computer

मुंबईतल्या मस्त आणि चविष्ट वडापावची यादी ट्विटरवर पोस्ट होत आहे. तुमचा आवडता वडापाव आहे का इथे पाहा आणि तुमचीही यादी द्या!!

मुंबई आणि वडापाव हे समीकरण तसे जगप्रसिद्ध आहे. वडापाव आणि मुंबई या नात्याबद्दल वेगळे काही सांगावे याची काहीही गरज नाही इतके ते नाते घट्ट आहे. मुंबईत राहणाऱ्या लोकांची वडापाव कुठून खायचा याचीही वेगवेगळी आवड आहे. यातून मात्र मुंबईत भन्नाट वडापाव कुठे मिळतो याबद्दल अनेकांना भारी माहिती मिळते.

ट्विटरवर एका थ्रेडवर मुंबईतील विविध भागांतील वडापावची चव चाखलेल्या लोकांनी आपले आवडते वडापाव कुठे मिळतात याची यादीच सादर केलीय.आता बोभाटाच्या वाचकांपुढे ही यादी घेऊन येणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो.

यात आलेख नावाच्या एकाने शिवडी भट्टीचा वडापाव सुचवला आहे. अनुजा पोंक्षे यांनी दिलेल्या यादीत ही टिळकनगर, चेंबूरचा अनिल वडापाव, दादरच्या पोर्तुगीज चर्च मागच्या आगार बाजार बस स्टॉपच्या बाहेरील आणि फोर्टचा सिटीओचा वडापाव हे सर्व स्थान मिळवून आहेत.

कौशल कारखानीस यांनी तर मोठी यादीच दिली आहे. यात मरीन ड्राइव्ह आणि चौपाटी, कार्टर रोड आणि बँडस्टँड, ताज हॉटेल व्हाया कुलाबा फुटपाथ ते गेटवे दरम्यान, दादर फ्लॉवर मार्केटचा सकाळचा वडापाव अशी भलीमोठी यादी दिली आहे, तर धवल कुलकर्णी कीर्ती कॉलेज समोरील अशोक वडापाव एकदा ट्राय करण्यास सुचवतात.

निरंजन राजाध्यक्ष समस्त पार्लेकरांच्या वतीने टिळक विद्यालय समोरील बाबू वडापाव बद्दल सांगतात. तसेच नेहरू रोडवरील विदर्भ वडापाव देखील अफलातून असल्याचे मत त्यांनी नोंदवले आहे. तोमल दत्तात्रय नवी मुंबईतील घणसोली रेल्वे स्टेशन बाहेर मिळणाऱ्या वडापाव खाल्ल्याशिवाय आपण रेल्वेत बसत नसू असे सांगतात.

लाविश हे भांडुपचा वडापाव बेस्ट असल्याचे सांगतात. निशा संपत या चेंबूरमधील लोकांसाठी माहुल रोडवरील अकबर अली सिग्नलजवळचा वडापाव सुचवतात. चेंबूर येथीलच पोस्ट ऑफिसजवळील वडापाव भन्नाट असल्याचे एसआर नावाच्या ट्विटर हँडलवरून सांगण्यात आले आहे.

 

तर या सर्व वडापाव स्टॉल्सची यादी सेव्ह करून ठेवा. गुगल मॅप वापर, यासर्व ठिकाणांना भेट द्या आणि पोटोबा तृप्त करा!! तुम्हाला जर अजून कुठले वडापाव आवडत असतील तर इतरांना पण तिथे भेट देता यावी यासाठी कॉमेंटबॉक्समध्ये तुमचीही यादी सांगा...

सबस्क्राईब करा

* indicates required