computer

जगभर गाजत असलेलं मोनोलीथ प्रकरण काय आहे?...सगळी माहिती फक्त एका क्लिकवर!!

१९६८ मध्ये स्टॅनली कुब्रिक ह्यांचा Space Odyssey नावाचा एक सिनेमा प्रदर्शित आला होता. काल्पनिक वैज्ञानिक गोष्टीवर आधारित असलेला हा सिनेमा खूप चर्चेचा विषय ठरला होता. त्या चित्रपटाचे प्रमुख आकर्षण ठरले होते ते म्हणजे त्या सिनेमात दाखवलेले Monolith. हे Monolith मानवी उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर कसे अद्भुतरित्या हातभार लावते हे ह्या सिनेमात दाखवलेले आहे. गेल्या आठवड्यापासून तुम्हीही जगात कुठेकुठे मोनोलिथ सापडल्याच्या आणि हरवल्याच्या बातम्या वाचत असाल. म्हणूनच हे काय प्रकरण आहे याची इत्यंभूत माहिती आम्ही बोभाटाच्या वाचकांसाठी घेऊन आलो आहोत.

तर Monolith म्हणजे काय?

मोनोलिथ म्हणजे एकाच विशाल दगड, खडक किंवा धातूपासून बनवलेली, एकसंध अशी एखादी वस्तू. मग ती आकाराने अतिशय भव्य किंवा लहानही असू शकते. आपल्याकडे एकाच शिळेत खोदलेली शिल्पे असतात, त्यांनाही आपण मोनोलिथ म्हणू शकतो. एखाद्या विशाल दगडाची वर्षानुवर्षे झीज होऊन काही मोनोलिथ नैसर्गिकरित्या तयार होतात. तर काही मानवनिर्मितदेखील असतात.

तर सांगायचा विषय हा आहे की १८ नोव्हेंबर २०२० रोजी अमेरिकेतील युटा राज्यात एक मोनोलिथ आढळला होता. आकाराने त्रिकोणी, साधारण १० ते १२ फूट उंचीचा हा धातूचा मोनोलिथ होता. अमेरिकन वनविभागाचे स्थानिक अधिकारी हेलिकॉप्टरमधून नेहमीप्रमाणे निरीक्षण करत होते. तेव्हा लाल रंगाच्या मोठमोठ्या खडकांच्या बरोबर मध्ये त्यांना हा रहस्यमय मोनोलिथ दिसून आला. तो तिथे खडकांच्या मधोमध कसा आला? कोणी आणला? काहीच माहिती उपलब्ध नव्हती आणि आजही ती माहिती उपलब्ध नाहीये. मग काय, या मोनोलिथविषयी बऱ्याच लोकांनी बरेच वेगवेगळे सिद्धांत आणि आपापल्या थेअर्‍या मांडल्या.

युटामधल्या पब्लिक सेफ्टी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तिथे आढळून आलेला मोनोलिथ त्याजागी मागच्या ४० ते ५० वर्षांपासून आहे. तर काही अधिकाऱ्यांच्यामते तो मोनोलिथ तिथे ऑगस्ट २०१५ किंवा २०१६ पासून तिथेच आहे. तपासादरम्यान उपग्रहातून घेतलेल्या फोटोंमध्येही हे सिद्ध झाले आहे. तर काही नेटकऱ्यांच्यामते तो मोनोलिथ एखाद्या कलाकाराने बनवलेले असावे आणि सुरक्षित जागी ठेवण्यासाठी म्हणून तिथे मोठमोठ्या खडकांच्यामध्ये ठेवलेले असावे. अनेकांनी परग्रहवासीयांच्या अस्तित्वाचे हे पुरावे आहेत असेही म्हटले आहे. सोशल मिडीयावर अशा चर्चांचे अक्षरशः उधान आले होते.

मोनोलिथ पाहायला लोक गर्दी करतील म्हणून अधिकाऱ्यांनी त्या जागेविषयी कोणतीही माहिती जाहिर केली नाही. तरीही काही हौशी आणि साहसी लोकांनी त्या जागेचा आणि मोनोलिथचा पत्ता गुगल अर्थच्या मदतीने शोधून काढलाच. तिथे जाऊन त्या मोनोलिथसोबत आणि काहींनी तर त्यावर बसून फोटो काढून सोशल मीडियावर टाकले. पण कोणीही त्या वस्तूवर हक्क दाखवायला पुढे आले नाही.

