computer

कोरोना mRNA लस पद्धत: ही कशी काम करते? या पद्धतीने केमोथेरपीशिवाय कॅन्सर ही बरा होऊ शकतो?

गेले एक वर्ष संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोव्हीड-१९ ची लस आता १६ जानेवारीपासून भारतात वापरली जाणार आहे.  थोडा दिलासा मिळत असतानाच आता या विषाणूने नवे रूप धारण केले आहे. ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेत या कोरोनाच्या नव्या प्रारुपाने पुन्हा धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. त्यामुळे जरा कुठे आशादायी वातावरण निर्माण होत असतानाच अचानक पुन्हा निराशेचे मळभ दाटून आले आहे. 

असे असले तरी या सगळ्या परिस्थितीतही एक आशेचा किरण डोकावतो आहे. कोव्हीड-१९ च्या लसीचा वापर करून भविष्यात कॅन्सर सारखा भयानक आजारही बरा होऊ शकेल असे शास्त्रज्ञांना वाटते आहे. दरवर्षी जगभरात फक्त कॅन्सरमुळे दगावणाऱ्यांची संख्या एक कोटीपेक्षाही अधिक आहे.

सध्या कोव्हीड वरती एक एमआरएनए (mRNA) लस बनवली जात आहे. ही लस जर यशस्वी ठरली तर, अनेक दुर्धर आजारांवर विजय मिळवता येईल. जर्मनीच्या बायो एन टेक एसइ (BioN tech SE) आणि अमेरिकेची फायझर (Pfizer)  या लसीकडूनही खूप अपेक्षा आहेत. कर्ववॅस एनव्ही ही लस देखील जर्मनीमध्येच बनवली जात आहे. 

सामान्य पद्धतीद्वारे बनवलेली लस जेव्हा शरीरात टोचली जाते तेव्हा ती लस फक्त विषाणूंना निष्क्रिय  किंवा अशक्त बनवतात. त्या विषाणू विरोधात आपल्या शरीतातील रोग प्रतिकारशक्ती वाढवतात. यामुळे पुढे कधीही त्याच विषाणूने आपल्या शरीरात प्रवेश केला तरी त्याविरोधात लढण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती सक्षम झालेली असते. अशा प्रकारच्या लसी बनवण्यासाठी अनेक प्रकारची रसायने आणि पेशी संवर्धन करावे लागते. यासाठी वेळही खूप लागतो, त्यामुळे कदाचित अशा प्रकारच्या लसी बाधित होण्याचाही संभव असतो.

mRNA लसी बाबतीत असे कुठलेही अडथळे निर्माण होत नाहीत.  या प्रकारची लस शरीरालाच आवश्यक ती प्रथिने बनवण्याच्या सूचना देते. यामुळे विषाणूचा जे बाहेरील प्रथिनांचे आवरण असते ते नष्ट होते. त्या विशिष्ट विषाणू विरोधातील प्रतिजैविके मग शरीरातच तयार होतात. mRNA प्रकारच्या लसीचे हेच एक खास आश्वासक वैशिष्ट्य आहे. ही लस आपल्या शरीरातील पेशींना आवश्यक ती प्रथिने बनवण्याची सूचना देऊ शकते. त्यामुळे कोव्हीड-१९ व्यतिरिक्त इतरही आजारांवर याच प्रकारे मात करता येऊ शकते. कोणत्याही रोगा विरुद्ध लढण्यासाठी अशा प्रकारे शरीरातच प्रथिनांची निर्मिती होऊ शकते. 

mRNA आपल्या जनुकीय भावंडाकडून म्हणजेच DNA कडून सूचना स्वीकारते. त्याची जनुकीय रचना कॉपी करते आणि ती आपल्या पेशीतील जीवद्र्व्यात पोहोचवली जाते. नंतर पेशीतील रायबोजोम ही माहिती वापरून प्रथिनांची निर्मिती करतात. आपल्या किंवा कुठल्याही सजीवातील पेशीमध्ये हे कार्य अखंडित सुरु असते. 

परंतु या लस बनवणाऱ्या कंपन्या या सगळ्या लांबलचक प्रक्रियेला फाटे देतात. ते आधी ठरवतात की त्यांना कोणत्या प्रकारचे प्रथिन हवे आहे. उदा. (कोरोना) विषाणूच्या बाहेरील काटेरी आवरण. मग अ‍ॅमिनो असिडच्या कुठल्या क्रमवारीतून हे प्रथिन तयार होईल हे शोधतात. मग त्यावरून mRNAला नेमक्या कुठल्या सूचना मिळायला हव्यात त्या शोधल्या जातात. ही प्रक्रिया नैसर्गिक प्रक्रियेच्या तुलनेत थोडीशी जलद आहे. हा वेग वाढल्यानेच सध्या लस निर्मिती करण्याचा वेगही वाढला आहे. ही प्रक्रिया जनुकीय दृष्ट्यादेखील सुरक्षित आहे. यामुळे आपल्या DNAमध्ये कुठलेही बदल होत नाहीत. 

