियांवर डॉक्युमेंटरी बनवायची होती. खरं तर ते यापूर्वी ३ वेळा एव्हरेस्टला भेट देऊन गेले आहेत, पण यावेळी त्यांनी असा निर्णय घेतला की या पुढे ते कधीही माउंट एव्हरेस्टचं तोंड पाहणार नाहीत. याचं कारण तिथली गर्दी आणि मृत्यू.
मंडळी, वर्षभरात माउंट एव्हरेस्टवर १० ते १२ लोकांचा मृत्यू झाला आहे. यातले चार तर मागच्याच आठवड्यातले. ‘एलिया सेकली’ यांनी जे बघितलं ते भयावह होतं. त्यांच्या समोरच गिर्यारोहकांना स्थानिक शेरपांनी खाली आणलं. त्यातला एक मेला होता तर दुसरा भ्रमिष्टासारखा ओरडत होता.
पुढे जाऊन हे चित्र आणखी भयानक झालं. काही गिर्यारोहकांचे मृतदेह रस्त्यातच पडून होते. इतर गिर्यारोहकांना त्यांच्या मृतदेहांना ओलांडून जावं लागत होतं. जे जिवंत होते ते मुंगीच्या वेगाने पुढे सरकत होते, कारण शिखरावरची गर्दी रिकामी होत नव्हती. ज्यांचं माउंट एव्हरेस्ट पाहण्याचं स्वप्न आहे त्यांच्यासाठी हे नक्कीच धक्कादायक ठरू शकतं.
या दुर्घटनेला कारणीभूत असलेली आणखी एक गोष्ट आहे. नेपाळ सरकारने या महिन्यात कधी नाही ते तब्बल ३८१ लोकांना माउंट एव्हरेस्ट सर करण्याची परवानगी दिली. हा आकडा आजवरचा रेकॉर्ड ब्रेक करणारा होता. या उलट गेल्यावर्षी संपूर्ण वर्षभराचा आकडा ५६३ एवढा होता. एकदम एवढ्या लोकांना परवानगी का दिली हा प्रश्न उरतोच.
(गिर्यारोहकांचे मृतदेह)
मंडळी, एक निरीक्षण असं सांगतं की लोक माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी फिट नसले तरी उत्साहाच्या भरात एव्हरेस्ट गाठतात. त्यांना मग तिथल्या जीवघेण्या हवामानाचा सामना करावा लागतो. कुठेतरी दोनचार मॅरॅथॉन धावल्या, की लोकांना वाटतं की आपण आता माऊंट एव्हरेस्ट चढू शकतो. याखेरीज पैसे हा दुसरा भाग. हल्ली जास्तीत जास्त पैसे देऊन सुरक्षितपणे एव्हरेस्ट गाठता येतं. तुम्ही किती पैसे देऊ शकता त्यावर तुम्हांला कमी-अधिक सुरक्षा असलेलं पॅकेज मिळतं. माउंट एव्हरेस्टवर जाणं कमी खर्चिक नाहीय, त्यामुळे पेलवत नसलं तरी एकदा तिथं पोचलोय, आयुष्यात पुन्हा कधी हे करता येणार नाही अशा विचारातून लोक शरीराने दिलेल्या संदेशांकडे दुर्लक्ष करतात आणि जीव गमावतात.
मंडळी, गर्दी, लोकांचे मृत्यू या सोबत आणखी एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. तो म्हणजे हिमालयातली स्वच्छता. हिमालयातला कचरा हा एका स्वतंत्र संशोधनाचा भाग बनू शकतो. ही परिस्थिती किती गंभीर आहे हे या फोटोवरून तुमच्या लक्षात येईल. हा एव्हरेस्ट भागातून काढण्यात आलेला तब्बल १० टन कचरा आहे.
तर मंडळी, तुमचं एव्हरेस्ट सर करण्याचं स्वप्न असेल तर त्या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवण्यापूर्वी या गोष्टी नक्कीच लक्षात घ्या.
आणखी वाचा :
या भारतीय गणितज्ञाने एव्हरेस्ट ला मिळवून दिला सर्वोच्च शिखराचा बहुमान.