(युटा येथील मोनोलिथ)

तर पुढे एका आठवड्यानंतर हा मोनोलिथ युटा इथून आश्चर्यकारकरित्या नाहीसा झाला. असाच हवेत विरल्यासारखा तो नाहीसा झाला आणि नेमका त्याचवेळी म्हणजे २७ नोव्हेंबर रोजी जवळजवळ सारखाच मोनोलिथ रोमेनियामध्ये आढळून आला. रोमेनियाधला मोनोलिथ युटामध्ये आढळून आलेल्या मोनोलिथपेक्षा अगदीच थोडा वेगळा दिसत होता. रोमानियामधल्या मोनोलिथवर काही पॅटर्न दिसून येताहेत. हा मोनोलिथ पेट्रोडावा डॅसियन ह्या प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ल्यापासून काही अंतरावर आढळून आला होता.

एका ठिकाणावरून एक मोनोलिथ नाहीसा होतो काय आणि नेमका त्याचवेळी तो दुसऱ्या जागी आढळून येतो काय.. यामुळे इंटरनेट आणि सोशल मिडीयावर चर्चांचा महापूर आलाय. आता अजून काही नवीन सिद्धांतांनी जन्म घेतला आहे. त्यापैकी काहींचं म्हणणं आपण पाहूया.

(रोमानोया येथील मोनोलिथ)

1. परग्रहवासियांनीच हा मोनोलिथ आणला असणार. बऱ्याच वर्षांपासून दुसऱ्या ग्रहांवरचे लोक पृथ्वीला अशी अधूनमधून भेट देत असतात.

२. काहींच्या मते १९६८ मध्ये आलेल्या Space Odessey सिनेमाच्या एखाद्या चाहत्याने सिनेमाच्या प्रेमापोटीच असे केलेले असावे.

३. काहींच्या मते रोमेनियामध्ये आढळून आलेला मोनोलिथ हा तिथल्या एका वेल्डरने केलेल्या अर्धवट कामाचा एक भाग आहे.

४. काहींच्या मध्ये अमेरिकेचे दिवंगत कलाकार जॉन मॅकक्र्याकन ह्यांनीच युटामध्ये सापडलेले मोनोलिथ बनवले आहे. त्याचं काय आहे ना, मॅनहॅटन येथील डेविड झ्विरनर गॅलरीत अगदी हुबेहूब दिसणारा एक मोनोलिथ प्रदर्शनास ठेवलेला आहे. हा स्टेलनेस स्टीलचा मोनोलिथ जॉन ह्यांनीच २०११ मध्ये बनवलेला होता. युटामध्ये अगदी तसाच मोनोलिथ सापडल्यावर जॉन ह्यांच्या मुलाची मुलाखत प्रसिद्ध झाली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, "त्यांचे वडील म्हणजे जॉन परग्रहवासीयांच्या अस्तित्वाबाबत खूप सकारात्मक होते आणि त्यांचा असा विश्वास होता की परग्रहवासी नक्कीच त्यांच्यासोबत कधीतरी संभाषण करण्याचा प्रयत्न करतील." त्यांच्या ह्या मुलाखतीनंतरही लोक बऱ्याच संभावना आणि शक्यता इंटरनेटवर मांडत होते.

(जॉन मॅकक्र्याकन यांनी तयार केलेला मोनोलिथ)

हे सर्व चर्चेचे सत्र अखंडित चालू असताना पुन्हा एक बातमी आली की रोमेनियामधूनही हा मोनोलिथ नाहीसा झाला आहे. हा मोनोलिथ मंगळवारी म्हणजे २ डिसेंबर २०२० रोजी नाहीसा झाला आहे.