संशोधकांना असे वाटत आले आहे की ही पद्धत वापरून आपण कोणताही आजार बरा करू शकतो. परंतु कोणतेही संशोधन करण्यासाठी प्रचंड पैसा, वेळ आणि संयम हवाच. कारण हे वाचायला तितके सोपे वाटत असले तरी प्रत्यक्ष कृतीत उतरवणे मात्र तितकेसे सोपे नाही. 

mRNAच्या पद्धतीनुसार बनवलेली लस सुरक्षित आणि जास्त प्रभावी वाटत असली तरी या पद्धतीने बनवलेल्या लसीचा जेव्हा जेव्हा प्राण्यांवर प्रयोग करण्यात आला तेव्हा तेव्हा त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. म्हणूनच हे संशोधन आजवर यशस्वी झाले नाही. 

यावर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञ कॅटालीन करीको यांना तर खूपच अडचणींना तोंड द्यावे लागले. त्यांना स्वतःला कॅन्सर झाला होता, त्यातून बऱ्या झाल्यावरही, सगळ्या अडथळ्यांना तोंड देत देत त्या mRNA पद्धतीने बनवलेली लस यशस्वी कशी होईल यावरच विचार करत होत्या. नंतर २००० साली त्या आणि त्याच्या सहकाऱ्यांना असे जाणवले की RNAमधील एक कडी जर तोडली, तर याचा जो दुष्परिणाम दिसतो तो आटोक्यात आणता येऊ शकतो. मग पुढच्या वेळी जेव्हा त्यांनी हा पद्धतीने लस बनवून तिचे प्रयोग उंदरावर केले तेव्हा ते उंदीर जिवंत राहिले होते. म्हणजेच त्यांचा अंदाज खरा ठरला होता.

कॅठालीन करीकोच्या या संशोधनाची माहिती जेव्हा उगूर सहीन आणि ओझ्लेम टूर्सी यांना मिळाली तेव्हा त्यांना कॅन्सरवर हीच पद्धत परिणाम कारक ठरेल असे वाटले. हे दोघेही कर्करोग विशेषज्ञ आहेत. कर्करोगावर इलाज करत असताना त्यांच्या असे लक्षात आले की कर्करोगाची गाठ काढून टाकण्यासाठी वापरली जाणारी रेडीएशन थेरपी ही खूप खर्चिक आणि रुग्णांच्या दृष्टीने घातक आहे. कारण एक गाठ नष्ट करण्यासाठी त्या भोवतीच्या हजारो उपयोगी ठरतील अशा चांगल्या पेशीही नष्ट होत आहेत. 

शरीरातील रोगप्रतिकार शक्तीला जर ही गाठ म्हणजे बाहेरील विषाणूचे अतिक्रमण आहे आणि ती आपली शत्रू आहे अशा सूचना दिल्या तर ती गाठ नष्ट करण्यासाठी शरीर आपसूकच प्रतिजैविक तयार करेल अशी एक कल्पना सहीन आणि टूर्सीच्या डोक्यात चमकली. असे झाले तर रुग्णाची नैसर्गिक प्रतिकारशक्तीच त्या गाठीला नष्ट करू शकेल. ज्यामुळे रेडीएशन थेरपी सारखे महागडे आणि दुष्परिणाम करणारे उपचार घेण्याचीही गरज राहणार नाही. त्यासाठी आवश्यक तो अँटिजेन शोधा, त्याचा कोड बनवा आणि तो उलटा करून त्यापद्धतीने पेशींना सूचना देण्याचा कोड विकसित करावा लागेल. आपला शत्रू कोण आहे हे फक्त रोगप्रतिकार शक्तीने ओळखले की पुढचे काम रोगप्रतिकार शक्तीवरच सोपवा.

सध्या या पद्धतीने आपण कुठकुठल्या रोगावर लस बनवू शकतो याची चाचपणी मॉडर्ना आणि बायोएनटेक कडून केली जात आहे. स्तनाचा कर्करोग, प्रोस्टेट ग्रंथींचा कर्करोग, त्वचेचा कर्करोग, स्वादुपिंडाचा कर्करोग, मेंदूचा कर्करोग, फुफ्फुस आणि इतर प्रकारच्या कर्करोगावरही याच पद्धतीने उपचार करता येतील का यासाठी त्यांचे प्रयोग सुरु आहेत. त्यांच्या प्रयोगांचे सकारात्मक परिणामही दिसून येत आहेत. 

असे असले तरी यामध्ये वेगाने प्रगती होत असल्याचे दिसत नाही. कारण यासाठी आर्थिक निधी अपुरा पडत आहे. शिवाय, ही लस पूर्ण विकसित होऊन तिचे प्रयोग होण्यासाठीही बराच वेळ जाऊ शकतो. कोव्हीड-१९ मुळे तरी ही प्रक्रिया वेग घेईल अशी  आशा वाटते आहे. या जागतिक महामारीमुळे तरी mRNA लसीवर बरेच संशोधन होत आहे. करीको यांना या संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळेल अशीही चर्चा सुरु आहे. निदान कोव्हीड-१९ च्या गडबड घाईत तरी या संशोधनाला चालना देण्यासाठी गुंतवणूकदार तयार होतील, लसीचे नियमन करणारे आणि धोरणकर्ते उत्साहाने आणि सकारात्मकतेने या संशोधनाकडे पाहतील अशी आशा आहे. 

या संशोधनाला जर पुरेशी गती मिळाली तर, आरोग्याच्या क्षेत्रात निश्चितच एक आशादायी चित्र दिसेल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही.

 

लेखिका: मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required