हा मोनोलिथदेखील आश्चर्यकारकरित्या नाहीसा झाल्यामुळे नक्कीच परग्रहवासीयांच्या अस्तिवाला आणि पृथ्वीवरील त्यांच्या भेटींच्या पुराव्याबाबतच्या पुन्हा एकदा नव्याने बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. पण आता शेवटी ह्या सर्व चालू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देण्याची वेळ आलीये. कारण एका व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत युटामधला मोनोलिथ चारजण काढून नेत आहेत असं दिसतेय. तर चला जाणून घेऊयात या व्हिडीओमागची सत्यता!!

रॉस बर्नार्ड हे एक फोटोग्राफर आहेत. युटामध्ये आढळून आलेल्या मोनोलिथची बातमी येताच तो पाहण्यासाठी आपल्या काही मित्रांसोबत ते गेले होते. सहा तासांचा प्रवास करून ते तिथे पोहोचले तेव्हा त्यांनी मोनोलिथचे बरेच फोटो काढले. तेवढ्यात तिथे आणखी चार लोकांचा ग्रुप आला आणि त्यांनी मोनोलिथ बाहेर काढण्याचा खटाटोप सुरु केला. त्यांनी तो मोनोलिथ खणून बाहेर काढला आणि तो मोठया ढकलगाडीमधून घेऊन ते निघून ही गेले. रॉसने त्याच्या इन्स्टाग्रामवर ही सर्व माहिती छायाचित्रांसह शेअर केली आहे. फॉक्स-13 ह्या वृत्तवाहिनीसोबत बोलताना रॉस यांनी सांगितले की, "दुसऱ्या दिवशी आमच्या परतीच्या रस्त्यावर आम्हाला प्रचंड ट्रॅफिक मिळाले. चौकशी केली तर कळले की हे सर्व लोक मोनोलिथ पाहायला आलेले आहेत. तेव्हा मात्र काल रात्री केलेल्या कामासाठी त्या चार युवकांचं कौतुक करावं वाटत होतं.

तर हे चारजण कोण होते?

(सिल्वान क्रिस्टनसन)

सिल्वान क्रिस्टनसन आणि अँडी लुईस हे दोघे Advanture Tour Guide म्हणून काम करतात. ह्यांचेही मत असे होते की, मोनोलिथची बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे लोकांची प्रचंड गर्दी उफाळून आली. गाडी ठीक आहे, पण खाजगी हेलिकॉप्टरनेसुद्धा लोक येत होते. त्यामुळे सुंदर स्वच्छ जमीन खराबच होत होती. म्हणून त्यांनी तो मोनोलिथ तिथून हलवला. जरी त्यांनी तो मोनोलिथ तिथून सुरक्षित जागेत हलवला असला तरी तो सर्वात प्रथम तिथे कसा आला हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे. असो.

बरं. आता तरी ह्या मोनोलिथच्या गोष्टींवर पडदा पडायला हवाय. खरं आहे नं? पण गोष्ट जर मध्येच संपतीय तर काय मजा ना

कालच म्हणजे २ डिसेंबर रोजी कॅलिफोर्नियाच्या एटॅकासॅरोमधल्या पाइन नावाच्या डोंगरमाथ्यावर तिसरा मोनोलिथ आढळून आला आहे. हा मोनोलिथ देखील युटा आणि रोमेनियामध्ये आढळून आलेल्या मोनोलिथसारखाच दिसतो. हा मोनोलिथ कुठून आला, कोणी ठेवला तिथे ह्याची देखील कोणतीही माहिती उपलब्ध नाहीय. युटामधला मोनोलिथ तिथे २०१५ पासून होता ह्याचे पुरावे उपग्रहाने घेतलेल्या फोटोंमधून मिळून आलेले आहेत. पण रोमेनिया आणि कॅलिफोर्नियामधल्या मोनोलिथचे असे कोणतेही पुरावे आढळून आलेले नाहीत. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी आढळून येणाऱ्या मोनोलिथभोवतीचे गूढ दिवसेंदिवस वाढतच आहे.

तर वाचकहो, ह्या मोनोलिथबद्दल आणि त्यांच्या लपंडावांबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते आम्हाला नक्की कमेन्टबॉक्समध्ये नक्की कळवा.

 

लेखिका: स्नेहल बंडगर

सबस्क्राईब करा

* indicates required